राजेश बोबडे

बुवाबाजीचे मूळ लोकांच्या स्वार्थातच दडलेले आहे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बुवाबाजीच्या अपरिहार्यतेबद्दल सांगतात ‘हा बुवा कसा आहे व याने जगात काय चालविले आहे? लोक याच्याकडे जातात आणि दिवसभर टीकेचे व नकलेचे कार्यक्रम सुरू असतात. मग लोभी लोक ढोंगी बुवांच्या चक्रव्यूहात फसणारच आणि त्यांना अशिक्षित किंवा सुशिक्षित भोगी भेटणारच! हा तमाशा आम्ही कधी बंद करणार आहोत? जोपर्यंत लोकांत हे ज्ञान येत नाही की साधूंकडे काय मागावे? ते काय देऊ शकतात व काय नाही? आपण लोभाने इच्छितो ती गोष्ट होऊ शकते की नाही? ढोंगी सोडा खरा बुवा तरी ती गोष्ट करू शकतो काय? आणि जर तसे झाले नसते तर आपल्या पूर्वजांनी मोठमोठी पुराणे आणि शिवलीलामृतासारख्या  पोथ्या व ग्रंथ आपल्यापुढे आदर्श म्हणून का ठेवल्या असत्या? त्यांना उत्तेजन देणारे जे साधुसंत झाले त्यांचेही चमत्कार लोकांनी खरे कसे मानले असते? जर ही गोष्ट खोटी असती तर शास्त्रपुराणांतून तरी स्पष्ट का केली नसती? या शापाला आणि चमत्काराला लोक का भुलले असते? हे प्रश्न समाजापुढे ठेवले जात नाहीत तोपर्यंत ही गोष्ट अव्याहत सुरूच राहणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही सज्जन बुद्धीचा वापर करून यापासून दूर झाले म्हणून समाज शहाणा झाला, असे मुळीच होत नाही. त्याकरिता लोभाने वाटेल ते मागणारे स्वार्थी लोकच कमी झाले पाहिजेत अथवा त्या मागणाऱ्यांपेक्षा त्यांना समजावणारे तरी अधिक असले पाहिजेत. परंतु, ते असे काही सुरू करू लागले की लोक त्यांच्याकडे आलेच म्हणून समजा. मग विचारतील त्यांना, ‘‘अहो महाराज, काही तरी सांगाहो! माझा मुलगा वाचवा एवढा, फारच आजारी आहे तो! मी सर्वकाही करून चुकलो.’’ असे दोन-चार लोक आले की तुम्ही सांगाल की- ‘‘मी देवाचा बाप थोडीच आहे? मला यातले काय समजते? जा आपण येथून’’ असे म्हटल्यानंतर काही जणांना गुण आला म्हणजे, मग ‘‘तुमच्या या म्हणण्यामुळेच आजार बरा होतो’’ अशी भावना निर्माण होऊ लागेल. तुम्ही अशा लोकांना दूर सारले तरी ते तुमच्यापासून हटू शकणार नाहीत. कारण तुमची वागणूक त्यांना निर्मळ, निर्लोभी आणि सत्य सांगणारी दिसेल व ते आपसात असा समज करून बसतील की, ‘‘अरे! यापेक्षा कोण चांगला आहे? तो कितीतरी पाजी बुवांचे पितळ उघडे पाडणारा बाबा आहे!’’ काही म्हणतील, ‘‘काय तुम्ही वेडे लोक ! बुवा का असा असतो?’’ दुसरा म्हणेल, ‘‘अरे संताला काय बाबा म्हणता, ते ‘राजयोगी’ असतील. कारण भोळय़ा व लोभी लोकांना ओळखणे सोपे नाही. तसे झाले असते तर आजवर समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी व इतर महान संतांनी सर्व जग ज्ञानी केले असते. सर्व लबाड बुवांचा विध्वंस केला असता. पण त्यांनाही काही लोकांनाच शहाणे करता आले; मग त्यांच्या ‘कृपेने म्हणा वा ‘लोकांच्या सेवेने’ म्हणा!