दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून अरविंद केजरीवालांना पायउतार व्हावं लागण्यामागं त्यांच्या आलिशान घराचाही मोठा हात होता. मुख्यमंत्री असताना त्यांचं शीशमहल नावाच्या घरात वास्तव्य होतं. या घराचा त्यांनी कायापालट केला. हे निवासस्थान त्यांनी इतकं आलिशान केले की, त्या घरात विद्यामान मुख्यमंत्री रेखा गुप्ता जायला तयारच झाल्या नाहीत. केजरीवालांनी आपण साधेभोळे, सामान्य नागरिक असल्याचा आव आणला होता, मग, त्यांचं भांडं फुटलं. ते पंचतारांकित व्यवस्था असलेल्या घरात रहात आहेत, हे लोकांना समजलं. त्यांचा शीशमहल निवडणुकीचा विषय बनला. केजरीवाल हरले, मग, शीशमहल हातून गेला. ते आमदारही राहिले नाहीत. त्यामुळं मग पुन्हा ‘उच्च विचार, साधी राहणी’ हे तत्त्व त्यांना स्वीकारावं लागलं. उच्च विचारांचं काय झालं ते माहीत नाही पण, त्यांना घरासाठी शोधाशोध करावी लागली. आता त्यांना ल्युटन्स दिल्लीतच आठव्या दर्जाचा बंगला मिळेल. ल्युटन्स दिल्लीत दर्जा क्रमांक- ४ ते दर्जा क्रमांक-८ अशा चढत्या भाजणीने सरकारी निवासस्थानांचा दर्जा वाढत जातो. सध्या केजरीवाल फिरोजशहा रोडवरील त्यांच्या पक्षाच्या म्हणजे ‘आप’च्या राज्यसभेतील खासदाराला मिळालेल्या घरात राहतात. या खासदाराने आपल्या नेत्याला तात्पुरती निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा बंगला ‘दर्जा क्रमांक-८’चा नाही. या घरामुळं केजरीवालांचा ल्युटन्स दिल्लीत प्रवेश झाला तरी, त्यांच्या दर्जाचा बंगला त्यांना मिळाला नव्हता. केजरीवाल राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख असल्याने त्यांना ल्युटन्स दिल्लीत निवासस्थान मिळू शकते. अन्यथा त्यांना कुठंतरी खासगी निवासाची सुविधा मिळवावी लागली असती. दिल्लीच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना आमदार म्हणून सरकारी निवासस्थान मिळू शकत नाही. ‘आप’चे प्रमुख म्हणून त्यांच्यासाठी मोठा बंगला मिळू शकतो. दिल्लीतील उच्चभ्रू लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या खान मार्केटच्या समोर असलेल्या तितक्याच उच्चभ्रू वस्तीमध्ये म्हणजे लोधी इस्टेटमध्ये केजरीवालांना नवे घर मिळणार आहे. नव्या घराची केजरीवालांच्या कुटुंबीयांनी पाहणीही केल्याचे सांगितले जाते. खरंतर केजरीवालांना मोठा बंगला आधीच मिळायला हवा होता पण, केंद्र सरकारने दिरंगाई केली. मग, केजरीवाल उच्च न्यायालयात गेले, तिथे सरकारला फटकारले गेले. त्यानंतर केजरीवालांना नवे घर देण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता केजरीवाल खऱ्या अर्थाने मोदींनी नाके मुरडलेल्या ल्युटन्स दिल्लीचे रहिवासी होतील.

जुनी खोंडं पुन्हा डोईजड

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पक्षातील जुन्या खोंडांना बाजूला करायचं आहे. त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न कित्येक वर्षं सुरू आहेत. पण, त्यांना अजूनही यश मिळालेलं नाही. ही खोंडं पुन:पुन्हा डोकं वर काढतात, त्यांना पक्षात सामावून घ्यावं लागतं. याचं ताजं उदाहरण म्हणजे हरियाणाचे काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा. या हुड्डा आणि कुमारी सेलजा यांच्या भांडणामध्ये काँग्रेसने हरियाणातील हातात येऊ घातलेली सत्ता गमावली. काँग्रेसला नामुष्की सहन करावी लागल्यानंतर राहुल गांधींनी या खोंडांवर कारवाई करण्याचं ठरवलं पण, पक्षातील कोणाचंही तसं करण्याचं धाडस झालं नाही. मग, हरियाणाचा विषय वर्षभर लोंबकळत राहिला. विधानसभेत विरोधी पक्षनेते कोणाला करायचं हा निर्णय राहुल गांधींनी घेतला नाही. हुड्डांना ताटकळत ठेवलं, नवा प्रदेशाध्यक्षही नेमला नाही. पण, त्यामुळं हुड्डांचं काही बिघडलं असं नाही. हुड्डा हेच हरियाणातील काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्याशिवाय राज्यात पक्षाला काहीच करता येत नाही, हे पुन्हा सिद्ध झालं. वर्षभरानंतर का होईना राहुल गांधींना हुड्डांनाच विरोधी पक्षनेते करावं लागलं. शिवाय हुड्डांचे निष्ठावान राव नरेंद्र सिंह यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद द्यावं लागलं आहे. हरियाणा काँग्रेसमध्ये अखेर सत्ता हुड्डांचीच हे सिद्ध झालं. दुसरीकडे भाजपमधील मोदीविरोधक वसुंधराराजे शिंदे यादेखील पुन्हा सक्रिय झाल्या आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. वसुंधराराजे गेल्या महिन्यामध्ये जोधपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्या होत्या. त्यानंतर वाऱ्याची दिशा बदलली असे मानले जाते. राजस्थानमध्ये दोन वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर वसुंधराराजेंना राजकीय वनवासात पाठवलं गेलं. नवख्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री नियुक्त केल्याची चिठ्ठी भरसभेत राजनाथसिंह यांनी वसुंधराराजेंना दिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेऱ्यांनी टिपले होते. पण, भाजपला सगळ्याच जुन्या नेत्यांपासून मुक्ती मिळवता येत नाही. वसुंधराराजेंना पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय केले जाईल असे संकेत दिले गेले आहेत. वसुंधराराजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात दिल्लीत मोदी-शहांना भेटून गेल्या होत्या. वसुंधराराजेंमुळे राजस्थानमधील मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा केली जात आहे. वसुंधराराजे खरोखरच सक्रिय झाल्या तर लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांचं काय होणार हा प्रश्न आहे. सध्या राजस्थानचं सरकार बिर्लाच चालवतात असं म्हटलं जातं. तिथं बिर्लांचंच राज्य आहे. राजस्थानचे खरे मुख्यमंत्री बिर्लाच असून भजनलाल यांना बिर्लांचा आशीर्वाद घेऊन राज्य चालवावं लागतं असं म्हणतात.

दाक्षिणात्य मेजवानी

नवनियुक्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी गेल्या आठवड्यामध्ये राज्यसभेतील गटनेत्यांची बैठक घेतली. तिथं विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर माहिती लपवून ठेवल्याचा आरोप केला असं समजतं. केरळमधील माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी, माहितीच्या अधिकारात मिळू शकणारी माहितीदेखील केंद्र सरकारकडून सभागृहात दिली जात नाही असा आरोप केला. या आरोप-प्रत्यारोपांवर राज्यसभेचे सभापती राधाकृष्णन यांचं मत काय होतं हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये समजेल. बैठकीमध्ये राधाकृष्णन यांनी दाक्षिणात्य मेजवानी देऊन गटनेत्यांना खूश केलं. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू दाक्षिणात्य पदार्थांच्या मेजवान्या देत असत. संसद सदस्य, पत्रकारांना ते खाऊ घालत असत. नायडूंनंतर जगदीप धनखड उपराष्ट्रपती झाले. त्यांच्याकडे दाक्षिणात्य मेजवानी असण्याचं काही कारणच नव्हतं. या राजस्थानी नेत्याचा भर उत्तरेतील पदार्थांवरच होता. लोकसभाध्यक्ष अधूनमधून पत्रकारांना मेजवानी देतात, अनेकदा राजस्थानी दाल-बाटी, चुरमा अशा सगळ्या नजाकती त्यात असतात. हरियाणामध्ये एका कार्यक्रमासाठी बिर्लांनी दिल्लीतील पत्रकारांना निमंत्रित केलं होतं. त्याचा श्रमपरिहार म्हणून त्यांनी संसदेच्या अनेक्स इमारतीमध्ये मेजवानी दिली होती. पण आता राधाकृष्णन यांच्यामुळं पुन्हा दाक्षिणेतील पदार्थांची रेलचेल पाहायला मिळेल.

हरहुन्नरी रुडी!

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहून भाजपमधील त्यांचे सहकारी आणि खासदार राजीव प्रताप रुडी यांचे कौतुक केले आहे. रुडी हे राजकारणी असले तरी व्यवसायाने वैमानिक आहेत. व्यावसायिक विमान चालवण्याचा त्यांच्याकडे परवाना आहे. देशांतर्गत विमान कंपनीशी ते जोडलेले आहेत. खासदारकीची जबाबदारी सांभाळत ते वैमानिकाचेही कर्तव्य बजावतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या फ्लाइटमध्ये इतर राजकारण्यांची आणि त्यांची भेट होत असते. रुडी यांच्या अशा गाठीभेटींचा अनुभव नंतर राजकीय नेते सांगत असतात. यावेळी रुडीं यांना विमानामध्ये शिवराजसिंह चौहान भेटले. विमानाचे प्रमुख वैमानिक रुडी होते. त्यांच्याशी गप्पा मारत असतानाचे छायाचित्र शिवराजसिंह चौहान यांनी नंतर प्रसिद्ध केले. रुडींनी विमानप्रवासातील अनुभवांबद्दल सांगितल्याचे शिवराज यांनी रुडींबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे. शिवराजसिंह पाटण्यातील कार्यक्रम संपवून दिल्लीला परत येत होते. रुडीही बिहारचे. ते सारण लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात. भारतात फार थोडे राजकारण्यांना वैमानिक म्हणून परवाना मिळाला होता. रुडी हे त्यांच्यापैकी एक. वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी नागरी विमान वाहतूकमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. रुडींप्रमाणे माजी पंतप्रधान राजीव गांधी हेदेखील व्यावसायिक वैमानिक होते. खरंतर त्यांना राजकारणापेक्षा वैमानिक म्हणून काम करणंच अधिक पसंत होतं असं म्हणतात. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे छोटे चार्टर विमान आहे. त्यांना चार्टर विमान चालवण्याचा अनुभव आहे असं सांगितलं जातं. त्यांच्याकडे खासगी विमान चालवण्याचा परवाना आहे. बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांच्याकडेही चार्टर विमान आहे, त्यांनीही विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं पण, त्यांनी वैमानिकाचा परवाना घेतलेला नाही. रुडी हे वैमानिक आहेत, खासदार आहेत. राजकारणात आल्यावरही त्यांनी हा व्यवसाय सोडलेला नाही. शिवाय, ते कॉन्स्टिट्युशन क्लबचे सचिव आहेत. गेली २५ वर्षे ते या पदावर कार्यरत आहेत. यंदाची अवघड निवडणूकही ते जिंकले आहेत. एकूण रुडी हे हरहुन्नरी आहेत असं म्हणता येईल.