‘ऑस्कर’ विजेती आणि कमी चित्रपट करूनही छाप पाडणारी अभिनेत्री म्हणून, डिअॅन कीटन यांच्या निधनानंतर त्यांची दखल इंग्रजीभाषक जगाने घेतलीच, पण त्यांच्या साधेपणाची चर्चाही आदरांजलीपर लेखांतून झाली. आपल्याकडे रविवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी त्यांची निधनवार्ता आली. ‘नटी’ न होता अभिनेत्रीच राहिलेल्या कीटन यांनी हालचाली सुलभ होतील असे आणि मुद्दाम देहप्रदर्शन न करणारे कपडे निवडून नवा पायंडा पाडल्याचा उल्लेखही अनेकांनी केला.
कदाचित हेच, भारतीयांना डिअॅन कीटन फारशा माहीत नसण्याचे कारण असावे. भारतीय भाषांमध्ये ‘हॉलीवूड मदनिका’सारखे शब्द १९७०च्या दशकात रूढ होते. अशा काळात अभिनयाची सुरुवात डिअॅन यांनी केली. हॉलीवूडच्या पायथ्याशीच, लॉस एंजलिसमधल्या सुखवस्तू कुटुंबात त्या जन्मल्या. आईने ‘श्रीमती लॉस एंजलिस’ हा गृहिणींच्या स्पर्धेतला किताब मिळवताना दाखवलेला रुबाब आणि कॅथरीन हेपबर्नचा अभिनय या दोन्हीमुळे डिअॅन यांनी नवव्या-दहाव्या वर्षीच अभिनेत्री होण्याचे ठरवले. शालेय शिक्षण घेताना अभिनयात चमकही दाखवली; पण पुढे अभिनयाचे रीतसर शिक्षण अर्धवट सोडून न्यू यॉर्कला गेल्या आणि नाटकांतून कामे मिळवू लागल्या. तेवढ्यासाठी नावही बदलून आईचे माहेरचे आडनाव (कीटन) लावू लागल्या. अखेर बदली अभिनेत्री भूमिकेसाठी ‘ब्रॉडवे’वर मिळालेली संधी, मग वूडी अॅलन यांच्यासह एका नाटकात (प्ले इट अगेन, सॅम) नायिकेची भूमिका, यानंतर चित्रपटांसाठीही त्या प्रयत्न करू लागल्या. ‘गॉडफादर’ कादंबरीवर आधारित चित्रपटात ‘अपघाताने’ माफिया टोळीप्रमुख झालेला दुसऱ्या पिढीतला डॉन मायकेल कॉर्लिओनी याच्या प्रेयसी-पत्नीची भूमिका जणू त्यांच्यासाठीच होती. अमेरिकन, स्वतंत्र विचारांची, हसरी, जोडीदारानेही आपल्यासाठी बदलावे असा आग्रह धरणारी के अॅडम्स ही तरुणी २६ वर्षांच्या डिअॅन यांनी अल पचिनोसमोर वठवली. गॉडफादरच्या पुढल्या भागांतही हीच भूमिका त्यांनी राखली. पण ‘गॉडफादर’चा दरारा १९७३च्या ऑस्करवर असूनही, डिअॅन यांना ही ‘बाहुली’ मिळाली ती वूडी अॅलन यांच्यासह केलेल्या ‘अॅनी हॉल’ या चित्रपटातल्या शीर्षक-भूमिकेसाठी. डिअॅन यांच्या आईचे लग्नानंतरचे नाव अॅनी हॉल. या भूमिकेत त्यांनी धमाल केली… १९७८ मध्ये या चित्रपटासाठी जेन फोंडा आणि शर्ली मॅक्लेन यांच्याशी स्पर्धा असूनही ‘ऑस्कर’ कीटन यांनी मिळवले.
चित्रपट, नाटके आणि टेलिव्हिजन मालिका मिळून शंभरेक भूमिका कीटन यांनी १९६५ पासून २०१५ पर्यंत केल्या, हा आकडा फार नव्हे. हॉलीवूडचे पुरुष अभिनेते जशी कोणत्याही भूमिकेत आपापली शैली (आहार्य, आंगिक, वाचिक अभिनयात) जपण्याचा आग्रह धरत, तोच डिअॅन कीटन यांनीही धरला. त्याहीमुळे भूमिकांचे प्रमाण मर्यादित झाले असावे. पण फार अपेक्षा न ठेवता, योग्य वयात अभिनयाखेरीज इतरही ठिकाणच्या गुंतवणुकांतून सांपत्तिक स्थिती सांभाळून, त्या मजेत जगल्या, हे महत्त्वाचे.
मजेत म्हणजे किती मजेत? हे उमगण्यासाठी त्यांचे ‘इन्स्टाग्राम’ खाते जिज्ञासूंसाठी अद्यापही उपलब्ध आहेच. ‘इन्स्टाग्राम’चा वापर २०१५ पासून त्या करू लागल्या. पण या समाजमाध्यमी आयुष्याबाहेर त्यांनी चार (आत्मपर) पुस्तकेही लिहिली, पैकी पहिले आईबद्दल आहे. याहीपलीकडे, लॉस एंजलिस शहराचा वास्तुवारसा ठरणाऱ्या इमारती जपण्यासाठी कार्यकर्ती म्हणूनही त्यांची आठवण अनेकांना राहील.