– डॉ हेमंत श्रीधर जोगळेकर
नुकतीच गुरुपौर्णिमा आपण सर्वांनी साजरी केली. गुरूला आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान असतं. मातृदेवो भव:, पितृदेवो भव: व त्यानंतर गुरुदेव भव: असं आपण आदराने मानतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आज ४जी, ५जी जरी असेल तरी, गुरुजी हे सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शक. गुरू आपलं आयुष्य घडवतो. असेच एक गुरू म्हणून ज्यांचा भारतीय शैक्षणिक क्षेत्रात तसेच उद्याोग क्षेत्रातही आदराने उल्लेख केला जातो, ते पद्माविभूषण प्रा. मनमोहन शर्मा. जगभरातील विद्यापीठीय मान-सन्मान मिळवलेल्या प्रा. शर्मा यांचे चरित्र सांगणारे पुस्तक त्यांच्या हयातीतच प्रकाशित झाले आहे, हे विशेष.
प्रा. मनमोहन शर्मा यांचा जन्म राजस्थानातील जोधपूर येथे झाला. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते माटुंगा येथील तत्कालीन यूडीसीटी म्हणजे आजचे आयसीटी येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करावे व तेही अविरत हा त्यांचा ध्यास होता आणि त्यामुळेच त्यांनी अनेक वेगवेगळ्या उच्चपदस्थ अशा आलेल्या संधी नाकारून शिक्षक व्हायचे ठरवले. पद्माविभूषणसोबत आज शर्मा सरांना इंग्लंड येथील एफआरएस अर्थात, फेलो ऑफ द रॉयल्स सोसायटी यांनी पण गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी घडवलेले व आपणास परिचित असलेले अनेक शास्त्रज्ञ आहेत. पद्माविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्माभूषण प्रा. जे. बी. जोशी हे त्यांचेच विद्यार्थी. प्रा शर्मांनी रसायन तंत्रज्ञान या संबंधित विषयावर अनेक शोधनिबंध लिहिले तसेच भारतीय औद्याोगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्या सर्वांचा फायदा त्या उद्याोगांना तर झालाच; परंतु यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळाले. ही एक प्रकारची औद्याोगिक क्रांतीच म्हणता येईल.
प्राध्यापक शर्मा यांनी अनेक नामवंत उद्याोगसमूहास अनेक वर्षे मोलाचा सल्ला दिला. जसे की, रिलायन्स इंडस्ट्री, टाटा केमिकल्स, लुपिन, दीपक नाइट, हर्डिलीया केमिकल्स, पिडिलाइट, भारत पेट्रोलियम इत्यादी. आज प्राध्यापक शर्मांचे अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांत आहेतच. पण उद्याोगसमूहात उच्चपदस्थ अधिकारी व धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेले उद्याोजक प्रा. शर्मा यांच्यामुळे घडले आहेत. प्रा. शर्मा यांनी उद्याोगसमूहाला फक्त रसायन तंत्रज्ञानाबद्दल सल्ला नाही दिला तर, त्याचे आर्थिक नियोजन व आर्थिक भरभराट कशी करता येईल हे समजावून सांगितले. प्रा. शर्मा हे कुठल्याही रासायनिक प्रक्रियेतील बाय प्रॉडक्टला ‘को प्रॉडक्ट’ म्हणून एक वेगळीच ओळख देतात व त्यातूनही आर्थिक पुंजी कशी घडवता येईल याबद्दल मार्गदर्शन करतात.
त्यांच्या या दीर्घ प्रवासाबद्दल पुस्तकात भरपूर तपशील आहे. त्यांच्या अनुभवातून भावी पिढीस प्रेरणा मिळावी, हा या पुस्तकाचा हेतू आहे. आज प्रा. शर्मा हे वयाच्या ८८ व्या वर्षीदेखील, अजूनही आयसीटीसाठी व भारतातील रासायनिक उद्याोगसमूहासाठी मोलाचे योगदान देत आहेत. ‘एमिरेटस प्रोफेसर ऑफ एक्सलन्स’ या नात्याने आजही त्यांचे आयसीटी हे दुसरे घरच आहे. नवीन पिढीसाठी हे पुस्तक एक दिशादर्शक स्फूर्तिस्थान नक्कीच ठरेल यात शंका नाही.
‘डिव्हाइन सायंटिस्ट – बायोग्राफी ऑफ पद्माभूषण प्रोफेसर एम. एम. शर्मा’
●लेखिका: अनिता पाटील
●प्रकाशक : सुंदरम डिजिटल, मुंबई.
●पृष्ठे : ३७७ ●किंमत : ९९५ रु .