डॉ. चंद्रकला हाटे यांचा ‘स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री’ शीर्षक प्रबंध महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९७३मध्ये प्रकाशित केला. त्यास तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची प्रस्तावना आहे.

त्यात तर्कतीर्थांनी विशद केले आहे की, स्वातंत्र्योत्तर कालखंडात समता, स्वातंत्र्य आणि शोषणरहितता या मूलभूत मानवी हक्कांमुळे, नव्या दृष्टिकोनातून स्त्री जीवनावर सांस्कृतिक-नैतिक परिस्थितीबरोबर आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर परिणाम होऊ लागला आहे. हा परिणाम कोणत्या स्वरूपाचा आहे, याचा शोध घेण्यासाठी व स्त्रीजीवनाच्या विविध अंगोपांगांचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने ‘स्त्रीचे परिवर्तित स्थान’ (चेंजिंग स्टेटस ऑफ वुमन) या विषयावर डॉ. चंद्रकला हाटे यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाच्या योजनेअंतर्गत संशोधन केले. हे संशोधन कार्य डॉ. हाटे यांनी केंद्रीय व राज्य सरकारांच्या कचेऱ्या, स्थानिक स्वराज्य संस्था, व्यापारी व औद्याोगिक प्रतिष्ठाने, बँका, नियतकालिके, शैक्षणिक व समाजकल्याण संस्था यांमध्ये काम करणाऱ्या व डॉक्टर, वकील या नात्याने स्वतंत्ररीत्या काम करणाऱ्या सर्व स्तरांतील स्त्रियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून, परस्पर विचारविनिमय करून केले. एकाच बाजूचा अभ्यास करण्याऐवजी सामाजिक, नैतिक, व्यावसायिक, रोजगारविषयक, मातृत्व, नागरिकत्व इत्यादी स्त्रीजीवनविषयक सर्व बाजू विचारात घेऊन स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय स्त्रियांच्या परिवर्तित स्थानाचा अभ्यास करणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. त्याचे यथार्थ चित्रण ‘चेंजिंग स्टेटस ऑफ वूमन इन पोस्ट-इंडिपेंडन्स इंडिया’ या शोधग्रंथात आहे. या ग्रंथाचा अनुवाद डॉ. हाटे यांनीच केला आहे व प्रकाशात आलेल्या नवीन माहितीची त्यात भर घालून अद्यायावत स्वरूपात तो प्रकाशनार्थ मंडळाच्या स्वाधीन केला. हा अनुवाद ‘स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री’ या शीर्षकाने मंडळाच्या भाषांतर योजनेखाली प्रकाशित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे. ही क्रिया इतकी मूलग्राही त्याचबरोबर परस्पर निगडित आहे की, त्या संक्रमणातून विविध विभागांत जी नवी घडी बसू पाहत आहे, तिचा शास्त्रशुद्ध सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

प्रस्तुत ग्रंथात, स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय स्त्रीच्या स्थानात जे परिवर्तन होत आहे, त्याच्या बहुविध, व्यापक संशोधनाचा प्रयत्न केला आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर व सोलापूर या चार मोठ्या शहरांतील समाजरूपी देहाचा जणू आधारस्तंभ अशा मध्यमवर्गातील अर्थार्जन करणाऱ्या व न करणाऱ्या स्त्रिया नमुन्यादाखल घेतल्या आहेत.

समाजाचे जीवन घडविण्यामध्ये भारतीय स्त्रिया जो कार्यभाग उचलत आहेत व त्यामुळे त्यांना निरनिराळ्या क्षेत्रांत जे स्थान लाभत आहे, त्याची तुलना सहा विकसित राष्ट्रांतील तत्सम क्षेत्रांतील स्त्रियांबरोबर करून अन्य राष्ट्रीय भगिनींचा साम्यविरोध प्रकट केला आहे. या संशोधनातून स्त्रीच्या स्थानात निश्चित परंतु अपूर्ण परिवर्तन झाल्याचे दिसते. समतेच्या युगात मिळालेल्या नवनव्या सुसंधींचा पूर्ण फायदा घेण्याकरिता ज्या समस्यांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते आहे, त्याचे चित्रण स्त्रियांच्या स्वत:च्या शब्दांत केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वरील प्रस्तावनेत ज्या वास्तवावर डॉ. चंद्रकला हाटे यांच्या संशोधनाच्या आधारावर बोट ठेवले आहे, अशी संशोधने भारतीय स्त्रियांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली आहेत. १९६० मध्ये विभावरी शिरूरकर तथा मालती बेडेकर यांनी १९४१ ते १९६१ अशा दोन दशकांतील (स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर) स्त्रियांचा ‘घराला मुकलेल्या स्त्रिया’ शीर्षक प्रबंधात केलेला अभ्यास किंवा नंतरच्या काळात सुलोचनाबाई देशमुख यांनी १९९७ च्या ‘कुमारीमाता’ प्रबंधात केलेली मांडणी उपरोक्त विवेचनावर अधिक खोलात जाऊन प्रकाश टाकते. अगदी अलीकडे ‘युनो’मार्फत संगणक, आंतरजाल, नोकरी/ व्यवसायाची ठिकाणे यांत स्त्रियांची आघाडी व त्याचबरोबर तिथे त्यांच्यावर होणारे मानसिक, लैंगिक अत्याचार, छळ, जबरदस्तीचा अभ्यास करणारा प्रबंध चिंता व्यक्त करणारा आहे. त्याचे शीर्षकच आहे मुळी ‘मुली व महिलांवरील आभासी जगाचे अत्याचार’. पंजाबी सहस्राक श्रेष्ठ कवयित्री अमृता प्रीतम यांनी स्त्रीसाठी ‘चौथा कमरा’च्या (दिवाणखाना, शयनकक्ष व स्वयंपाकगृहसोडून) रूपात अपेक्षिलेला अवकाश अद्याप मिळालेला नाही.
drsklawate@gmail.com