जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांनी गतवर्षी अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत, एक आघाडीचे उद्योगपती म्हणून घेतलेली भूमिका जुगारी आणि धोकादायक होती. त्यांनी त्यांची सारी आर्थिक ताकद रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे उभी केली. असे करत असताना उद्योग जगतातील तटस्थतेचे आदिम पथ्य आपण गुंडाळून ठेवत आहोत याची फिकीर त्यांना नव्हती. ट्रम्प यांच्या निवडीसाठी त्यांनी जवळपास ३० कोटी डॉलर्स ओतले. कदाचित त्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस विजयी झाल्या असत्या, तर त्यांच्या प्रशासनाशी जुळवून घेणे मस्क यांना जड गेले असते. कारण मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीकडे अमेरिकी प्रशासनाची, तसेच ‘नासा’ या तेथील सरकारी अवकाश संशोधन संस्थेची कोट्यवधींची कंत्राटे आहेत. त्याचबरोबर, ‘टेस्ला’ कंपनीचा व्यवसाय विद्युत मोटारींच्या क्षेत्रात असताना, त्यासाठी अनुकूल धोरणे आखण्यासाठी डेमोक्रॅटिक प्रशासनामागे तगादा लावावा लागला असता. राजकीय पक्षांचे आणि शक्तिशाली नेत्यांचे लांगूलचालन करणारे उद्योगपती त्या दृष्टीने मोठाच जुगार खेळत असतात. त्यात व्यावसायिक आणि व्यावहारिक शहाणपण अभावानेच आढळते. दीर्घकालीन जोखीम पत्करणे वेगळे आणि अल्पकालीन लाभासाठी असे जुगार खेळणे वेगळे. अर्थात काहींच्या बाबतीत एखादी राजकारणी व्यक्ती दीर्घकाळ सत्तेवर राहिल्यामुळे जुगार फळताना दिसून येतो. इलॉन मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या निवडीवर एक प्रकारे सट्टा लावला नि त्यात ते जिंकले. पण सट्टाच तो. फासे कधी उलटेही पडतात. सध्या तसेच झाले. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील स्नेहभाव आटला नि मस्क यांना कोणत्याही विशेष सायासांविना दूर करणे ट्रम्प यांना सहज साधले. हेही फार अनपेक्षित नाही. अशा भागीदाऱ्यांमध्ये कायमस्वरूपी लाभार्थी राजकारणीच ठरतात. गरज सरली की आपल्यासाठी निधी ओतलेल्या उद्योगपतींना वाटेला लावण्यात यांना काहीही गैर वाटत नाही.
ट्रम्प यांनी मस्क यांना असेच वाटेला लावले. त्यांच्या अंतर्वर्तुळात प्रवेश मिळाल्यामुळे मस्क यांना स्वत:च्या प्रभावाविषयी फाजील अपेक्षा वाटू लागल्या होत्या. ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ अर्थात डोजे या नव्याच विभागाची निर्मिती मस्क यांच्यासाठी करण्यात आली. त्यांना अकार्यक्षम आणि अनुत्पादक संसाधनांवर ‘कात्री’ चालवण्याची मुभा दिली गेली. प्रत्यक्षात मस्क ‘कुऱ्हाड’ चालवू लागले नि अमेरिकेतील सरकारी नोकरदार हवालदिल झाले. सरकारी नोकरदार आणि सरकारी खर्च यांत कपात झालीच पाहिजे, याविषयी मस्क आग्रही होते. पण खर्चकपात नि कामगारकपात या बाबी राजकीयदृष्ट्या गैरसोयीच्या असतात, हे ओळखण्यात मस्क कमी पडले. त्याउलट ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्यूटिफुल बिल’च्या नावाखाली करकपातीचे आणि सरकारी खर्च (आपल्या मतदारांपुरताच) वाढवणारे विधेयक रेटले. या एका विधेयकावरून मस्क-ट्रम्प वाद विकोपाला गेला आणि दोघांनी काडीमोड घेतला. मस्क इतकेच करून थांबले नाहीत. त्यांनी आता नवीन पक्ष स्थापण्याचीही घोषणा केली आहे. ‘अमेरिका पार्टी’ या त्यांच्या नवथर पक्षाविषयी अद्याप नोंदणी वगैरे सोपस्कार पार पाडायचे आहेत. पण हा पक्ष अमेरिकेच्या राजकारणातील दोन प्रस्थापित पक्षांपेक्षा तिसरा पर्याय देणारा पक्ष ठरेल एवढी त्यांची महत्त्वाकांक्षा नाही. अमेरिकेच्या राजकारणात तिसऱ्या पक्षाचा पर्याय देण्याचा प्रयत्न करणारे धनाढ्य उद्योगपती यापूर्वीही होऊन गेले. तरी ते याबाबत फार गंभीर नव्हते. शिवाय दोन पक्षांची पकड अमेरिकेच्या राजकारणावरून ढिली करणे आता जवळपास अशक्य कोटीतली बाब आहे. हे जाणण्याइतपत चलाखी मस्क यांच्याकडे आहे. पण राजकारणात गुंतवणूक करण्याचा कंड अजून शमलेला नाही इतकेच त्यांच्या नवीन पक्षाबद्दल सांगता येईल. स्पेसएक्स आणि टेस्ला या त्यांच्या दोन्ही कंपन्यांसमोर आपापल्या क्षेत्रात आव्हाने उभी राहिली आहेत. त्यांकडे लक्ष पुरवणे अपेक्षित होते. त्याऐवजी अजूनही राजकारणाच्या क्षेत्रात मुशाफिरी करणे मस्क यांना आवडत असावे. नवा पक्ष सेनेटच्या दोन-तीन जागा आणि अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या आठ-दहा जागा जिंकेल इतके माफक उद्दिष्ट मस्क यांनी बाळगले आहे. ते स्वप्न पूर्ण झाले, तर दोन्ही सभागृहांमध्ये त्यांच्या मतांना वजन प्राप्त होऊ शकते. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन प्रमुख पक्षांना काठावरचे बहुमतच मिळत आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मध्यावधी निवडणुका हे मस्क यांचे पहिले लक्ष्य आहे. पण या व्यूहरचनेत मस्क यांच्यातील धनाढ्य आणि यशस्वी उद्योगपती फुटकळ सौदागराच्या पातळीवर उतरण्याची शक्यता आहे. मस्क यांना बहुधा ही अवनती मान्य असावी.