इंग्लंडविरुद्ध नुकतीच संपलेली कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राखल्याबद्दल देशात जल्लोष का सुरू आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंबहुना तसा तो उपस्थित केला जातही आहे. अशांसाठी काही घटकांकडे लक्ष वेधणे आवश्यक. इंडियन प्रीमियर लीगचा भरगच्च हंगाम खेळून थकलेले भारतीय क्रिकेटपटू या प्रदीर्घ आणि आव्हानात्मक दौऱ्यावर रवाना झाले. या मालिकेचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या प्रमुख आणि अनुभवी क्रिकेटपटूंनी मालिकेपूर्वी वेगवेगळ्या टप्प्यांवर घेतलेली निवृत्ती. त्याबरोबरीने भारताचे हुकमी हत्यार अर्थात गोलंदाज जसप्रीत बुमरा हा मर्यादित सामन्यांसाठीच उपलब्ध राहणार होता. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दौऱ्याच्या आधी तंदुरुस्त नसल्यामुळे बाद झाला होता. कर्णधारपदाची जबाबदारी नवथर शुभमन गिलवर येऊन पडली. त्याच्या दिमतीला उपकर्णधार ऋषभ पंत, के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजा असे तीनच अनुभवी क्रिकेटपटू होते. फलंदाजी फळीविषयी अनिश्चितता होती आणि गोलंदाजांच्या ताफ्यात कोणाला वगळायचे यापेक्षाही कुणास घ्यायचे याविषयीच चर्चा करावी लागणार होती. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये कसोटी मालिका नेहमीच खडतर असते. पण भारताच्या बऱ्याचशा अननुभवी संघासाठी नि अननुभवी कर्णधारासाठी ती अधिकच आव्हानात्मक ठरणार होती. २-२ या निकालाचे विश्लेषण या परिप्रेक्ष्यात करावे लागेल.
शुभमन गिलवर नेतृत्वाची जबाबदारी होती, पण त्या आधी त्याला फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे होते. पहिल्या परीक्षेत तो पैकीच्या पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झाला असेच म्हणावे लागेल. पाच सामन्यांमध्ये त्याने चार शतकांसह ७५४ धावा जमवल्या. कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत त्याच्यापेक्षा अधिक धावा साक्षात डॉन ब्रॅडमन यांच्याच नावावर आहेत. गोलंदाज मोहम्मद सिराजसाठीही ही मालिका खऱ्या अर्थाने कसोटीची होती. बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची धुरा प्राधान्याने त्याच्याच खांद्यावर होती. गिलप्रमाणेच सिराजही त्याच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला. मालिकेत सर्वाधिक २३ बळी त्याने घेऊन दाखवलेच, पण शेवटच्या ओव्हल कसोटीमध्ये मोक्याच्या वेळी भेदक गोलंदाजी करून अशक्यप्राय म्हणून अविस्मरणीय ठरलेला विजय भारताच्या दिशेने खेचून आणला. या कामगिरीमुळे सिराजला बुमराच्या छायेतून बाहेर येण्यास मोठी मदत होईल आणि त्याच्या आत्मविश्वासाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. या मालिकेत इंग्लंडने सुरुवात विजयाने केली, पण प्रत्येक वेळी भारताने प्रत्युत्तर दिले. भारताची कामगिरी एकट्या-दुकट्याच्या जोरावर नव्हती, तर सामूहिक होती. मालिकेत सर्वाधिक धावा जमवणाऱ्या सहा अव्वल फलंदाजांमध्ये चार भारतीय आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या सहा अव्वल गोलंदाजांमध्येही चार भारतीय आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सत्रागणिक खेळाचे महत्त्व असते. पाचही कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत रंगले, पण सत्रांचा हिशेब केल्यास, भारताने अधिक सत्रांमध्ये इंग्लंडवर वर्चस्व गाजवले हेही विशेष उल्लेखनीय.
हार न मानण्याची वृत्ती या संघात कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भिनवली आहे, याची प्रचीती वारंवार आली. पहिली कसोटी गमावल्यानंतर बर्मिंगहॅम कसोटीमध्ये भारतावर दडपण होते, कारण या मैदानावर भारताला तोपर्यंत कधीच जिंकता आलेले नव्हते. त्याचे कोणतेही दडपण न बाळगता तेथे गिलच्या संघाने यजमानांवर ३३६ धावांनी विक्रमी विजय मिळवला. मँचेस्टर कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारताची अवस्था २ बाद ० अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर राहुल, गिल, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पुढील चार सत्रे खंबीरपणे किल्ला लढवत सामना अनिर्णित राखला आणि भारताचे आव्हान जिवंत ठेवले. ओव्हलवरील अंतिम कसोटीतही आदल्या दिवशी हॅरी ब्रुक आणि जो रूट या इंग्लिश फलंदाजांनी आक्रमक खेळून सामन्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी भारतीय गोलंदाज आणि कर्णधाराने हार न मानता प्रतिकार जारी ठेवला.
काही वर्षांपूर्वीची ऑस्ट्रेलियातील मालिका भारताची याआधीची संस्मरणीय मालिका ठरली होती. त्याही मालिकेत रथी-महारथींच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय मालिका विजय संपादला. तो निव्वळ योगायोग नव्हता. व्यक्तिपूजेच्या प्रेमापायी भारतीय क्रिकेट संघ अशा संधी दवडत तर नाही ना, हा प्रश्न आपल्याकडे वर्षानुवर्षे विचारला जातोच. त्याचे उत्तर आपण शोधतो आहोत. मैदानावर एखादा संघ सामूहिकदृष्ट्या प्रयत्न करतो तेव्हा त्यातून मिळालेल्या विजयाची खुमारी अधिक असते, हेच इंगलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने दाखवून दिले. व्यक्तिकेंद्री व्यवस्थेचे उत्तरही त्यात मिळाले.