नंदन होडावडेकर
कादंबरीचा आस्वाद घेताना वा समीक्षा करताना, आशय जरी महत्त्वाचा असला तरी ज्या अवकाशात कादंबरी घडते, ती पार्श्वभूमी ध्यानी असणंही महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी यासाठी जशी आवश्यक, तशी भौगोलिकही. ‘Geography is destiny’— अर्थात एखाद्या देशाच्या वा प्रदेशाच्या भौगोलिक स्थानाचा त्याच्या आर्थिक आणि सामाजिक – आणि परिणामी राजकीय व सांस्कृतिक विकासावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो – या विधानाचं जनकत्व अगदी नेपोलियनपासून ते चौदाव्या शतकातील इतिहासकार इब्न खाल्दुनपर्यंत, अनेकांना बहाल करण्यात येत असलं; तरी त्याचा पडताळा आणि परिणाम अनेक ठिकाणी दिसून येतो. (जागतिक पातळीवर, याबद्दल अधिक सखोल माहिती हवी असेल, तर ‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ हे जॅरेड डायमंडचं पुस्तक नक्की वाचावं).
बुकर पारितोषिक पुरस्काराच्या लघुयादीत असणाऱ्या ‘फ्लॅशलाइट’ कादंबरीबद्दल लिहिताना ही भूगोलाच्या इतिहासाची उजळणी कदाचित अप्रस्तुत वाटू शकेल; पण नेहमीच्या एकरेषीय कथनाला टाळून, काळाच्या आणि भूगोलाच्या मोठ्या पटावर, उलगडत जाणाऱ्या या कादंबरीच्या विस्तृत आवाक्याकडे पाहताना ही संदर्भचौकट आवश्यक आणि उपयुक्त आहे.
कोरियन द्वीपकल्प हा सर्वार्थानं, जपान आणि चीन, या दोन बलाढ्य सत्तांच्यामध्ये सापडलेला प्रदेश – केवळ यालू आणि तूमेन नद्यांनी चीनच्या मुख्यभूमीपासून काहीसा अलग, तर जेमतेम दोनशे किमी लांबीची चिंचोळी सामुद्रधुनी दक्षिण जपानला कोरियापासून वेगळं करणारी. चौथ्या शतकात, चीनमधून बुद्ध धर्म कोरियात प्रवेश करता झाला. धर्मासोबतच तत्त्वज्ञान, शासनव्यवस्था, लेखनशैली आणि तंत्रज्ञान, स्थापत्यकला यांतील संकल्पनांची आयातही चीनमधून प्राचीन कोरियात झाली.
त्या तुलनेनं, जपानचा कोरियावरला प्रभाव बराच आधुनिक काळातला आहे – इ.स.१६३३ ते १८५४ या दोनशेहून अधिक वर्षांच्या कालावधीत, जपानी राजवटीकडून हट्टानं अलगतावादाचं धोरण राबवण्यात आलं आणि नागासाकीसारखं सुदूर दक्षिणेतलं बंदर वगळता कोरियाशी व्यापारी संपर्क बेतासबातच ठेवण्यात आला. या सुमारास कोरियानंही चीनच्या चिंग राजघराण्याचं (Qing dynasty) मांडलिकत्व पत्करलं होतं. या अलगतावादाला नाइलाजानं सोडचिठ्ठी द्यावी लागल्यावर, जपाननं विसाव्या शतकात झपाट्याने औद्याोगिकीकरणाचं आणि साम्राज्यविस्ताराचं धोरण अगिंकारलं. आधी चीन आणि मग रशियाचा पराभव केल्यावर, १९१० साली जपानने कोरियाचा घास घेतला.
जपानचं साम्राज्य आजच्या जपानपेक्षा केवढं अधिक होतं, याची कल्पना येण्यासाठी १९३५ सालचा नकाशा सोबत आहे तो पाहा. त्यातला काळसर भाग दिसतो, ते जपानी साम्राज्य- चीनचा पूर्व भागही त्यात होता. कोरिया हा जपानच्या अधिक जवळचा. जपानी अमलाच्या १९१० ते १९४५ या कालावधीत कोरियाच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली खरी, पण जपानी राजवटीचा खरा उद्देश हा कोरियाच्या साधनसंपत्तीची लूट हाच होता. सुमारे आठ ते दहा लाख लोकांना आपलं राहतं गाव सोडून, सक्तीनं जपानमध्ये शारीरिक श्रमांच्या कामांसाठी स्थलांतर करावं लागलं. दुसऱ्या महायुद्धाचा जगड्व्याळ गाडा चालवण्यासाठी जपानला हा मानवी कच्चा माल अत्यावश्यक होता. अपुरं वेतन, प्रचंड शारीरिक कष्ट, जपानी समाजात मिळणारी दुय्यम वागणूक, कोरियन ओळख पुसून टाकण्यासाठी सरकारी पातळीवर चालणारे अविरत प्रयत्न आणि भरीस भर म्हणजे, दुसऱ्या महायुद्धामुळे उद्भवलेली हलाखीची परिस्थिती या साऱ्याला तोंड देत हे लोक तगून राहिले.
‘फ्लॅशलाइट’ कादंबरीतलं एक मुख्य पात्र सर्क अशाच एका जपानस्थित कोरियन कुटुंबात जन्मलेला थोरला मुलगा. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं, ते १९३९ त्याचं जन्मवर्ष. जपानीकरणाच्या लाटेत पालकांनी त्याचं मूळचं कोरियन नाव सॉक ( Seok) बदलून हिरोशी असं ठेवलेलं. शाळेतही जपानी दृष्टिकोनातून इतिहास आणि भूगोल (उदा. जपान आणि कोरिया यांच्या दरम्यान असणाऱ्या जलभागाला तो कोरियनांप्रमाणे ‘ईस्ट सी’ (पूर्व समुद्र) न म्हणता, ‘सी ऑफ जपान’ म्हणतो), आणि जपानी भाषाशिक्षण यांचा इतका अविरत मारा होत असतो, की त्याची स्वप्रतिमा ही हिरोशीनामक जपानी मुलाची असते.
पुढे, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, कोरियाला स्वातंत्र्य मिळतं खरं – पण ते फाळणीच्या शापासह. आधी पूर्वेला जपान आणि पश्चिमेला चीन अशा कचाट्यात सापडलेला कोरिया आता अमेरिकेच्या प्रभावाखालचा दक्षिण कोरिया आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या कक्षेतला उत्तर कोरिया अशा सर्वस्वी निराळ्या अक्षावर दुभागला जातो.
द्वीपकल्प म्हणजे पाण्याने तीन बाजूंनी वेढलेली जमीन, म्हणजे जवळजवळ बेटच. संस्कृतमध्ये द्वीप म्हणजे बेट, कल्प म्हणजे कल्पिलेले. इंग्रजीतला समानार्थी ‘पेनिन्सुला’ हा शब्दही लॅटिन paene (जवळजवळ) आणि insula (बेट) या दोन शब्दांनी तयार झालेला. (अवांतर: ‘आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स’ हा पेशीसमूह, साखरेचं नियंत्रण करणारं जे संप्रेरक तयार करतो; त्याचं नाव ‘इन्सुलिन’ हेही या पेशींच्या स्वादुपिंडातील बेटसदृश अस्तित्वावर आधारित). याचंच मानवीकरण म्हणजे अलम दुनियेपासून फटकून राहणाऱ्या, कोत्या मनोवृत्तीच्या व्यक्तीला ‘इन्सुलर’ म्हणणं.
जॉन डन या सतराव्या शतकातील कवीची ‘नो मॅन इज अॅन आयलंड’ ही ओळ या संदर्भात आठवावी. कोणतीही व्यक्ती पूर्णत: स्वयंभू नसली, तरी काहींना चिनी समाजासारखा स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची ओळख पुसून टाकणारा एकजिनसीपणा आवडतो; तर काहींचा कल हा अठराव्या शतकातल्या बेटावरल्या जपानी समाजाप्रमाणे ‘अखंड येकान्त सेवावा’ या समर्थोक्तीकडे झुकणारा. बहुसंख्य लोक मात्र ‘काही एकान्त, काही गल्बला’ या द्वीपकल्पासारखे – म्हटलं तर समाजाशी सांधा जोडून असणारे, पण प्रसंगी तितकेच एकांतप्रियही. पण मोजके काही, कोरियन द्वीपकल्पासारखे, दुभंगलेल्या ओळखींचे आणि व्यक्तिमत्त्वाचे!
कादंबरीतला विखंडितपणा…
हे दुभंगाचं सूत्र, ‘फ्लॅशलाइट’च्या कथानकातून सतत जाणवत राहतं. जपानमध्ये वाढलेल्या हिरोशीला त्याचं सॉक हे कोरियन नाव अनोळखी वाटतं. कोरियन स्वातंत्र्य चळवळीला बळ आल्यामुळे, त्याच्या धाकट्या भावंडांना, राहत्या वसाहतीत आणि घरी कोरियन भाषेचे धडे मिळू लागलेले असतात. पुढे युद्धानंतर, प्रचाराला बळी पडून सॉक वगळता उर्वरित कुटुंब उत्तर कोरियाला स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतं. जपानमध्येच मागे राहिलेला सॉक, पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचा निर्णय घेतो आणि पुनश्च नाव बदलून सॉकचा सर्क होतो. सत्तरीच्या दशकात, एका अमेरिकी विद्यापीठात, प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या सर्कची स्वत:बद्दलची ओळख वारशाने कोरियन, संगोपनाने जपानी आणि वास्तव्याने अमेरिकन अशी त्रिधा, व्यामिश्र आहे.
केवळ सर्कच नव्हे तर सर्कची अमेरिकी पत्नी अॅन, त्यांना झालेली मुलगी लुईसा आणि लग्नापूर्वी, अन्य एका प्रेमप्रकरणातून वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी जन्मलेला आणि त्याच्या वडिलांकडे वाढणारा अॅनचा मुलगा टोबायस, या साऱ्यांनाच कमीअधिक फरकाने, ही जोडलेपण आणि तुटलेपण यांच्या अधली-मधली त्रिशंकू अवस्था; स्वत:ची नेमकी ओळख प्रस्थापित करण्याची धडपड आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, बदलत जाणाऱ्या नातेसंबंधांतून उद्भवणारी अनपेक्षित गुंतागुंत भेडसावत राहते.
कादंबरीतला सर्क (ऊर्फ सॉक, ऊर्फ हिरोशी) हा सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात त्याच्या विद्यापीठातर्फे, काही काळ जपानला परतला आहे. त्याच्यासह त्याची पत्नी अॅन आणि दहा वर्षांची मुलगी लुईसा, हेही आहेत. लुईसाला नवीन देशात, नवीन भाषा शिकताना शाळेत त्रास होतोच- शिवाय तिची उंची, बोलण्या-चालण्यातल्या खास अमेरिकी लकबी आणि उच्चार शाळेबाहेर वावरतानाही ठसठशीतपणे वेगळेा उठून दिसतात. मुलीच्या जातीने ताठ चालू नये, नजर शक्यतो खाली असावी, फोटोसाठी हसतानाही बेतशीर मर्यादित हसावं यांसारख्या अलिखित नियमांशी ती जुळवून घ्यायचा प्रयत्न करते; पण त्यांचा जाच हा होतोच.
सर्कची पत्नी अॅनचा आपल्या मूळच्या अमेरिकी कुटुंबाशी फारसा संबंध राहिलेला नाही. आता परक्या देशात राहताना येणारा एकटेपणा, वाढत्या वयाच्या मुलीच्या स्वतंत्र आणि बंडखोर वागण्याने अधिक गडद होत जातो. तशातच काही अनिष्ट व्याधीची चाहूल लागली असली, तरी नेमके निदान होत नसल्याने तिची मानसिक व शारीरिक कुचंबणा दिवसेंदिवस वाढत जाते. लग्नापूर्वी जन्मलेल्या टोबायसचं संगोपन सोडा, पण त्याचं लहानपणही आपल्याला पाहता आलं नाही ही सततची टोचणी असतेच.
या कोंडीतून सुटका म्हणून सर्क, अॅन आणि लुईसा जपानमधल्या एका समुद्रकिनाऱ्यावरच्या गावी उन्हाळ्यातले काही दिवस राहायला येतात. एका संध्याकाळी, अॅन प्रकृतिअस्वास्थ्यामुळे कॉटेजमध्येच राहते; तर सर्क आणि लुईसा किनाऱ्यावर भटकायला बाहेर पडतात. सर्कला पोहायला येत नसतं, पण तो खबरदारी म्हणून सोबत विजेरी (फ्लॅशलाइट) बाळगतो. सरावाचा रस्ता असूनही ते दोघे वेळेवर परतत नाहीत – आणि शोधपथकाला किनाऱ्यावर लुईसा सापडते ती जेमतेम धुगधुगी असलेली आणि नखशिखांत भिजलेली. सर्क बेपत्ता असतो, केवळ त्यानं घेतलेली विजेरी तेवढी सापडते.
कादंबरीची सुरुवात या नाट्यमय घटनेने होते आणि कथानक काळाच्या आणि तीन पिढ्यांच्या संदर्भात पुढे-मागे होत, निरनिराळ्या पात्रांच्या परिप्रेक्ष्यातून आकार घेतं. त्यातले तपशील, संदिग्धता-रहस्य-उलगडा हे सारं मुळातून वाचण्याजोगं. (समीक्षा म्हटली की अथपासून इतिपर्यंत कथानक सांगून टाकायचं, हा घातक पायंडा पडू लागला आहे असं काही वेळेला वाटतं, ते इथं कटाक्षानं टाळलं आहे.)
‘द न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकात सुमारे पाच वर्षांपूर्वी, सुझन चॉयने याच शीर्षकाखाली लघुकथा लिहिली होती. वयाच्या दहाव्या वर्षी बाप गमावलेली, आईशी मुद्दाम तुसडेपणाने वागू लागलेली लुईसा प्रथम अनिच्छेने आणि मग मोकळेपणाने मानसोपचारतज्ज्ञाशी संवाद साधू लागते, अशी साधारण त्या कथेची रूपरेषा सांगता येईल. त्या कथेचा ‘फ्लॅशलाइट’ कादंबरी हा विस्तार आहे. (सशक्त कथेसाठी असं व्यासपीठ उपलब्ध असणं, हे किती महत्त्वाचं आहे, याचंच हे एक उदाहरण. मराठीतही आता ‘भास’ या अनियतकालिकासारखे कथाकेंद्री प्रयोग होत आहेत, ही एक आश्वस्त करणारी बाब!)
विजेरीचा झोत जसा क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात, आसपासच्या अंधाऱ्या जगाची आपल्याला तुकड्यातुकड्याने, मर्यादित माहिती करून देतो – तसंच ‘फ्लॅशलाइट’चं कथानक काळाच्या पट्ट्यावर पुढे-मागे होत, निरनिराळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनांतून उलगडत जातं. एकच घटना निरनिराळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे स्मरणात राहते, तिचा अन्वयार्थ ते आपापल्या मगदुराप्रमाणे वेगवेगळा लावतात – यामुळे निर्माण होणारा विखंडितपणा; ज्याच्या-त्याच्या नजरेची अंगभूत मर्यादा तसंच वयोमानपरत्वे त्यात होणारे बदल आणि या साऱ्यांमुळे कथनात उद्भवणारी संदिग्धता अधोरेखित करणं, हे या कादंबरीचं बलस्थान आहे. (इथे ‘राशोमॉन’ या चित्रपटाची आठवण होणं अपरिहार्य). अर्थात, काही वेळेला या तंत्रामागचे परिश्रम आणि लेखनकामाठी (उदा. विजेरीच्या रूपकाचा कादंबरीत अनेकदा होणारा वापर अधिक सूचकपणे, तरलपणे यायला हवा होता) उघड होते, हा भाग अलाहिदा!
या लेखाच्या शीर्षकात उद्धृत केलेल्या, रॉय किणीकरांच्या प्रसिद्ध रुबाईत म्हटल्याप्रमाणे, आपलं व्यक्तिमत्त्व नेमकं कोणत्या घटकांनी बनलेलं आहे; आपण जिथे जन्मलो-वाढलो-राहिलो त्या प्रदेशाचा या जडणघडणीत वाटा किती आणि ऐच्छिक कारणांनी असो वा अपरिहार्य, स्थलांतरामुळे त्यात संभवणारे बदल किती, हे प्रश्न सनातन आहेत. (पाहा, त्याच रुबाईतल्या पुढच्या ओळी: ‘ते जुने प्रश्न आणि जुनाच त्यांचा वाण, प्राचीन तिरडिला नव्या सुतळिचा ताण!’).
महायुद्धासारख्या वा स्थलांतरासारख्या सामान्य माणसाचं जीवन आमूलाग्र ढवळून टाकणाऱ्या मोठ्या घटना असोत, वा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या न्यायाप्रमाणे प्रत्येकाच्याच वैयक्तिक आयुष्यातले, मागे वळून पाहता किरकोळ वाटणारे ताणतणाव असोत – यांचा, या सतत चाललेल्या शोधावर काय परिणाम होतो; याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न टॉलस्टॉयपासून अरुंधती रॉयपर्यंत अनेकांनी केला आहे. सुझन चॉय यांची ‘फ्लॅशलाइट’ ही कादंबरी याच शाश्वत शोधावर, काही निराळ्या कोनांतून प्रकाशझोत पाडणारी!
‘बुकरायण’ या नैमित्तिक सदरातला हा लेख या वर्षीचा अखेरचा. ‘बुकर पारितोषिका’चा अंतिम निकाल येत्या सोमवारी (भारतीय वेळेनुसार ११ नोव्हेंबरला मंगळवारच्या पहाटे) जाहीर होणार आहे.
‘फ्लॅशलाइट’लेखिका : सुझन चॉय
प्रकाशक : पेंग्विन रॅण्डम हाउस
पृष्ठे : ४६४ ; किंमत : ८९९ रु.
(nandan27 @gmail. com)
