पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून दिल्लीत चर्चा फक्त युद्ध होणार, की नाही यापुरतीच मर्यादित होऊ लागली आहे. सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले जात आहेत किंवा रद्द केले जात आहेत. क्वचित एखादा जाहीर कार्यक्रम होताना दिसतो. असाच एक कार्यक्रम शुक्रवारी नवीन महाराष्ट्र सदनामध्ये झाला. म्हटलं तर हा राजकीय कार्यक्रम होता कारण तिथं आलेली मंडळी राजकीय होती. पण, हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनामध्ये झाल्यामुळं त्याला काहीसं खासगी स्वरूपही आलं असं म्हणता येईल. अन्यथा राजकीय कार्यक्रम कॉन्स्टिट्युशन क्लब वगैरे प्रमुख ठिकाणी होत असतात. हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनात झाला असला तरी, त्याचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नव्हता. सदनामध्ये क्वचित प्रसंगी अमराठी लोकांचे कार्यक्रम होतात, त्यातील हा एक म्हणता येईल. दिल्लीमध्ये प्रत्येक राज्याचं सदन वा भवन असलं तरी, महाराष्ट्र सदनाइतकी सुंदर आणि भव्य इमारत कोणत्याही राज्याकडं नाही. त्यामुळं महाराष्ट्र सदनाचं अनेकांना आकर्षण असतं. काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र सदनामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या वेळी ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहांनी मुख्यमंत्र्यांच्या कक्षात बसून भाजपच्या नेत्यांची ‘हजेरी’ घेतली होती! त्यानंतर संघाचीही महत्त्वाची आढावा बैठक सदनामध्ये झाली होती. संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना सदनामध्ये बोलवलं होतं, त्यांच्याकडून कामाचा आढावा घेतला होता. त्यामुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी सदनामध्ये रांग लावली होती. निर्मला सीतारामन, पीयूष गोयल वगैरे मंत्री संघाच्या नेत्यांनी दिलेल्या वेळेला सदनात हजर राहिले होते. अलीकडं संघ वा भाजपच्या बैठका महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या नाहीत. महाराष्ट्रातील नेत्यांचे जाहीर कार्यक्रम महाराष्ट्र सदनामध्ये होत असतात. काही कार्यक्रम राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरतात. काही कार्यक्रमांना भावनिक स्वरूप प्राप्त होतं. सदनात शुक्रवारी झालेला कार्यक्रम भाजपचे नेते बंडारू दत्तात्रेय यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा होता. दत्तात्रेय मागासवर्गीय समाजातून आलेले आहेत. ते तळागाळातून नेतेपदापर्यंत पोहोचले आहेत. जुन्या भाजपच्या पठडीमध्ये बसणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. ते संघाचे प्रचारक होते. संघामध्ये विचार पक्के केल्यानंतर ते भाजपमध्ये आले. संयुक्त आंध्र प्रदेशमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले. तीन वेळा खासदार झाले. मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. मग, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले. सध्या ते हरियाणाचे राज्यपाल आहेत. वाजपेयी-अडवाणींचा काळ पाहिलेल्या, राजकारणात अजूनही सक्रिय असलेल्या अपवादात्मक भाजप नेत्यांपैकी बंडारू दत्तात्रेय म्हणता येतील. त्यांच्या ‘जनता की कहानी-मेरी आत्मकथा’ या आत्मचरित्राचं प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते झालं. त्या निमित्ताने धनखड पहिल्यांदाच महाराष्ट्र सदनामध्ये आले असतील. ‘ऑपरेशन सिंदूर’ होत असतानादेखील कार्यक्रमाला बडी राजकीय मंडळी आलेली होती, त्यावरून या कार्यक्रमाचं महत्त्व समजू शकेल. हरियाणाचे आजी-माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, बिहारचे राज्यपाल, भाजपचे खासदार अशी तमाम मंडळी महाराष्ट्र सदनात हजर होती.
अहोरात्र कार्यरत विभाग
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतल्यापासून केंद्राच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या ‘पीआयबी फॅक्टचेक’ विभागाला अहोरात्र काम करावं लागतंय. या विभागाकडं मोदी सरकारपूर्वी फारसं कोणी लक्ष दिलं नव्हतं. पण, केंद्रात मोदी सरकार आल्यापासून एखादं वृत्त अचूक आहे, की नाही यावर हा विभाग शिक्कामोर्तब करतो. सरकारच्या विरोधात दिलेलं वृत्त खोटं आहे असं सरकारचाच विभाग म्हणणार असेल तर या विभागाची विश्वासार्हता काय, असा प्रश्न त्याच्याबाबतीत केला गेला होता. करोनाकाळात अनेक अफवा पसरवल्या जात होत्या, तेव्हा या विभागाकडून खोट्या वृत्तांबाबत खुलासा केला जात असे. त्याचा लोकांना उपयोगही झाला. त्यामुळं आपत्कालीन परिस्थितीमध्ये ‘पीआयबी फॅक्टचेक’ विभाग उपयुक्त ठरू शकतो हे लक्षात आलं. आत्ता पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली जात असताना समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असताना, हाच विभाग अफवांचा भांडाफोड करत आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रसारमाध्यमांना अक्षरश: तासा-तासाला ‘पीबीआय फॅक्टचेक’चे संदेश पाठवले जात आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत या विभागाकडून १०-१५ संदेश पाठवले गेले, त्यातून भारतासंदर्भातील अत्यंत खोट्या, बनावट माहितीचं खंडन केलं गेलं. अफवा पसरवणारे अनेक संदेश भारतीय वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाचे बनावट फलक तयार करून दिशाभूल करत आहेत. त्यातील एकही बातमी भारतातील मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांनी वा त्यांच्या संकेतस्थळांनी दिलेली नव्हती. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या गेल्यामुळं ‘पीआयबी फॅक्टचेक’ला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. दररोज १०-१२ अफवांची पोलखोल करणारे संदेश हा विभाग पाठवत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कथित फेसबुक खात्यावरून पाकिस्तान सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अफवा पसरवली गेली होती. वास्तविक डोभाल यांचे फेसबुक खातेच नाही. समाजमाध्यमांवरील बहुसंख्य अफवा पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत, त्यापैकी अनेक ‘एक्स’ वा फेसबुुक पेजवर उर्दूमध्ये संदेश लिहिलेला आढळला आहे. पाकिस्तानकडून प्रसारित झालेल्या दोन डझनहून अधिक अफवांचे वास्तव ‘पीआयबी फॅक्टचेक’ विभागाने लोकांसमोर मांडले आहे. खऱ्या-खोट्याची शहानिशा करायची असेल तर या विभागाच्या एक्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम यांची समाजमाध्यम खाती लोकांना पाहता येऊ शकतील.
आता मोहीम भाजप अध्यक्ष
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपल्यानं आता भाजपला निवडणुकांच्या मागं लागता येईल. बिहारमधील विधानसभा निवडणूक अजून लांब आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल. पण त्याआधीच केंद्र सरकारने जातगणनेची घोषणा करून प्रचाराला सुरुवात तर केलीच होती. पण, भाजपसाठी सर्वात मोठी निवडणूक असेल ती पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षासाठीची. भाजपचे नेते सांगत होते की, जानेवारीच्या अखेरीस नवा अध्यक्ष मिळणार. मग, दर आठवड्याला आणखी १५ दिवसांत होईल असं सांगितलं जात होतं. अधूनमधून संभाव्य नावंही चर्चेत ठेवली जात होती. त्यानंतर भाजपचे नेते सांगायला लागले होते की, एप्रिलअखेरीला नवा अध्यक्ष पद स्वीकारणारच. पण, तेवढ्यात पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि देशातील वातावरण बदललं. पण, तरीही पायउतार होणारे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सहा दिवसांपूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवांची बैठक घेतली होती. त्यामध्ये कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुका राहिल्या आहेत, राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीची तयारी झाली आहे का, या सगळ्याचा आढावा घेण्यात आला होता. भाजपने अजून राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या मोठ्या राज्यांमधील प्रदेश भाजपच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती झाल्यानंतर दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक होईल. या प्रक्रिया चालू आठवड्यापासून गती मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे.
जयशंकर हे सगळं कसं करतात?
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतरच्या दोन आठवड्यांच्या घडामोडींमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री प्रचंड व्यस्त होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सतत मंत्रालयामध्ये आपापल्या विभागाच्या बैठका घेत होते. राजनाथ सिंह सकाळी संरक्षण दलांचे प्रमुख आणि तीनही दलांचे प्रमुख यांच्याशी चर्चाशी करत होते. मग, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारी निवासस्थानी बैठकीमध्ये सहभागी होत. जयशंकर यांची वेगवेगळ्या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून चर्चा होत होती. त्यानंतर वेगवेगळ्या देशांचे परराष्ट्रमंत्री भारतात येऊन दाखल होत होते. त्यांच्याशी बैठका होत होत्या. प्रत्येक देशाला पाकिस्तान-भारत यांच्यातील संघर्ष थांबवायचा होता. त्यामुळं ते भारतात येऊन जयशंकर यांना भेटत असत. या गाठीभेटींची माहिती परराष्ट्र मंत्रालय ‘एक्स’वरून देत होतं. त्यामुळं भारताची बोलणी कोणत्या देशाच्या प्रतिनिधींबरोबर होत होती याची माहिती मिळत होती. ही माहिती परराष्ट्र खात्याने लपवून ठेवली नव्हती. हे दोन्ही मंत्री बैठकांबरोबरच काही आवश्यक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत होते. त्यांनी या कार्यक्रमांचा भारताची भूमिका मांडण्यासाठी चलाखीने वापर केला. पाकिस्तानच्या घडामोडींसंदर्भात चर्चा करत असताना युरोपियन देशांच्या समूहाचे शिष्टमंडळ भारतात आले होते. त्यांच्याशीही जयशंकर यांनी चर्चा केली. हे दोन्ही मंत्री इतके व्यस्त होते की, मोदींच्या विश्वासातील एका मंत्र्याने खासगीमध्ये बोलूनही दाखवले की, जयशंकर हे सगळं कसं करतात? याचा संदर्भ थोडा वेगळा होता. या मंत्र्यांना अलीकडं कामाच्या जबाबदाऱ्यांमुळं परदेश दौरे करावे लागत आहेत. ओस्लोला दहा-दहा तास बैठका करून कराराला अंतिम स्वरूप देऊन नव्या बैठकीसाठी दहा तासांचा प्रवास करून वेगळ्या देशात पोहोचायचं होतं. तिथले मंत्री दिलेल्या वेळेला या मंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. एक बैठक संपवून विमान पकडताना इतकी तारांबळ झाली की, पुढच्या बैठकीची वेळ निघून जाईल की काय अशी भीती होती. पण, वेळेत पोहोचले, करार केले आणि भारतात परत आले. अशी धावपळ एस. जयशंकर सातत्याने करत असतात. अमेरिकेचा दौरा करून येतात, दुसऱ्या दिवशी जपानला जातात. तिथून येऊन ते पश्चिम आशियाई देशांत जातात. मग, ब्रिटनमध्ये जातात. जयशंकर हे सगळं कसं करतात, असं आश्चर्यानं आणि कौतुकाने हे मंत्री खासगीत सांगत होते.