कालयंत्रातून प्रवास करणाऱ्या ओटीटी फलाटांवरल्या मालिकांनी सांप्रतकाळी अनेकांवर भुरळ घातली असली, तरी कथांमधून इतिहास रचणाऱ्या पुस्तकांमध्ये कालप्रवास करण्याची क्षमता आद्य मानावी लागेल. जर्मनीची ‘डार्क’, ब्रिटनमधील ‘बॉडीज’ या कालप्रवासी मालिकांसारखे कथानक मरहट्ट वाचक भूमीवर घडवायचे झाल्यास पटकथाकारांना नारायण हरी आपटे यांच्या न पटणारी गोष्ट, सुखाचा मूलमंत्र, पहाटेपूर्वीचा काळोख या कादंबऱ्या, गो. ना. दातारांच्या ‘अध:पात’, ‘प्रवाळदीप’, किंवा काशीबाई कानिटकर यांच्या ‘चांदण्यातील गप्पा’, ‘रंगराव’ आदी कथा-कादंबऱ्यांची पारायणे शतकापूर्वीचा समाज जाणून घेण्यासाठी करावी लागतील. पण शतकानंतर या कथा-कादंबऱ्यांचे वाचन (या दशकातील मराठी पुस्तकांबाबतही वाचनअनास्था अजरामर असताना) भाषाबदल, संस्कृतीबदल आणि जगण्यातील बदलांमुळे अवघड बनून जाते. दातारांच्या कादंबऱ्यांच्या स्वस्त आवृत्त्या फडताळात मिरविण्यासाठी किंवा रद्दी दुकानांत जिरवण्यासाठी तयार होतात का, असा प्रश्न आहे. पण तिकडे नॉर्वेमध्ये ‘फ्युचर लायब्ररी’ हा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. त्यांना आज लिहिणाऱ्या निवडक दहा लेखक-लेखिकांची पुस्तके १०० वर्षांनंतर प्रकाशित करायची आहेत. म्हणजे दर वर्षी निवडलेल्या एका लेखकाने हस्तलिखित आज द्यायचे, ते पुस्तकरूपाने १०० वर्षांनी तयार होणार. तोवर वाचनभाषा-संस्कृती आणि जगणे बदलण्याची तमा त्यांना बिलकूल नाही!

हा प्रकल्प २०१४ ते २११४ असा चालणार आहे. त्यासाठी हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्याच झाडांपासून तयार झालेला कागद हा या पुस्तकांना वापरला जाईल. नुकतीच व्हलेरिया ल्युसेली या मेक्सिकन लेखिकेच्या नव्या कादंबरीचे हस्तलिखित या प्रकल्पासाठी निवडण्यात आल्यामुळे हा प्रकल्प पुन्हा बातमीझोतात आला.

old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
lokmanas
लोकमानस: सरकारचे घुसखोरीला प्रोत्साहन?

हेही वाचा >>> सर्वाधिक लिहिता-लिहिले गेलेला मुत्सद्दी!

ही व्हलेरिया ल्युसेली कोण? तर तिशी-पस्तिशीतच आंतरराष्ट्रीय सन्मानांची माळ मिळालेली मेक्सिकन कथा-कादंबरीकार. ‘फेसेस इन द क्राऊड’, ‘द स्टोरी ऑफ माय टीथ’, ‘लॉस्ट चिल्ड्रन अर्काइव्ह’ या कादंबऱ्या आणि दोन निबंधांची पुस्तके इतका इंग्रजीत अनुवाद होऊन आलेला तिचा लेखनऐवज असला तरी त्यातील गुणवत्तेद्वारे ती ‘ग्लोबल’ बनली आहे. आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक बाब आहे. राजदूत दाम्पत्याचे अपत्य असल्याने दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि जाणतेपणाचा बराच काळ ती भारतात होती. पुण्याजवळील एका आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात तिचे शिक्षण झाले आहे. तत्त्वज्ञान या विषयातील पदवी तिने मेक्सिकोतून घेतली असली, तरी त्याचा पाया भारतातील शाळेतल्या शिक्षकांमुळे घडला असल्याचे तिने अनेक मुलाखतींतून स्पष्ट केले आहे. पण तिच्या कथन साहित्यात इथला भाग अद्याप नाही. ‘फ्युचर लायब्ररी’साठी दृश्यकलावंत केटी पॅटरसन यांच्या आमंत्रणानुसार तिने नव्या-कोऱ्या कादंबरीचे हस्तलिखित दाखल केले. मार्गारेट अ‍ॅटवूड, कार्ल ओव्ह कनौसगार्ड, डेव्हिड मिचेल, एलिफ शफाक, हान कांग आदी अत्यंत गाजलेल्या आणि बोली लावून प्रकाशकांना पुस्तक विकले जाण्याची क्षमता असलेल्या लेखकांनी आपल्या हस्तलिखितांना या प्रकल्पासाठी गेल्या दहा वर्षांत दिले. यांपैकी सर्वात तरुण असलेल्या व्हलेरिया ल्युसेली या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची घटका पाहण्यासाठी या जगात उरल्या तर १३१  वर्षांच्या असतील. म्हणजेच, या लेखकांच्या वंशजांनाच या पुस्तकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ‘माझ्या नातीला किंवा पणतीला माझी ही कादंबरी वाचता येईल. पण भविष्यातील वाचकांना माझ्या वर्तमानातील भाग सांगण्यासाठी या प्रकल्पाचा भाग मी होत आहे.’ असे ल्युसेली यांनी स्पष्ट केले. ओस्लो येथील सार्वजनिक वाचनालयात ही सारी हस्तलिखिते शंभर वर्षे अ-वाचित अवस्थेत जतन करण्यासाठी विशेष दालन करण्यात आले आहे. मुद्दा हा की शंभर वर्षांनंतर बदललेली ग्रंथसंस्कृती, तंत्रज्ञानसंस्कृती आणि जगण्याच्या मितीत वाचनाविषयी असोशी कशी असेल, याचा अंदाज करता येणार नाही. नव्वदीच्या दशकात ‘किंडल’ आणि ‘ईबुक’ची कल्पनाही नव्हती. गेल्या दशकभरात त्यामुळे बदललेल्या वाचन व्यवहारातील उलाढाल कल्पनातीत आहे. त्यामुळे या प्रयोगी प्रकल्पाचे यश-अपयश पाहण्यासाठी नेटफ्लिक्सधारी मालिकांतील कालप्रवासी कथानक खऱ्या आयुष्यात घडण्याइतपत वैज्ञानिक प्रगती आवश्यक आहे.