उन्माद आणि आत्मविश्वास यांच्यातील सीमारेषा खूप पुसट असते. आत्मविश्वासाला विनयाची जोड नसेल, तर तो भरकटतो आणि त्याची जागा उन्माद घेतो. ‘आमच्याशिवाय आहेच कोण’ या खुळचट भावनेने मनाचा ताबा घेतला, की बाकी सारेच क्षुल्लक भासू लागतात. यश ही जणू आपली वैयक्तिक मत्ता असल्याची भावना घट्ट रुजते. आपणच श्रेष्ठ असताना नि बाकीचे क्षुल्लक असताना, अशा परिप्रेक्ष्यात काही गोष्टी मनाजोगत्या होऊ लागल्या नाहीत, की मानसिक तोल ढळू लागतो. या मन:स्थितीत स्वत:कडून चुका होऊ लागतातच, पण या चुकांसाठी दुसऱ्यांना निष्कारण जबाबदार धरण्याची सवय जडते. भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या बाबतीत सध्या असेच काहीसे घडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने तिच्यावर बांगलादेश दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात केलेल्या कृत्यांबद्दल दोन सामन्यांची बंदी आणि ७५ टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला. बांगलादेश दौऱ्यावर टी-२० मालिकेत भारतीय संघ २-१ असा जिंकला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, कारण निर्णायक तिसरा सामनाही बरोबरीत (टाय) सुटला. या निर्णायक सामन्यात हरमनप्रीतला मोक्याच्या क्षणी पंचांनी बाद ठरवले. तो निर्णय तिला पटला नाही आणि तिने प्रथम बॅटच्या साह्याने यष्टी उद्ध्वस्त केल्या. पंचांशी हुज्जत घातली. पॅव्हेलियनमध्ये परतताना प्रेक्षकांच्या दिशेने आक्षेपार्ह अंगुलीनिर्देश केला. ही मालिका बरोबरीत सुटल्यामुळे विजेत्यांचा चषक स्वीकारण्यासाठी दोन्ही संघांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी हरमनप्रीत कौरने कुत्सितपणे, बांगलादेशच्या क्रिकेटपटूंबरोबरच पंचांनीही तो स्वीकारण्यासाठी पुढे यावे, अशी खूण पंचांना केली.
ही सारी वर्तनमालिका जवळपास प्रत्येक टप्प्यावर आक्षेपार्ह ठरते. पराभव पचवण्याची क्षमताच नसलेल्या खुज्या मनोवृत्तीचे दर्शन तिच्यातून ठायीठायी घडते. बांगलादेशचा संघ किमान एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताच्या फार मागे नाही, त्यामुळे त्यांनी चुरशीने खेळून एखादी मालिका वाचवली वा एखादा सामना जिंकला, तर त्याबद्दल एवढे वैषम्य वाटण्याचे काही कारण नाही. दुसरी बाब पंचांकडून झालेल्या कथित चुकांची. त्या झाल्या असतीलही. परंतु चुका करणारे संबंधित पंच पहिले नव्हेत आणि शेवटचेही नसतील. शिवाय पंचांच्या दर्जाबाबत भारतीय क्रिकेटपटूंनी फार वरच्या आवाजात बोलण्याची गरज नाही. आयसीसीसाठी सर्वाधिक महसुलाची तजवीज करणाऱ्या, पण त्या महसुलातील परतावाही सर्वाधिक ओरपणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आपल्याकडे उत्तम पंच निर्मितीसाठी कधीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे बहुतेक प्रमुख देशांच्या तुलनेत आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्यल्प पंच तयार होतात, हे वास्तव कोणीतरी हरमनप्रीतसमोर मांडण्याची गरज आहे.
बांगलादेशातील कृत्यांसाठी सामनाधिकाऱ्यांनी हरमनप्रीतवर चार ‘गैरकृत्य कलमे’ लावली. यांतील पहिली तीन मैदानावरील सामानाची (यष्टी) नासधूस केल्याबद्दल आणि चौथे पंचांच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केल्याबद्दलचे होते. चार ते सात ‘गैरकृत्य कलमे’ आयसीसी शिस्तपालन संहितेनुसार दोन ‘निलंबन कलमां’च्या बरोबरीची ठरतात. म्हणजे स्तर-२ प्रकारातील शिस्तभंग. तो करणाऱ्यांना एक कसोटी सामना किंवा दोन एकदिवसीय सामने किंवा दोन टी-२० सामन्यांसाठी निलंबित केले जाते. हरमनप्रीतच्या बाबतीत आयसीसीने बांगलादेशातील सामनाधिकाऱ्यांच्या शिफारशी स्वीकारल्या. त्यामुळे अशी कारवाई होणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. विक्रमवीर क्रिकेटपटूंच्या आपल्या देशात असा विक्रम घडून येणेच जणू बाकी राहिले होते!
या मुद्दय़ावर हरमनप्रीतबरोबरच येथील क्रिकेट धुरीणांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हरमनप्रीत कौरने याहीपूर्वी आदळआपट केलेली आहे. तिचा स्वभाव आक्रमक आहे वगैरे ठीक. पण या आक्रमकतेचे प्रदर्शन खेळातून होणे अपेक्षित आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड असे क्रिकेटपटू फार प्राचीन काळात होऊन गेलेले नाहीत. पंचांचा निर्णय न पटल्यास काय करावे, याविषयी यांचे मार्गदर्शन घ्यावे. महेंद्रसिंह धोनी हा तर अलीकडचाच. त्याच्याशीही बोलायला हरकत नाही. हरमनप्रीत कौरच्या कृतीतून क्रिकेटमधील अभिजनवादाचेही दर्शन घडते. असा अभिजनवाद केव्हाही आक्षेपार्हच. पण गाठीशी काही नसताना, त्याचे प्रदर्शन थेट हास्यास्पद ठरते. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी ऑस्ट्रेलियन संघातील क्रिकेटपटू कधीही अशा प्रकारे वागताना दिसत नाहीत. हरमनप्रीतच्या कृतीतून क्रिकेटमधील खेळभावनेचे उल्लंघन झालेच. पण एक कर्णधार या नात्याने तिने अधिक संयम आणि परिपक्वता दाखवण्याची गरज होती. तो न दाखवता, क्रिकेट आणि देशाची प्रतिमा डागाळल्याबद्दल तिला आयसीसीपाठोपाठ बीसीसीआयनेही शासन करण्याची गरज आहे.