डॉ. उज्ज्वला दळवी

थायरॉइडशी संबंधित त्रास आपल्या देशात सव्वाचार कोटी जणांना असले, तरी काही जणांमध्ये हे त्रास जीवघेणे ठरू शकतात ते का?

Smart and Prepaid Electricity Meters
स्मार्ट व प्रीपेड वीज मीटर: वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हवा
pension issue p Chidambaram loksatta article,
समोरच्या बाकावरून: कशी फोडणार निवृत्तिवेतनाची कोंडी?
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: राष्ट्रपतींचे भाष्य लक्षणीयच, पण…
the world after gaza marathi article
बुकबातमी: पंकज मिश्रांबद्दलची मतं काहीही असोत…
loksatta article on Bermuda Triangle
भूगोलाचा इतिहास: त्रिकोणी मिथक : बर्म्युडा ट्रँगल
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: शासकीय यंत्रणा कशालाच जबाबदार नाहीत?
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
constitution of india supreme court loksatta article
संविधानभान: संविधानाच्या तटबंदीचे संरक्षक

तिशीच्या मैनाबाईला आजकाल उगाचच चिंता, चिडचिड, भीती वाटे; विनाकारण रडू येई;  थकवा येई. छातीत धडधडे; हातपाय थरथर कापत; रात्री नीट झोप लागत नसे. महाबळेश्वरच्या थंडीतही तिचा उकाडय़ाने जीव जाई. अन्न पचण्यापूर्वीच आतडय़ाबाहेर जाई; जुलाब होत. पोटभर जेवूनही तिचं वजन घटलं होतं.

पंचविशीच्या दमयंतीला मैनासारखाच त्रास होता. पण त्याशिवाय तिचे डोळे एकाएकी बटबटीत झाले होते. ते खुपत, खाजत, लाल होत. पायाच्या गुडघ्या- घोटय़ामधल्या हाडावरची- नडगीवरची कातडीही जाडजाड झाली होती. गळय़ाकडेही एक उकडलेल्या मोठ्ठय़ा बटाटय़ासारखा गोळा आला होता.

चाळिशीला वेदांगीची पाळी अनियमित झाली. तिला थकवा, कामाची आणि विचारांचीही सुस्ती आली. तिची त्वचा कोरडी झाली. भूक लागेना; पोट साफ होईना. हातापायात गोळे येणं, मुंग्या येणं, अति थंडी वाजणं वगैरे तक्रारी होत्याच. ‘पाळी जात असावी,’ म्हणून तिने दुर्लक्ष केलं. मग तिचा आवाज घोगरा झाला; त्वचा जाड झाली; केस राठ-तुटके झाले; भुवया झडल्या; वजन वाढलं.

मैना आणि दमयंतीची थायरॉइड-गाठ बेसुमार काम करत होती (हायपर-थायरॉयडिझम). वेदांगीची तीच गाठ सुस्तावली होती (हायपो-थायरॉयडिझम). ‘थायरॉइड’ हा आजार नव्हे. ती आपल्या कंठातली, श्वासनलिकेच्या समोरची एक महत्त्वाची गाठ असते. तिनं फार कमी किंवा अति जास्त काम केलं तर आजार होतात. त्यांना आनुवंशिकतेचा थोडाफार हातभार लागतो.

थायरॉइड-गाठ काय काम करते? ती शरीरातल्या पेशींना कामाला लावते. कडाक्याच्या थंडीत शरीरात जास्त ऊब हवी असते; गर्भारपणी बाळाच्या जडणघडणीसाठी अधिक ऊर्जेची गरज असते; वयात येताना तर शरीरात क्रांतीच होते. तशा वेळी मेंदूच्या बुडाची पिटय़ूटरी नावाची सर्वाधिकारी गाठ थायरॉइडला ऊर्जा वाढवायची रासायनिक आज्ञा देते. मग थायरॉइड शरीरातल्या प्रत्येक पेशीसाठी, ‘‘अधिक काम करा!’’ असा आयोडिनयुक्त वटहुकूम काढते. मेंदू, हृदय, स्नायू सगळे झटून कामाला लागतात. एरवीदेखील थायरॉइडकाकू पेशींना आळसावायाला देत नाहीत; त्यांना सतत शिस्तीत कामात ठेवतात.

रक्ताच्या तपासात पिटय़ूटरीकडून येणारं आज्ञारसायन (टीएसएच) आणि थायरॉइडचं आयोडिनयुक्त आज्ञारसायन (थायरॉक्सिन) यांचं प्रमाण मोजता येतं. थायरॉइडचं काम तसं कमी-जास्त कशामुळे होतं? कधी कधी सर्वाधिकारी पिटय़ूटरी गाठच पिसाळते,  टीएसएचच्या भडिमाराने  थायरॉइडला  म्हणजेच, पर्यायाने सगळय़ा अवयवांना ताबडवते. कधी  थायरॉइडकाकूच  झपाटल्यासारख्या अति काम करतात- रासायनिक आसूड फटकारत सगळय़ा पेशींनाही निर्दयपणे राब-राब-राबवतात. मग त्यांना आवरायच्या धडपडीत पिटय़ूटरी स्वत:च्या टीएसएच-आज्ञा जवळजवळ बंदच करते.

मैनाच्या आणि दमयंतीच्या थायरॉइडने तशी बेबंदशाही माजवली होती. तिचं काम घटवायला कार्बिमॅझॉलसारखी औषधं असतात. ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली दीड-दोन वर्ष घ्यावी लागतात. बेफाम धावणाऱ्या हृदयाला शांत करायला वेगळी औषधं देतात. 

काही जंतूंशी लढताना आपली प्रतिकारशक्ती चवताळून आपल्याच अवयवांवर हल्ला चढवते. त्यामुळे ऑटोइम्यून थायरॉयडायटिस ऊर्फ आत्मघातकी थायरॉइड-प्रक्षोभ होतो. त्याच्यात थायरॉइडसोबत डोळय़ांमागच्या आणि त्वचेतल्या पेशींवरही हल्ला होतो. दमयंतीला तसा त्रास होता. तिच्या खुपऱ्या-बटबटीत डोळय़ांसाठी तिला स्टीरॉइड्स द्यावी लागली.

विषाणुसंसर्गाने किंवा आत्मघातकी प्रक्षोभाने थायरॉइडचं काम सुरुवातीला वाढतं; ते कमी करायला पिटय़ूटरी आपलं आज्ञा-टुमणं आवरतं घेते. रक्तातलं थायरॉक्सिन वाढतं; टीएसएच घटतं. रक्ताच्या तपासात प्रतिकारशक्तीच्या हल्ल्याची अस्त्रं (अँटीबॉडीज) मोठय़ा प्रमाणात सापडतात. प्रतिकारशक्तीच्या हल्ल्यामुळे थायरॉइडची नासधूस होते. तिचं काम कमीकमी होत कित्येकदा जन्मभरासाठी कमी, अपुरंच राहतं. ते वाढवायला पिटय़ूटरी टीएसएचचा भडिमार करते. ते प्रमाणाबाहेर वाढतं. त्या रुग्णांना थायरॉक्सिन बाहेरून द्यावं लागतं.

दमयंतीच्या गाठीचा आकारही वाढला होता. तशा ‘गळे’लठ्ठ थायरॉइडला गॉयटर म्हणतात. कधी कधी श्वासनलिकेवर- अन्ननलिकेवर गॉयटरचा दाब येऊन श्वास घेणं, घास गिळणं कठीण होतं. मग किरणोत्सारी आयोडिनने किंवा ऑपरेशनने त्याचा बंदोबस्त करावा लागतो. काही वेळा आपल्या आपणच अतिकामसू झालेली थायरॉइड औषधांना जुमानत नाही. मग त्या गाठीचा आकार वाढलेला नसला तरी तसेच टोकाचे उपाय योजावे लागतात. थायरॉइडच नष्ट केल्यावर बाहेरून थायरॉक्सिन देणं भागच पडतं.

वेदांगीला थायरॉइड आधीपासून आळसावलेली असल्यानं डॉक्टरांनी थायरॉक्सिन सुरू केलं. आज्ञारसायन बनवायला थायरॉइडला आयोडिनचा शिधा लागतो. पूर्वी भारतातल्या आहारात आयोडिनची कमतरता असे. पिटय़ूटरी ओरडत राही; राब-राब-राबून थायरॉइडचा आकार वाढे; पण पुरेसं थायरॉक्सिन तयार होत नसे. अनेकांना तसा गॉयटर होई. आता कायद्याने भारतातल्या मिठातच आयोडिन घातल्यामुळे ते कारण दूर झालं आहे.

कधी कधी थायरॉइडमध्ये टेंगळासारख्या, रायआवळय़ाएवढय़ा गाठी म्हणजेच नोडय़ूल्स तयार होतात. क्वचित नोडय़ूल्समध्ये कर्करोग उद्भवतो. म्हणून त्यांचा अल्ट्रासाउंड तपास आणि किरणोत्सारी आयोडिन वापरून केलेला सिंटिग्राफी हा तपास करतात. मग कर्करोगाचं निदान नक्की करायला अति बारीक सुईने नोडय़ूलचा चिमुकला तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यासतात.

चाळिशीच्या संहिताच्या गळय़ावर एक रायआवळय़ाएवढी, साधीशी गाठ आली. त्याच वेळी नवी नोकरी चालून आली. तिच्यासाठी केलेल्या मेडिकल तपासणीत त्या साळसूद गाठीच्या तुकडय़ाचा अभ्यास झाला. तो थायरॉइडचा कर्करोग निघाला. डॉक्टरांनी ती गाठ-थायरॉइड-आजूबाजूच्या इतर गाठी, सगळं ताबडतोब ऑपरेशनने काढून टाकलं. थायरॉइड पूर्णच निघाल्यामुळे थायरॉक्सिन कायमचं घ्यावं लागलं. संहिता २० वर्ष नित्यनेमाने थायरॉक्सिन घेत आहे. थायरॉइडचे बरेचसे कर्करोग वेळेवर काढून टाकले तर पुन्हा उद्भवत नाहीत.

भारतात सध्या सुमारे सव्वाचार कोटी लोकांना थायरॉइडशी संबंधित त्रास आहेत. थायरॉइडकाकूंच्या अतिकामसूपणापेक्षा त्यांचं आळसावणंच कितीतरी अधिक प्रमाणात लोकांना त्रास देतं. त्यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. गर्भधारणा; गरोदरपण पूर्णत्वाला जाणं; गर्भाच्या मेंदूची व्यवस्थित जडणघडण आणि वाढ होणं या साऱ्याला थायरॉइडकाकूंचा वरदहस्त गरजेचा असतो.

गरोदरपणात आईमध्ये  थायरॉक्सिनची  किंवा आयोडिनची कमतरता असल्यास बाळाच्या बुद्धीवर कायमचा परिणाम होऊ शकतो. आयोडिनचा भडिमार झाला; आईला थायरॉइडचा आत्मघातकी आजार झाला किंवा कार्बिमॅझॉलसारखी औषधं सुरू असतील तर बाळाची थायरॉइड ग्रंथी तात्पुरती सुस्तावते. तेवढय़ानेही बाळाची बुद्धी कायमची मंदावते. थायरॉइडच्या जन्मजात कमतरतेची इतरही कारणं आहेत. पाश्चात्त्य देशांत जन्मल्याजन्मल्या थायरॉइडची तपासणी केली जाते. भारतात अजून तशी होत नाही. उपचारांना अक्षम्य उशीर होतो.

भोवतालाकडून आणि नंतर अभ्यासातूनही मुलांचं शिक्षण होण्यासाठी थायरॉइडचं सुरळीत काम अत्यावश्यक असतं. भारतातल्या लहान मुलांतही थायरॉइडच्या कमतरतेचं प्रमाण मोठं आहे. त्याचं निदान वेळीच झालं नाही तर मेंदूच्या वाढीवर कायमचा परिणाम होऊ शकतो. म्हणून जागरूक राहणं अत्यावश्यक आहे.

मोठय़ा माणसांतही थायरॉइडचा अतिरेक किंवा त्याची अतीव कमतरता जीवघेणी ठरू शकते. म्हणून त्यांनीही थायरॉइड-समस्यांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच नेमकं निदान करून घ्यावं. थायरॉक्सिनच्या गोळीचा मोठा डोस घेतला तर हृदय वेडंवाकडं धावू शकतं. म्हणून थायरॉइड-कमतरतेसाठी  सुरुवातीला डॉक्टर लहान डोस देतात आणि सहा आठवडय़ांनी पुन्हा तपासणी करून गरज वाटली तर तो वाढवतात.

नॉर्मल थायरॉइड जन्मभर काम करते. ती काम करणार नसली तर थायरोक्सिनही जन्मभर घ्यायलाच हवं. गरोदरपण, आजारपण वगैरे कारणांमुळे जन्मभरात थायरोक्सिनची गरज कमी- जास्त होत राहते. म्हणून निदान वर्षांतून एकदा तपासणी करून योग्य डोस ठरवावा. उतारवयात टीएसएचचं रक्तातलं प्रमाण (नॉर्मल = ०.५-५.० यू/एल) थोडं वाढलेलं असतं. त्रास नसला तर त्यासाठी उगाचच उपचार घेऊ नयेत. १० यू/एलच्या वर गेलं तर मात्र उपचार घ्यावेतच. ठरलेला डोस रोज सकाळी रिकाम्यापोटी घ्यावा.  तसा योग्य डोस चालू असताना वजन वाढलं, थकवा आला, सुस्ती आली तर त्याचं खापर थायरॉइडच्या माथी फोडू नये. आपल्याआपण डोस वाढवून आपल्याच जिवाशी खेळू नये. थायरॉइड ही शरीरातल्या पेशींना उत्साहवर्धक रसायन पुरवणारी दुभती गाय आहे. ती भाकड झाली; दूर गेली तर बाहेरून योग्य रतीब लावता येतो. त्यात टंगळमंगळ, काटकसर करू नये.