राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांबद्दल असलेल्या कुतूहलाचं स्वरूपही अनेकदा ‘राजकीय’च असतं. म्हणजे, आत्मचरित्र लेखकानं विरोधी पक्षीय आणि स्वपक्षीय नेत्यांबद्दल काय म्हटलंय, तिला/त्याला एखाद्या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय का, एखादी गोष्ट झाली नसती तर बरं असं वाटतंय का, किंवा ‘इथे मी चूक नसूनही माझ्यावर खापर फोडण्यात आलं’ वगैरे बचाव केलाय का… याबद्दलचंच कुतूहल अधिक असतं. आत्मचरित्र लेखकाचं पुढलं राजकारण काय असणार, याबद्दलचे आडाखे आत्मचरित्रावरून बांधले जातात! मात्र न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या ‘अ डिफरंट काइण्ड ऑफ पॉवर’ या आगामी आत्मचरित्राला मिळणारा प्रतिसाद यापेक्षा नक्कीच निराळा असू शकतो. याची कारणं दोन.

एक तर, आत्ता त्या सक्रिय राजकारणात नाहीत. दुसरं म्हणजे, आपल्या पक्षात नसलेल्यांना किंवा खरं तर कुणालाही त्यांनी विरोधक मानलं नाही. सद्भावना, सहानुभाव आणि करुणा यांवर आधारित राजकारण मी करते आहे, असं जेसिंडा आर्डर्न यांनी पदावर असतानाही मुलाखतींत सांगितलं होतं. असले मोठमोठे शब्द वापरण्याचा भंपकपणा करणाऱ्या राजकारण्यांपैकी त्या नव्हेत, हे त्यांच्या कारकीर्दीतून दिसलं होतं! विशेषत: न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च या शहरातल्या मशिदीवर मार्च २०१९ मध्ये एका माथेफिरूनं गोळीबार करून ५१ जणांना ठार केलं, त्या घटनेनंतर देशाची आणि विविध समाजांची एकात्मता कायम असल्याचं आर्डर्न यांनी दाखवून दिलं होतं. हा गुन्हाच आहे, त्याचा ओरखडा आपल्या सामाजिक जीवनावर उमटू नये, यासाठी त्यांनी उचललेली पावलं आंतरराष्ट्रीय कौतुकाला पात्र ठरली होती. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, कोविड-मुक्तीसाठी त्यांनी केलेलं काम जगभरात नावाजलं गेल होतं.

वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान झाल्या. पुढल्या वर्षी त्यांनी मुलीला जन्म दिला. त्यांचं पारंपरिक लग्नचौकटीच्या बाहेरचं सहजीवन, राजकारणाच्या पुरुषी जगामध्ये ‘आई’ असण्यानं काय फरक पडतो याचं त्यांनी घडवलेलं दर्शन हे सामान्यांच्या कुतूहलाचा विषय जरूर झालं- पण त्यांच्या कामाविषयीच्या आदरानं नेहमीच या कुतूहलावर मात केली.

कारकीर्दीवर डाग नसताना, जगाला नुकती कुठे त्यांचा प्रभाव मान्य होत असताना आणि पुढे भरपूर आयुष्य असतानाही, अवघ्या सहा वर्षांत आर्डर्न यांनी पंतप्रधानपद सोडलं. तेही ‘आता नवं काही करू शकेन असं वाटत नाही’ यासारखं कारण देऊन! साधेपणा ही त्यांच्यासाठी दागिन्यासारखी मिरवण्याची गोष्ट नव्हती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी पुस्तकातही त्यांनी, न्यूझीलंडच्या लहान गावातली मुलगी ते देशाची पंतप्रधान हा प्रवास या आत्मचरित्रात सांगतानाच, नेतृत्वाची शाश्वत मूल्ये म्हणजे काय, ती का जपायची याचाही ऊहापोह या पुस्तकात आहे. हे ३५२ पानी आत्मचरित्र १२ जून रोजी प्रकाशित होईल, त्याच्या भारतीय आवृत्तीची छापील किंमत ८९९ रुपये आहे. तर येत्या ऑक्टोबरात आर्डर्न यांनीच मुलांसाठी लिहिलेलं ‘मम्स बिझी वर्क’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. जेसिंडा यांची मुलगी नीवे हिच्याशी त्यांच्या नात्याबद्दलची ही गोष्ट आहे. त्या ३७ पानी सचित्र (चित्रकर्ती- रूबी जोन्स) पुस्तकाची भारतीय आवृत्ती किंवा रुपयांतली किंमत मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.