बाराही महिन्यांमध्ये सर्वांत कमी दिवस. बाकी महिने ३० नाही तर ३१ दिवसांचे. हा एकटाच २८ दिवसांचा. बरं, बाकीचे सगळे महिने दर वर्षी तितक्याच दिवसांचे. पण हा मात्र लीप वर्ष असलं की २९ दिवसांचा नाही तर २८ दिवसांचा.
३१ दिवसांचा जानेवारी आणि ३१ दिवसांचा मार्च यांमधला तो २८ दिवसांचा फेब्रुवारी पाहिला की गाडीत मागच्या सीटवर दोन बाजूंना बसलेले दोन दांडगोबा आणि मध्ये अंग चोरून, गरीबडा होऊन बसलेला एखादा किरकोळ माणूस हेच दृश्य आठवतं. म्हणून, ‘बिच्चारा फेब्रुवारी’!
वर्षाचे बारा महिने आणि ३६५ दिवस. यांची महिनावार विभागणी कशी झाली आहे? ३१ दिवसांचे सात महिने, ३० दिवसांचे चार महिने आणि २८ दिवसांचा एक महिना. का?
सरळ भागाकार केला तर प्रत्येक महिन्याचे ३० दिवस येतात आणि पाच दिवस शिल्लक राहतात. म्हणजे थोडक्यात सात महिने ३० दिवसांचे आणि पाच महिने ३१ दिवसांचे असा हिशेब असला पाहिजे. पण तसा तो नाही. का?
आणि हा अन्याय ही काही आज-कालची गोष्ट नाही. युगानुयुगं फेब्रुवारी हा अन्याय सहन करतो आहे. मागची किमान तीन हजार वर्षं हा फेब्रुवारी अन्यायग्रस्त आहे. ही सगळी नेमकी काय गोष्ट आहे ते आज पाहू.
आपण सध्या वापरतो ते ग्रेगरीयन कॅलेंडर आणि ते ज्यावर आधारित आहे ते जूलियन कॅलेंडर या दोन्ही कॅलेंडरांमध्ये महिने आणि त्या प्रत्येक महिन्यांत असलेले दिवस यांत काहीही फरक नाही. आता, ग्रेगरीयन कॅलेंडर अमलात आलं १५८२ मध्ये आणि जूलियन कॅलेंडर अमलात आलं होतं ख्रिास्तपूर्व ४५ मध्ये. तेव्हा, त्या काळापासून हा फेब्रुवारी असा कमी दिवसांचा आहे.
पण हा अन्याय काहीच नाही असा अत्याचार त्याच्या आधी झाला होता. त्याच्या आधीच्या रोमन कॅलेंडर व्हर्शन २ मध्ये तर फेब्रुवारीची अगदी चिरफाड केली होती. कसं आहे, ते कॅलेंडर चांद्र मास आणि सौर वर्ष असं होतं. त्यामुळे त्यात अधिक मास येणं गरजेचं. नाही तर ऋतूंचा आणि महिन्यांचा मेळ बिघडायचा. सर्वसाधारणपणे एक महिना संपला की मग अधिक महिना येतो. पण रोमन लोकांची तऱ्हाच न्यारी.
म्हणजे त्यांचा अधिक महिना फेब्रुवारी संपला की मग अधिक महिना असा नव्हता. ही मंडळी फेब्रुवारीचे सरळ दोन तुकडे करत. २३ फेब्रुवारीनंतर फेब्रुवारी चक्क स्थगित होई आणि अधिक महिना सुरू होई. अधिक महिना संपला की मग फेब्रुवारीचे उर्वरित दिवस असा क्लिष्ट, किचकट, आचरट प्रकार होता.
पण अधिक महिना तरी फेब्रुवारीच्या नशिबीच का? याचं कारण आहे ऋतुमान! कसं ते पाहू. मार्च म्हणजे वसंत! सृष्टी फुलू फळू लागते तो काळ! सुगीचा मोसम. थोडक्यात, मार्च महिना सुरू होईपर्यंत वसंत ऋतूला सुरुवात झालेली असली पाहिजे.
आता जर अधिक महिना गरजेचा असेल तर ते खात्रीशीर कधी सांगता येईल? वसंतागमनावरून! जर वसंतागमनाची काही पूर्वचिन्हं दिसत नसतील तर अधिक महिना घ्यायचा. ज्या काळात खगोलशास्त्र फारसं प्रगत नव्हतं तेव्हा हे असं करणं अधिक सोयीचंही आणि अचूकही. तेव्हा, म्हणून अधिक महिना फेब्रुवारीनंतर घ्यायचा!
पण हे तरी सुसह्य म्हटलं पाहिजे. कारण त्याच्या आधीच्या रोमन कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी हा महिनाच नव्हता! त्यांचं वर्ष मार्च महिन्यात सुरू होई आणि डिसेंबर महिन्यात संपे. पुढचे ६०-६२ दिवस कोरे असत! का? कारण त्या दिवसांत रोम वगैरे भागात असे कडाक्याची थंडी. सगळे व्यवहार ठप्प होत. ना व्यापार, ना शेतीची काम, ना कुठले सण-उत्सव. अशा दिवसांना नाव असलं काय, नसलं काय, काय फरक पडणार? म्हणून हे कोरे दिवस! अशा कोऱ्या, बिनकामांच्या दिवसांतला महिना! त्याला काय महत्त्व असणार!
रोमचा दुसरा राजा नुमा पाँपिलसने या दिवसांमध्ये दोन महिने बसवले तेव्हा कुठे फेब्रुवारी अस्तित्वात आला! तेव्हा, त्या दृष्टीने नुमा पाँपिलस हा फेब्रुवारीचा जनकच म्हटला पाहिजे.
पण फेब्रुवारी बिच्चारा असण्यामागची ही सगळी शास्त्रीय कारणं झाली. त्याखेरीज आणखीही एक कारण आहे. ते त्याच्या नावात दडलेलं आहे. ‘फेब्रुवारी’ हे नाव फेब्रुवा या साफसफाईच्या उत्सवाशी किंवा शुद्धीकरण/ अपराधीपणाच्या भावनेतून केलेलं अर्पण याच्याशी संबंधित. फारसं शुभसूचक, मंगल वगैरे नाही. तेव्हा, जर कोणत्या महिन्यावर अन्याय अत्याचार करायचा असेलच तर त्यासाठी फेब्रुवारीइतका सुयोग्य उमेदवार मिळणं अवघड! शेक्सपिअर काहीही म्हणो, बिच्चाऱ्या फेब्रुवारीकडे पाहिलं की कळतं, नावात बरंच काही आहे.
संदीप देशमुख
X@KalacheGanit
Kalache.ganit@gmail.com