‘मंजी सवराच्या जगात..’ हा विवेक पंडित यांचा ‘रविवार विशेष’मधील लेख (लोकसत्ता, ७ जानेवारी) वाचला. ज्या देशात राम मंदिरासाठी अब्जावधी रुपये खर्च केले जातात तेथील आदीवासी बांधवांच्या नशिबी मात्र कारवीच्या कुडाच्या खोपटात संसार थाटणे येते. अशा देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही नामक व्यवस्था असून उपयोग काय? बुलेट ट्रेन, चंद्रावर पाणी शोधणारे सरकार गेल्या ७७ वर्षांत सामान्य आदिवासी कुटुंबांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ व अक्षम का ठरले? सरकारी योजनांचे खरे लाभार्थी कोण? सरकारमधील मंत्री की हा सर्व विरोधाभास दिसत असूनही मंत्री व आमदार  – खासदारांच्या होला हो करणारे संवेदनाहीन सरकारी बाबू?

धर्मरक्षणासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक राजकीय यात्रा निघाल्या, पण आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारी व त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारी एखादी यात्रा कोणत्याच राजकीय पक्षाला का काढावीशी वाटली नाही? आदिवासींना जखडून ठेवणाऱ्या वेठबिगारीच्या शृंखला कोणत्याच राजकीय नेत्याला का तोडाव्याशा वाटल्या नाहीत? आदिवासी विकासमंत्री झालेले व राखीव आदिवासी मतदारसंघांतून निवडून आलेले मालामाल झाले पण आदिवासी बांधव मात्र आजही मूलभूत सुविधांपासून वंचितच आहे.

संविधानाने आरक्षण तर दिले आहे, मात्र त्याचा लाभ घेण्याइतके शिक्षण आदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे ते कुपोषणाचा आणि अन्यही अनेक समस्यांचा सामना करत आहेत. विधिमंडळ अधिवेशनांत दिशा सालियन, हनुमान चालीसा असे बिनकामाचे मुद्दे गाजतात, पण आदिवासींच्या प्रश्नांवर कोणालाही आवाज उठवावासा वाटत नाही. धनदांडग्यांच्या बंगल्यांसाठी व रस्त्यांसाठी आदिवासींच्या कुडाच्या झोपडय़ांवर बुलडोझर फिरवला जातो.  हे असेच सुरू राहिले तर स्वातंत्र्याला २०० वर्षे झाली तरीही ही दरी मिटणार नाही! –  टिळक उमाजी खाडे, नागोठणे (रायगड)

योजना आहेत, पण पोहोचत नाहीत

‘मंजी सवराच्या जगात..’ हा लेख वाचला. सध्या शासन आपल्या दारी ही योजना राबविली जात आहे, स्वत: मुख्यमंत्री याबाबत बरेच जागरूक आहेत, पंतप्रधानांनी पाच वर्षे मोफत शिधा देण्याची घोषणा केली आहे. घरकुल योजना आहे. या योजनांचा लाभ आदिवासींना मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे विणणे गरजेचे आहे. सूचना आणि संपर्क व्यवस्था निर्माण केल्यास आदिवासींचे आयुष्य सुकर होईल.- भगवान नाईक, विरार

एकीकडे स्मार्ट सिटी, दुसरीकडे कातकरी

‘मंजी सवराच्या जगात..’ हा लेख वाचला. इतक्या भयानक परिस्थितीत काही माणसे जगतात आणि कोणालाही, विशेषत: राजकीय नेतृत्वाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून राम मंदिर, मेट्रो, सागरी सेतू बांधले जातात. ड्रीम सिटी, स्मार्ट सिटी अशा गोंडस नावाने योजना राबवल्या जातात, पण या वर्गाकडे पाहणारे कोणीही नाही. अन्नान दशेत जगणाऱ्या या कातकरी बांधवांच्या पिढय़ान पिढय़ा वीटभट्टीवर होरपळतच राहणार का? ‘नरेची केला नर किती हीन’ या पंक्ती आठवतात.- सुनील न. सरदेसाई, जोगेश्वरी (मुंबई)

त्यांनी गैरवापर केलाच, यांच्या काळात कहर!

‘नेहरू- इंदिराकाळात कशी नव्हती हुकूमशाही?’ हे ‘लोकमानस’मधील पत्र (६ जानेवारी) वाचले. १. याआधीसुद्धा विरोधकांना संसदेतून नक्कीच निलंबित करण्यात आले होते; पण आता मात्र त्याचे प्रमाण भरमसाट वाढले आहे. २. याआधीच्या सरकारांनी सीबीआयचा गैरवापर केला, हे कुणीही नाकारलेले नाही, पण अलीकडे त्या संस्थेचे उपद्वय़ाप भलतेच वाढले आहेत. ‘ईडी’ने तर उच्छादच मांडला आहे, हे कसे काय अमान्य करता येईल? ३. नेहरू- इंदिराकाळात राज्यघटनेची कदर केली जात असे, याउलट आता मात्र राज्यघटना राजरोसपणे पायदळी तुडवण्यात धन्यता मानली जाते, त्याचे काय? ४. आता लोकशाही असल्याचे कोणीही नाकारत नाही, मात्र तिची पावले (मंदगतीने का होईना!) हुकूमशाहीकडे वळत आहेत एवढेच!-  बेंजामिन केदारकर, नंदाखाल (विरार)

काँग्रेसच्या जागांविषयी प्रश्नच

‘लालकिल्ला’ सदरातील ‘निवडणुकीआधी अंदाज अपना अपना..’ हा लेख (८ जानेवारी) वाचला. ज्या राज्यात इंडिया आघाडीतील मित्रपक्षाची सत्ता आहे, तिथे काँग्रेसला किती जागा मिळणार, हा एक प्रश्नच आहे. जागावाटप वरिष्ठ पातळीवरून होणार असले तरीसुद्धा उमेदवार देताना कठीण आहे. बंडखोरीमुळे आघाडीला फटका बसू शकतो, ती रोखणे हेसुद्धा आव्हान आहे. दक्षिणेतील आंध्र प्रदेशची विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच आहे. वायएसआर काँग्रेस अद्यापही अलिप्त भूमिकेत दिसते. –  विनायक फडतरे, पुणे

मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड!

‘निवडणुकीआधी अंदाज अपना अपना’ हा महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. जागा आहेत पण उमेदवार नाहीत, बळ आहे पण आत्मविश्वास नाही, गाडी आहे पण पेट्रोल नाही, पक्ष आहे पण नेतृत्व नाही अशी एकंदर २८ पक्षांच्या ‘इंडिया’ कडबोळय़ाची परिस्थिती आहे! फक्त नरेंद्र मोदी या एका माणसाला हरविण्यासाठी तब्बल २८ पक्ष एकत्र आलेत, यातच त्यांचे खुजेपण अधोरेखित होते! फक्त ‘मोदी हटाव’ या एका कार्यक्रमावरच ‘भारत न्याय यात्रा’ अवलंबून आहे, म्हणजे मोदींवरच या कार्यक्रमाचे यश अवलंबून आहे, स्वत:च्या कर्तृत्वावर नाही!

आपापले मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठीच हे २८ पक्ष धडपडताना दिसतात. विरोधकांचे राफेल आणि अदानी हे फुसके बार निघाले आहेत, त्यामुळे आता त्यांना नवीन कोणतातरी विषय शोधणे क्रमप्राप्त आहे! राम मंदिराच्या उदघाटनाला जायचे की नाही, गेलो तर धर्मनिरपेक्षता उघडी पडेल आणि नाही गेलो तर बहुसंख्य समाज नाराज होईल, ही विरोधकांची अडचण आहे. तर भाजप राम मंदिराचा ‘चेक’ निवडणुकीत ‘कॅश’ करण्याच्या प्रयत्नात आहे! –  अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण</p>

विद्वानांचा अस्थानी उदो उदोही नको

‘राजकीय पक्षापायी विद्वानांवर टीका नको’ हे पत्र वाचले. पत्रलेखकाचे म्हणणे योग्यच आहे, मात्र त्यासाठी भास्कराचार्य यांच्या लीलावती या ग्रंथाचे जे उदाहरण दिले आहे, ते पुरेसे नाही. लीलावतीलाच पाटीगणित असेही म्हणतात, नावाप्रमाणे त्यातले गणित अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहे. भास्कराचार्याच्या कितीतरी शतके आधी ते युक्लिड व इतर गणितींनी मांडले होते. विद्वानांवर अप्रस्तुत टीका नको त्याचप्रमाणे भावनेच्या भरात त्यांचा अस्थानी उदो उदोही नको. –  कपिल जोशी, कर्वेनगर (पुणे)

प्राचीन भारतीय अंधश्रद्ध होते काय?

‘नसे राम ते धाम सोडून द्यावे’ हा अग्रलेख (लोकसत्ता- ६ जानेवारी) वाचला. त्यात सर्वच प्राचीन भारतीय अंधश्रद्ध होते, असा सूर उमटला आहे, तो खरा नाही. पृथ्वी गोल आहे व ती सूर्याभोवती इतर ग्रहांप्रमाणे भ्रमण करते हे भारतीयांना माहिती नव्हते, असे गृहीत धरले तर प्राचीन काळापासून सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यांची अचूक वेळ प्राचीन भारतीय वैज्ञानिक कसे काढत होते? दुर्बिणीसारखी आधुनिक साधने तेव्हा नव्हती तरीही प्राचीन भारतीय वैज्ञानिक सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाची वेळ अचूक काढत. याचा अर्थ पृथ्वी गोल असून ती सूर्याभोवती फिरते, याचे ज्ञान भारतीयांना होते असा होतो. आर्यभट्ट यांचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आजही जगमान्य आहे. कणाद या ऋषींनी पदार्थ हा अणूंनी तयार झाला आहे, असा सिद्धांत पूर्वीच मांडला होता. इत्यादी असंख्य घटना सांगता येतील, यावरून प्राचीन भारतीय हे काही बाबतीत वैज्ञानिकदृष्टय़ा प्रगतीशील होते, असे सिद्ध होते. -अरविंद जोशी, पुणे