‘सांस्कृतिक पुनर्जागरणाचे नववर्ष!’ हा लेख (१० जानेवारी) वाचला आणि पुन्हा एकदा भाजप सत्यापलाप किती उत्तम पद्धतीने करू शकतो त्याची प्रचीती आली. सहस्रबुद्धे यांच्या म्हणण्यानुसार राममूर्तीची प्रतिष्ठापना हा एक निखळ धार्मिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय कार्यक्रम आहे. कारण बहुसंख्य हिंदू रामाला दैवत मानतात. त्यामुळे राम हा राष्ट्रीय महानायक आहे. रामाच्या भक्तीला कोणाचीही ना असण्याचे कारण नाही. कारण तो त्यांना संविधानाने दिलेला उपासनेचा अधिकार आहे. पण प्रश्न असा पडतो की, संविधानानुसार आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजेच सरकार कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापासून दूर राहील, हे स्पष्ट असताना केंद्र सरकार कशाच्या आधारे राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, असे ठरवते? 

पुढे लेखक असे म्हणतात, आयोध्येतील राम मंदिराची निर्मिती हा एक वळणिबदू आहे. कारण कोणत्याही परकीयाला आपल्याकडून प्रतिकार व प्रतिरोध न करण्याच्या सद्गुण विकृतीमुळे त्या परदेशी आक्रमकांना इथे बस्तान वसवता आले. खरे पाहता परदेशी आक्रमक हे आपल्यापेक्षा जास्त पुढारलेल्या युद्धनिपुण शक्तीनिशी आले होते आणि आपण मात्र जुनाट पद्धतीने युद्ध करणारे होतो. त्याचबरोबर आपला समाज जातीपातीच्या, श्रेष्ठकनिष्ठतेच्या चिरफाळय़ांनी दुभंगलेला होता. काही वेळा तर इथल्या हिंदू राजांनीच शत्रुपक्षातील हिंदू राजाविरुद्ध मुस्लीम आक्रमकांची मदत घेतली होती. त्यामुळेच आपण गुलामीत गेलो.

लेखक महाशयांनी राम मंदिराच्या उभारणीची तुलना सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराशी केली. पण ते हे विसरतात की, सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्या वेळचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना बोलावले होते, तेव्हा नेहरूंनी संविधानाचा संदर्भ देऊन ‘आपला देश धर्मनिरपेक्ष आहे तेव्हा अशा कोणत्याही कार्यक्रमात सरकारी घटनात्मक व्यक्तींनी सहभागी होणे म्हणजे संविधानाची पायमल्ली करणे होय. म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नये’, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या भाजप सरकारचे वागणे संविधानाला पदतळी तुडवणारे नव्हे काय? लोकानुनयासाठी सरकारला धर्म आणि आस्था संविधानापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते, हे यावरून सिद्ध होत नाही काय?

याच लेखात लेखक म्हणतात की गेटवे ऑफ इंडियाची १०० वर्षे म्हणजे वसाहतवादाच्या प्रवेशाचे नव्हे तर भारतीय चिंतनातून साकारलेल्या विश्वकल्याणाच्या मानवी मूल्याच्या प्रक्षेपणाचे द्वार आहे. पण गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी उभारलेले शिल्प आहे. यालाच म्हणतात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला आपल्या सोयीनुसार वाकवणे. अशा प्रकारे संपूर्ण लेखात इतिहासाचा अर्थ सोयीनुसार लावल्याचे दिसते. -जगदीश काबरे, सांगली

आशियातील वाढता वर्चस्ववाद चिंताजनक!

‘एकपक्षीय राजवटीच्या दिशेने बांगलादेश..’ हा लेख (लोकसत्ता – ११ जानेवारी) वाचला. भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडून शेख हसीना यांच्या अवामी लीगला प्रचंड मताधिक्याने विजय मिळाला. भूराजकीयदृष्टय़ा बांगलादेश हे भारतासाठी महत्त्वाचे शेजारी राष्ट्र आहे. कारण ईशान्य भारतातील फुटीरतावादी गटांवर त्याचबरोबर चीनचे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये वाढत असलेले प्रभुत्व आणि वर्चस्वावर भारताला नियंत्रण मिळवायचे असेल तर शेजारी बांगलादेशासोबत मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणे काळाची गरज आहे. विशेष म्हणजे बांगलादेशातील भारताविरोधी कट्टर धर्माध संघटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेशाशी राजनैतिक, व्यापारी, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या हिताचे आहे. कारण दक्षिण आशियाई शेजारी राष्ट्रांमध्ये राजकीय स्थैर्य आणि शांतता असेल तर भारतालासुद्धा आपली सर्वागीण प्रगती साध्य करता येईल.

बांगलादेशचा इतिहास त्यांच्या भारताशी असलेल्या मैत्रीला कारणीभूत आहे. चीन व अमेरिका बांगलादेशमध्ये प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. चीन नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीवनंतर बांगलादेशलासुद्धा आपल्या गोटात ओढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत बांगलादेशातील कट्टरतावादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तिथे धर्मनिरपेक्षता हे मूल्य राजकारणाच्या केंद्रस्थानी राखण्यासाठी शेख हसीना यांचे सत्तेत पुनरागमन भारताच्या दृष्टीने निश्चितच लाभदायक ठरेल. परंतु त्याचबरोबर पश्चिमात्य राष्ट्रांची दक्षिण आशियातील स्वार्थी राजकीय महत्त्वाकांक्षादेखील लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत चीनच्या वर्चस्ववादापासून भारताने सावध राहणे गरजेचे आहे. -राजेश नंदनवरे, छत्रपती संभाजीनगर

एक आनंदपर्व संपले..

‘अंगना फूल खिलेंगे..’ हा संपादकीय लेख (११ जानेवारी) वाचला. राशिद खान यांचे जाणे चटका लावणारे आहे. आजच्या काळात शाश्वततेची जी ठिकाणे होती त्यात राशिद खान यांचे गाणे आहे. ते खऱ्या अर्थाने प्रतिभावंत होते. कित्येकदा ऐकूनही त्यांचे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटे. दिवस- रात्रीच्या कोणत्याही प्रहरी त्यांचा आवाज सोबत देत असे. त्यांच्या आवाजात कित्येक शतकांची परंपरा होती. शब्दांत मूर्त-अमूर्ताचा मनोहारी संगम होता. ते गात तेव्हा शब्दांना स्पर्श करत आहेत, असे वाटे. हवेहवेसे वाटत असतानाच त्यांनी निरोप घेतला. एक आनंदपर्व संपले.-सायमन मार्टिन, वसई

पक्ष पळविणे हे नवे ‘महाराष्ट्र मॉडेल’

‘सगळेच पात्र’ ही बातमी (लोकसत्ता- १२ जानेवारी) वाचली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश डावलून निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार घेत शिवसेना शिंदेंचीच यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून देशातील लोकशाहीच पायदळी तुडविण्यात आली आहे. अध्यक्षांनी पक्षांतर बंदीवर कोणतीही टिप्पणी केली नाही. परिशिष्ट १० संदर्भातील तरतुदींवर भाष्य करणे कटाक्षाने टाळले. त्यामुळे पक्षांतराची वाट मोकळी झाल्याचे स्पष्ट दिसते. यातून राजकारणात चुकीचा पायंडा पाडण्याची शक्यता दिसते. राजकीय पक्ष महत्त्वाचा नसून विधिमंडळ पक्षातील संख्या प्रमाण मानून शिंदेंची शिवसेना खरी ठरविण्यात अध्यक्षांनी झुकते माप दिले. या प्रकरणी अध्यक्ष हे लवाद म्हणून भूमिका बजावत असताना त्यांनी दोन वेळा वर्षांवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणे व दिल्लीत नेत्यांना भेटणे हे सर्वच संशयास्पद होते. तर त्यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता ते कोणता निकाल देणार याची पूर्वकल्पना सर्वानाच होती. अर्थात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची निकालाआधीची वक्तव्ये पाहता याला पुष्टी मिळत होती. अमृत काळात पक्ष पळवणे हेच ‘महाराष्ट्र मॉडेल’ होऊ पाहत आहे. त्यामुळे लोकशाहीची जननी म्हणून परदेशात जाऊन गोडवे गाणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार हे नक्की!-  पांडुरंग भाबल, भांडुप

अ‍ॅलन टय़ूरिंगची भारतीय पाळेमुळे..

‘मेंदूप्रमाणे शिकत राहणारे यंत्र’ हा लेख (९ जानेवारी) आवडला. या व आधीच्या लेखात अ‍ॅलन टय़ूरिंग (१९१२-१९५४) या शास्त्रज्ञाच्या कामगिरीचा उल्लेख आहे.  टय़ूरिंगचा भारताशी थोडाफार संबंध आहे. अ‍ॅलनचे वडील ज्युलिअस मॅथिसन टय़ूरिंग (१८७३-१९४७) हे ऑक्सफर्डमध्ये शिकले होते. भारतीय सनदी सेवेत (आयसीएस) होते. त्यांचे पूर्वज मोसम बॉईड (१७८१-१८६५) हे ब्रिटिशांच्या बंगाल रेजिमेंटमध्ये होते. अ‍ॅलन टय़ूरिंग यांची आई एथेल सारा स्टोनी-टय़ूरिंग (१८८१-१९७६) ही मद्रासमध्ये जन्मली होती (पुढे शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले). तिचे वडील एडवर्ड वॉलर स्टोनी (१८४४-१९३१) हे मद्रास अँड सदर्न मराठा रेल्वे (आजची दक्षिण मध्य रेल्वे)मध्ये चीफ इंजिनीअर होते. या टय़ूरिंग कुटुंबीयांपैकी एक जॉन विल्यम हा १७९१ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात मद्रासमध्ये कॅडेट म्हणून नोकरीस लागला. त्याच्या काहीशा सावळय़ा रंगामुळे (आई नॅन्सी भारतीय होती) खळबळ उडाली. पुढे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्याला तपासणीसाठी इंग्लंडला बोलावून घेतले आणि निष्कासित केले. त्यानंतर, भारतीय आई असलेल्या मिश्रवंशीय पुरुषांना ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात प्रवेश बंद करण्यात आला. त्या काळी, पूर्णत: गोऱ्या पण  भारतात जन्मलेल्या व वाढलेल्या ब्रिटिशांना इंग्लंडमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असे. त्यामुळे, गोऱ्यांमध्ये इंगलंडला परत जाऊन तिथे जन्म देण्याची पद्धत होती. अ‍ॅलन टय़ूरिंग यांचाही जन्म इंगलंडमध्ये झाला. त्यांचा भारताशी प्रत्यक्ष संबंध आला नाही. असो.-हर्षवर्धन वाबगावकर, मुंबई</p>