‘इतिहास बदलणारा, भूगोल घडवणारा’ (२ सप्टेंबर) हा मिखाइल गाोर्बाचेव्ह यांच्याविषयीचा मृत्युलेख वाचला. शीतयुद्ध समाप्तीचे श्रेय निश्चितच त्यांना जाते; परंतु त्यांचा लोकशाहीचा आणि आर्थिक सुधारणांचा प्रयत्न मात्र फसला. रशियात साम्यवादी राजवट जाऊन पुतिन यांची हुकूमशाही आणि मूठभरांची मक्तेदारी असलेली भांडवलशाही निर्माण झाली. गोर्बाचेव्ह यांचे समकालीन रेगन आणि थॅचर यांच्या तथाकथित नवउदारवादी आर्थिक धोरणांमुळे जगाची नव्याने रचना (न्यू वल्र्ड ऑर्डर) होण्याऐवजी अनेक देशांत अराजक मात्र निर्माण झाले. अगदी रशियन जनतेलाही हा प्रश्न पडला असेल की साम्यवाद जाऊन लोकशाही आल्याने त्यांना नेमके काय मिळाले? गोर्बाचेव्ह यांचे हेतू आणि नियत दोन्ही चांगले होते, पण अर्थविकास, फेररचना, मोकळेपणा आणि लोकशाहीकरण या घोषित तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी करून सक्षम पर्याय देण्यात ते अपयशी ठरले. साम्यवादाच्या पीछेहाटीमुळे जगभरात- विशेषत: विकसनशील देशांमध्ये- विकृत भांडवलशाही आणि संकुचित लोकशाही अनुभवास येते, त्याचे काही अंशी अपश्रेय गोर्बाचेव्ह यांच्या नावे इतिहासात नोंदले जाईल.
– अॅड. वसंत नलावडे, सातारा
सुधारणावादी नेत्यांना सुधारणेचा शापच..
मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी आर्थिक सुधारणा घडवून आणि पत्रकारांना, नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य देऊन जनतेला बोलते केले! व्यवहारात, धोरणात पारदर्शीपणा आणला. कारण पारदर्शी धोरणाशिवाय परदेशी गुंतवणूक येणार नाही यांची त्यांना जाणीव होती. शेवटी या सुधारणांनीच त्यांचा घात केला आणि राजकीय विजनवासात पाठवले हे नाकारता येणार नाही. याची तुलना भारतातील १९९३ च्या परिस्थितीशी करता येईल. भारत आर्थिक संकटाच्या खाईत पडत चालला होता, सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती, अशा वेळी द्रष्टे पंतप्रधान नरसिंहराव व जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचे महामार्ग तयार केले आणि भारत आर्थिक विवंचनेतून बाहेर आला. मात्र ते सत्तेच्या पटलावरून दूर झाले! म्हणजे मनमोहन सिंग आणि मिखाइल गोर्बाचेव्ह यांची तुलना केली तर आर्थिक सुधारणांचा शापच जणू सुधारणावादी नेत्यांना आहे असेच म्हणावे लागेल!
– अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण पश्चिम
देवत्व बहाल करणे बुद्धविचारांशी विसंगत
‘धर्म म्हणजे रिलिजन नव्हे’ या रवींद्र माधव साठे यांच्या लेखात (२ सप्टेंबर) एका कसलाही संदर्भ नसलेल्या प्रार्थनेचे (‘त्रलोक्यनाथ हरी..’) उदाहरण देऊन लेखक भगवान श्रीकृष्णांना जगातील सर्वच धर्मीयांचे (त्यांच्या मते, संप्रदायांचे) सर्वोच्च दैवत म्हणून लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रार्थनेतील बुद्धांचा उल्लेख खटकतो. कारण बुद्ध हे मानव आहेत, मार्गदर्शक आहेत. ते मनोकामना पूर्ण करणारे किंवा वांछित फळ देणारे ‘त्रलोक्यनाथ हरी’ नव्हेत. त्यांना तसे असल्याचे दर्शविणे, त्यांना देवत्व बहाल करणे हे बुद्धविचारांशी पूर्णत: विसंगत आहे.
‘आस्तिक आणि नास्तिक, संशयवादी आणि अज्ञेयवादी यांनी हिंदू संस्कृती आणि जीवन यांची पद्धती स्वीकारल्यास ते सारे हिंदू असू शकतात..’ हे डॉ. राधाकृष्णन यांचे मत लेखकांनी दिले आहे. परंतु ती पद्धती म्हणजे काय आणि ती नास्तिकांनी का स्वीकारावी याचे तार्किक विश्लेषण केलेले दिसत नाही. त्यामुळे नास्तिक किंवा अज्ञेयवादी म्हणजे काही तरी विचित्र पद्धतीने वागणारे असावेत असे लेखकांना वाटते काय?
– उत्तम जोगदंड, कल्याण
धर्म माणसासाठी आहेत, माणूस धर्मासाठी नसावा
‘धर्म म्हणजे रिलिजन नव्हे’ या लेखात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा अनेक धर्म व त्यांच्या देवांचा उल्लेख/संदर्भ वारंवार आला आहे, फक्त मूळ मनुष्यधर्म तेवढा अनुल्लेखाने मारला गेला आहे. शेवटी माणसासाठी धर्म आहे (किंवा असावा) धर्मासाठी माणूस नाही. देवधर्म, धार्मिक विधी, पावित्र्य या गोष्टींचे अवडंबर माजवून एका विशिष्ट वर्गाने अनिर्बंध सत्ता हातात घेऊन स्त्रिया व दलित अशा मोठय़ा वर्गाला दूर लोटले होते हा आपल्या सर्वसमावेशक व सहिष्णू धर्माचा खरा इतिहास आहे (मनुस्मृतीने सर्व स्त्रियांचे शूद्र असे वर्गीकरण केले होते हे विसरून कसे चालेल) व त्याची पुनरावृत्ती रोखणे हे कुठल्याही सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. आपलाच धर्म कसा श्रेष्ठ अशा छापाच्या या लेखातील चर्चेपेक्षा याच अंकातील (‘साम्ययोग’) हिंसेने दु:खी होतो तो हिंदू अशी साधीसोपी व सुटसुटीत विनोबांची व्याख्या हृदयाला अधिक भिडते.
– प्रवीण नेरुरकर, माहीम (मुंबई)
मनसे- शिंदे भाजपपेक्षा निम्मेच उरण्यासाठी..
‘शिंदे गटाला मनसे रसद’ ही दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या मोर्चेबांधणीची बातमी (लोकसत्ता- २ सप्टें.) वाचली. यामागे सर्व कारस्थान भाजपचे दिसते आहे. शिंदे यांना दूरदृष्टी असेल तर त्यांच्या लक्षात येईल की, मनसेला जवळ करून भाजप त्यांच्याच पायात पाय घालते आहे. कारण महापालिका असो की विधानसभा, निवडणुकीत भाजप निम्मे आणि शिंदे-मनसे निम्मे असे तिकीटवाटप जरी झाले तरी शिंदे गटाचे खच्चीकरणच होणार आहे. यूपी, बिहारींना विरोध करणाऱ्या मनसेशी युती करायला याचसाठी तर शहा परवानगी देणार आहेत, हे स्वच्छ आहे.
– सुहास शिवलकर, पुणे</p>
पोलिसांचाही धाक राहिलेला नाही?
मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातील एका दुकानासमोर गणेशोत्सवाचा फलक लावण्यासाठी खांब उभारण्यावरून झालेल्या वादात मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचे वृत्त वाचून व त्या घटनेचे ध्वनिचित्रमुद्रण पाहून, तळपायाची आग मस्तकाला गेली. कोण बरोबर कोण चूक हा मुद्दा नंतरचा, मुळात हात उगारणे हे गैरच. मनसेचे कार्यकर्ते गुंड प्रवृत्तीचे दिसत असल्यामुळे आजूबाजूचे लोक महिलेला वाचवण्यासाठी पुढे कसे येतील? ‘मला काय त्याचे’ म्हणत सर्वानी बघ्याची भूमिका घेतली. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे राज्य सत्तेवर आहे आणि त्यांचे मनसेशी सूत जमत आहे. त्यातून मनसेची मुजोरी वाढीस लागत आहे असे दिसते. ‘भाजप तारी त्याला कोण मारी’ या न्यायाने त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे दिसते.
– बकुल बोरकर, विलेपार्ले (मुंबई)