‘धर्मा तुझा रंग कसा?’ हे संपादकीय वाचले. जगातील सर्वात मोठी लोकशाही हा बहुमान मिरवणाऱ्या व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाची वाटचाल तेजाकडून तिमिराकडे होत आहे हे सांगण्यासाठी कुणा विद्वानांची गरज नाही. लहानपणी शाळेत तिरंग्यातील रंगांचे वर्णन – केशरी-त्यागाचा, बलिदानाचा,पांढरा-शांततेचा, निळा-विकासाचा, हिरवा-सुजलाम सुफलामतेचा.. असे मनात ठसवले गेले आहे. पण म्हणजे लहान होतो तेव्हा आम्ही शहाणे आणि सहिष्णू होतो, मोठे झालो आणि बिघडलो. मग केशरी झाला कट्टर हिंदूत्वाचा, निळा झाला दलितांचा, हिरवा झाला कट्टर मुसलमानांचा!! आता तर प्रत्येकाने वेगवेगळय़ा रंगाला धार्मिक भावनांचे, बहुसंख्याकवादाचे, प्रदेशवादाचे प्रतीक बनवून ठेवले आहे. एखादी कलाकृती अभिजात आहे की नाही, त्यामध्ये लोकांच्या धार्मिक आणि व्यक्तिगत भावना दुखावल्या जातायत का, हे पाहण्यासाठी सेन्सॉर बोर्ड असतानासुद्धा निव्वळ लोकांना भावनिक करून समाजात अस्थिरता निर्माण केली जाते आहे. आपल्याला केशरी, हिरवा, निळा, पिवळा हे सगळे रंग दिसतायत, पण भारतीय लोकशाहीच्या प्रगतिपुस्तकावरील लाल शेरा मात्र दिसत नाही. कारण आपण धर्म, जात, पंथ, राजकीय सत्तेच्या धुंदीत आहोत. ती लवकर उतरो..

– देवानंद भगवान माने, नवी मुंबई</p>

बघणाऱ्याच्या नजरेवर सारे काही ठरते..

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

सर्वसाधारणपणे कोणताही रंग अथवा रंगद्रव्य यांच्या रासायनिक संरचनेमध्ये एकल बंध (सिंगल बॉण्ड) आणि द्विबंध (डबल बॉन्ड) हे एकआड एक या रचनेप्रमाणे असतात. प्रकाश ऊर्जा शोषून घेतल्यामुळे द्विबंधाचे स्थान बदलते. याला इंग्रजीत अल्टरनेट काँजुगेशन असे म्हणतात. जेवढे जास्त अल्टरनेट काँज्युगेशन असेल तेवढा तो रंग किंवा रंगद्रव्य जास्त तरंग लांबी असलेली प्रकाशकिरणे शोषून घेतो आणि रंगाच्या छटा जांभळय़ाकडून तांबडय़ाकडे अधिक गर्द होत जातात. तांबडय़ा रंगाची तरंग लांबी जास्त असल्यामुळे तो रंग सर्वात अगोदर उघडय़ा डोळय़ांना दिसतो. म्हणूनच तो तांबडा (लाल) रंग सिग्नलमध्ये वापरला जातो. अशा प्रकारे रंग किंवा रंगद्रव्य हे प्रकाश ऊर्जा आणि रासायनिक संरचना याचाच खेळ असतो.

अशा रंगांना धर्मबंधन का असावे? हिंदूंचा भगवा रंग असेल तर मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना करताना शांततेचे प्रतीक म्हणून हिरवा रंग ध्वजासाठी वापरला. हिरवा रंग मुस्लिमांचा झाला तर हिरवा निसर्ग आपण संपवायचा का? ज्याच्यासाठी अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण अर्पण केले त्या तिरंग्यात तर केशरी आणि हिरवा दोन्ही रंग आहेत. मग आपण तिरंगा बदलणार का? माझाच रंग वरचढ म्हणून भांडत बसायचे का? भावनांची सरमिसळ न करता कोणत्याही रंगाकडे पाहिले तर आपल्याला सौंदर्यच दिसेल. मग ती निसर्गाची हिरवाई असो, आकाशाची निळाई असो, ‘पठाण’मधील बिकिनी असो, पैलवानाची लंगोटी असो किंवा काश्मीरमधील विविधरंगी नवलाई असो. प्रश्न रंगांचा नाही, तर आपल्या दृष्टीचा, नजरेचा आहे. 

– डॉ. राजेंद्र कांकरिया, (रसायनशास्त्राचे प्राध्यापक), चिंचवड, पुणे

या गाण्यात भगव्या रंगाची योजना अनुचित

‘धर्मा तुझा रंग कसा?’ हा शनिवारचा संपादकीय लेख (१७ डिसेंबर) वाचला. त्यातील मते योग्यच आहेत. कोणीही कोणताही रंग कुठेही, कसाही वापरू शकतो हे ठीकच. तरीसुद्धा आपण या चित्रीकरणाकडे कलात्मक अथवा साहित्यिक दृष्टीने पाहू या. सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रसंगातून, घटनेतून एक रसनिर्मिती होत असते. उदा. आई मुलाला गोंजरते (वात्सल्य रस), जवान शत्रूशी दोन हात करतो (वीर रस) इत्यादी, इत्यादी.

आता दीपिकाच्या बिकिनीबाबत. ती ही बिकिनी घालून व गाण्यात दाखवलेल्या प्रसंगानुरूप तेथे फक्त आणि फक्त शृंगार रसनिर्मिती होणं अपेक्षित आहे (फक्त अशी वस्त्रे घालून रसनिर्मिती होत नसते, तो भाग वेगळा), तर या प्रसंगासाठी  निवडला गेलेला भगवा रंग अतिशय अयोग्य वाटतो. कारण हा रंग त्याग, अनासक्ती, बलिदान, शांती, मर्यादा, धर्म, ब्रह्मचर्य, ज्ञान इत्यादींचे प्रतीक मानला जातो. सदर गाण्याच्या प्रसंगावरून वर दिलेल्या कोणत्याही प्रतीक भावनांची निर्मिती अपेक्षित नाही. तसेच शृंगार रसनिर्मितीसाठी अनेक उपयोजक रंग वापरले जाऊ शकतात.. आस्था, धार्मिक भावना यांचा विचार सोडून देऊन कलात्मक पाहिले गेले तरी अशा प्रसंगी भगवा रंग सर्वथा अनुचित वाटतो.

– विद्या पवार, मुंबई

धर्माची अफूची गोळी सगळ्यांकडेच!

‘धर्मा तुझा रंग कसा?’ हा संपादकीय लेख वाचला. वास्तविक धर्माला कोणताही रंग नसतो. परंतु आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रत्येक जण धर्माचा वापर करू लागला आहे. धर्माचा पगडा असलेल्यांना धर्माचीच अफू देऊन राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत. सध्या चित्रपटाला यश मिळण्यासाठीसुद्धा याच गोष्टीचा वापर केला गेलेला दिसून येतो. अगदी ‘पद्मावत’, ‘बिल्लू बार्बर’ यांसारख्या चित्रपटांना हाच धार्मिक ट्रेण्ड वापरला गेला होता व सध्याही हेच सुरू आहे. सामान्य मात्र याला बळी पडतात हीच खरी शोकांतिका आहे!

– प्रा. काळुराम शिंदे, मुरबाड (कल्याण)

मूलभूत प्रश्नांना बगल देण्याचे लक्ष्य

लोकशाहीमध्ये रंगावरून भावना भडकवण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत, अशा संकुचित मनोवृत्तीला वेळीच लगाम घातला पाहिजे. लोकांच्या मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठीच असे प्रश्न ठरवून केले जातात, हे नागरिकांनी ओळखले पाहिजे. देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होईल तेवढी आपली प्रगती कमी होईल. निसर्गातील रंगांवर मालकी सांगणे हे अप्रगतपणाचे लक्षण आहे.

– संजय बापूराव बनसोडे, इस्लामपूर

डिअर नेहरू, यू आर ऑलरेडी अरेस्टेड!

‘डिअर नेहरू, यू आर अंडर अरेस्ट!’ हा लेख (१४ डिसेंबर) वाचला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याची धुरा नेहरूंच्या हाती आली. आपल्या पहिल्याच भाषणातून त्यांची दूरदृष्टी, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, शिक्षण, साहित्य, संशोधन, सामाजिक सुरक्षितता याबाबतच्या विचारांची सुस्पष्टता, विरोधकांचा सन्मान इत्यादीची प्रचीती येते. आपल्या १७ वर्षांच्या कार्यकाळात  पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका युग निर्माण करणाऱ्या देशाची उभारणी केली.

ज्या देशात कोसाकोसावर वेश बदलतो, भाषा बदलते, धर्म बदलतो तरी पण सर्व भारतीय गुण्यागोविंदाने राहतात, तेथील सांप्रत सरकारचे पंतप्रधान परदेशात नेहरूंचे तत्त्वज्ञान वापरत आहेत आणि देशात कायम नेहरूंना बदनाम करत आहेत. विरोधकांना हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्यासाठी व शरण येण्यासाठी ईडीमार्फत मजबूर करत आहेत. देशात धर्माधता, अंधश्रद्धा, नको त्या गोष्टींचे उदात्तीकरण, अतिरेकी राष्ट्रवाद, अल्पसंख्याकांची असुरक्षितता, इ. विषाची पेरणी करत आहेत आणि तेही केवळ सत्ता टिकविण्यासाठी – म्हणून ‘डिअर नेहरू, यू आर ऑलरेडी अरेस्टेड!’

– डॉ. अ. वि. पाऊले, पिंपरी, पुणे

जगात नाव व्हावे यासाठी सगळा खटाटोप

‘धंदे की बात है..!’ हा ‘अन्यथा’ सदरातील गिरीश कुबेर यांचा लेख (१७ डिसेंबर) वाचला.   इस्लामला मद्यप्राशन मान्य नाही. पण आम्हा पामरांना त्याची महती सांगितली एका मुस्लीम शायराने : ‘हाय कंबख्त तुने पी ही नहीं’ असे  वर्णन करून. अरब देशात नोकरीसाठी गेलेल्या मराठी (हिंदू ) तरुणाच्या, तेथील अनुभवावर आधारित पुस्तकात म्हटले आहे : ‘या मुस्लीम देशात सर्वाना- विशेषत: मुस्लिमांना- मद्यखरेदी करता येत नाही. मग ते आम्हाला मद्य परवाना घेण्याचा आग्रह करतात व त्यातून त्यांचा वाटा  उचलतात. म्हणजे उघड उघड नाही, पण ते (मुस्लीम ) मद्यपान करतात.’ तिसरा मुद्दा असा की कतारमधील हे अधिकृत मद्यबंदी धोरण म्हणजे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ पद्धतीचे असणार. बडवायझर कंपनीच्या जाहिरातीमागचे, धंद्यामागचे सत्य कतार सत्ताधीशांना माहीत असणार, पण मुस्लीम देशात- विशेषत: सौदी अरेबियाच्या तुलनेत, आपले नाव या स्पर्धेमुळे जगात गाजावे, हा सुप्त हेतू साधण्यासाठी, त्यांनी दुर्लक्ष केले असण्याची शक्यता जास्त आहे.

– श्रीधर गांगल, ठाणे</p>

राम मंदिराप्रमाणेच नद्यांचा प्रश्न सोडवा

‘गंगेला स्वच्छ करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा पुढाकार’ हे विश्लेषण (१७ डिसेंबर) वाचले.  गंगेच्या प्रदूषणाला मुख्य कारण आहे, तिच्या काठावर अनिर्बंध रीतीने वसलेली मोठी शहरे. अनिर्बंध औद्योगिकीकरण आणि त्या उद्योगधंद्यांचे रसायनमिश्रित पाणी आणि शहरातील सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडणे. यामुळे आज देशातील सगळय़ाच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. योग्य प्रकारे प्रक्रिया करून त्या पाण्याचा शहरांतर्गत उद्योग व्यवसाय, उद्याने, शेतीसाठी पुनर्वापर करता येतो. पण ते सरळ नद्यांमध्ये सोडले जाते. युरोप, अमेरिकेतील कुठलाही समाज तेथील नद्यांना बघून हात जोडत नाही किंवा त्यांच्या आरत्या करत नाही, पण त्या लोकांनी नद्यांचे, पर्वतांचे चांगल्या रीतीने जतन केले आहे, त्यांचे सौंदर्यीकरण केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे अयोध्येचे राम मंदिर किंवा काशी विश्वनाथ कॉरिडोर हे प्रश्न मार्गी लावले, त्याच पद्धतीने त्यांनी नद्यांचा प्रश्न मार्गी लावावा, ही विनंती.  

– अनिल दत्तात्रेय साखरे, ठाणे