‘डॉ हेडगेवार: हिंदू संघटनेचे शिल्पकार’ हा सुहास हिरेमठ यांचा लेख (रविवार विशेष – ३० मार्च) वाचला. अनेक आव्हाने पार करत संघाची वाटचाल गेले शतकभर (१९२५-२०२५) दमदारपणे सुरू आहे ही बाब आश्वासक आणि उल्लेखनीय आहे. मात्र ८० टक्के बहुसंख्याक हिंदूंचे संघटन करताना उर्वरित २० टक्के मुस्लीम, ख्रिास्ती, शीख, बौद्ध, जैन, पारशी समाजाबाबत संघाची भूमिका काय, याबाबत संदिग्धता आहे. ती दूर होणे आवश्यक आहे. त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानता येणार नाही. त्यासाठी संघाला अखंड भारत तसेच हिंदू राष्ट्र संकल्पनेचा पुनर्विचार करावा लागेल. तसेच संघाची राजकीय शाखा भाजपने ‘काँग्रेस मुक्त भारत’ हे उद्दिष्ट राबविणे सोडून द्यावे. भारतीय नागरिक मुळात मध्यममार्गी असून तो कडव्या डाव्या किंवा जहाल उजव्या विचारांच्या आहारी जात नाही. त्यामुळेच देशात लोकशाही टिकली आहे. या मध्यम मार्गाची नस भाजपने पकडावी. सत्ताधारी आणि विरोधक यात योग्य संतुलन असेल तरच लोकशाहीची गाडी रुळावरून नीट धावते. धर्मावर आधारलेली राष्ट्रे लयाला जातात. इस्लामवर आधारलेला आपला शेजारी देश पाकिस्तान आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. याउलट, राजेशाही होती तेव्हा ‘एकमेव हिंदू राष्ट्र’ म्हटले जाणारे नेपाळ गेली दशकभर धर्मनिरपेक्षतेचा अवलंब करत आहे. संघ समाजात विसर्जित व्हावा असे संघसंस्थापकांचे उद्दिष्ट होते. म्हणजे संपूर्ण समाजच संघमय व्हावा अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी संघाने ‘आपला तो चांगला’ अशी भूमिका न बाळगता ‘चांगला तो आपला’ असे उद्दिष्ट ठेवल्यास संघाची व्याप्ती वाढेल.- डॉ विकास इनामदार, पुणे

हेडगेवार- काँग्रेस संबंधाकडे दुर्लक्ष नको

डॉ. हेडगेवार : हिंदू संघटनेचे शिल्पकार’ हा लेख वाचला. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मदिनी त्यांचा जीवन परिचय करून देताना, आपल्या संपूर्ण लेखात लेखकाने डॉक्टर हे काँग्रेस पक्षाशी संलग्न होते आणि काँग्रेस पक्षाच्या नागपूर विभागाचे ते एक प्रमुख कार्यकर्ते होते, याचा उल्लेख वगळला; तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या नात्यानेच आंदोलनात भाग घेतल्याचा उल्लेख टाळलेला दिसतो. हिंदू एकजुटीचे पक्षकार असणारे डॉ. हेडगेवार यांना लोकमान्य टिळकांनंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली नव्याने आकारास येत असलेली काँग्रेस विचारधारेची विविधतेत एकता, अहिंसा, सर्वधर्मसमभाव, तत्त्वे अमान्य होती म्हणूनच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

त्याहीनंतर, यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या जंगल सत्याग्रहातील डॉ. साहेबांचा सहभाग हा वैयक्तिक होता. संघाचे नेतृत्व तात्पुरते डॉ. लक्ष्मण वासुदेव परांजपे यांच्याकडे सोपवून त्यांनी या चळवळीत भाग घेतला. ‘संघटन प्रसिद्ध पण संस्थापक अप्रसिद्ध’ असा लेखाचा सूर असला तरी सुरुवातीच्या काळात संघसंस्थापक डॉ. हेडगेवार हे प्रसिद्धच होते आणि जवळपास त्या काळातील सर्वांना सर्वश्रुत होते. काँग्रेस विचारधारेतील महान नेत्याची आणि कट्टर कार्यकर्त्यांची जीवनचरित्रे उलगडून पाहिली तर हलाखीचे दिवस जवळपास सर्वांनी पाहिले. उच्च विद्याविभूषित असणाऱ्या प्रत्येक नेत्याने पैसे कमावण्याचा मार्ग नाकारून देशभक्तीचा मार्ग स्वीकारला, हा इतिहास कुणा एकाचा नसून स्वातंत्र्यपूर्व काळाचा आहे. सुरुवातीला कट्टर काँग्रेस कार्यकर्ते असणारे डॉ. हेडगेवार त्यापासून अलिप्त नाहीत.- परेश संगीता प्रमोद बंग, मूर्तिजापूर (अकोला)

काँग्रेसकडे विचारसरणी आहे, पण…

आम्हाला भाजपच्या मार्गाने सत्ता मिळवायची नाही’ या शीर्षकाची, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुलाखत (लोकसत्ता लोकसंवाद- ३० मार्च) वाचली. लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही काँग्रेसची महत्त्वाची विचारसरणी असली तरी हा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचवण्यात अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. सध्या देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आणि लोकशाही प्रक्रिया गतिमान करण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे योगदान दुर्लक्षित करण्यासारखे नाही. वर्तमानकालीन राजकारणाचा विचार करता घटनात्मक आणि राजकीय संस्था किती निरपेक्ष राहिल्या आहे हा संशोधनाचा विषय झालेला आहे. एकंदरीतच भारतीय लोकशाही आतून पोखरली जात आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा वेळी काँग्रेस पक्षाने आपली विचारप्रणाली सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांची चर्चा जनमानसात उपस्थित करणे गरजेचे आहे, तरच पक्षाला भवितव्य आहे.- बाबासाहेब लहाने, मु.पो. लहान्याची वाडी (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)

भाजपचा तळागाळापर्यंत संपर्क आहे!

आम्हाला भाजपच्या मार्गाने सत्ता मिळवायची नाही’ हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे म्हणणे ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखे आहे. लोकसभा २०२४च्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला मिळालेल्या तथाकथित यशाचा सर्वच विरोधी पक्षांना हर्षवायू झाला होताच! अर्थात, आज सर्व विरोधी पक्ष पुन्हा जमिनीवर आपटले आहेत. त्यामुळे जेव्हा सपकाळ म्हणतात की त्यांना भाजपच्या मार्गाने सत्ता मिळवायची नाही तेव्हा त्यांनी स्वत:च्या पायाखाली काय जळते आहे ते जरूर बघावे. अंतर्गत कुरबुरी तसेच कुंपणावर बसलेले काँग्रेसी सभासद ही खूप मोठी डोकेदुखी आहे आणि ती वाढणारच आहे. भाजपसारखी सत्ता मिळवण्यासाठी लागणारा तळागाळापर्यंतचा संपर्क आणि कार्यकर्ते काँग्रेसकडे आधीही नव्हते आणि आताही नाहीत. आता सत्ता नसल्यानेआपणहून काम करणारे सभासदही नाहीत ही काँग्रेसची दशा आहे.-माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भान – ‘जे कधीच नव्हते…’

बालिश बाहुबली…’ हे संपादकीय (२९ मार्च) वाचले. ‘अमेरिकेच्या इतिहासात काही उथळ महात्मे अगदी अध्यक्षपदावरही विराजमान झाले होते’ अशा आशयाचे वाक्य त्यात आहे. त्या अनुषंगाने अमेरिकेच्या इतिहासात डोकावले तर ‘सिग्नलगेट’ सारखी अनेक ‘गेट्स’ आढळतात. हे सारे रिपब्लिकन अध्यक्षांच्या काळात घडले म्हणावे तर हजारो लोकांचे जीव खरोखरच घेणारा अणुबॉम्ब प्रत्यक्ष युद्धात वापरण्याचा निर्णय डेमोक्रॅट्सचा होता. कुठलेही उद्दिष्ट नीट साध्य न करता अत्यंत बेजबाबदारपणे तडकाफडकी अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय वा स्वपुत्रालाच अध्यक्षीय माफी देण्याचा निर्णयही डेमोक्रॅट्सचा! परराष्ट्रसंबंध अमेरिका कसे व किती जबाबदारीच्या भावनेतून जपते याचे मार्मिक वर्णन तर अमेरिकन परराष्ट्रनीतीचे अध्वर्यू व चाणक्य दस्तुरखुद्द हेन्री किसिंजर यांनीच करून ठेवले आहे. ते म्हणाले होते – ‘अमेरिकेशी शत्रुत्व धोकादायक ठरू शकते, पण मैत्री म्हणजे कपाळमोक्ष ठरलेलाच असतो’. (‘टु बी अॅन एनिमी ऑफ अमेरिका कॅन बी डेंजरस, बट टु बी अ फ्रेंड इज फेटल’.) लेखात अध्यक्षांच्या ‘मौजप्रासादा’चा उल्लेख आहे. दोन्ही बाजूंच्या अध्यक्षांच्या अशा मौजप्रासादांची व त्यात घडलेल्या सुरस कहाण्यांची संख्या तर डझनांवारी आहे! सरकारदरबारी विराजमान झाल्यावर जबाबदारीचे भान यावे ही लेखातील अपेक्षा रास्तच; परंतु इतिहास पाहिल्यास कविवर्य सुरेश भट यांच्या ‘जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी’ या काव्यपंक्ती आठवाव्यात अशीच परिस्थिती दिसते.- प्रसाद दीक्षित, ठाणे</p>

अन्यथा जागतिक अर्थवाढीस खीळ

मोदींनी नमते घेतले, पण उपयोग होईल?’ हा पी. चिदम्बरम यांच्या ‘समोरच्या बाकावरून’ सदरातील लेख (३० मार्च) वाचला. जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र, बलाढ्य लष्करी सामर्थ्य, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि अण्वस्त्रसज्जता व आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेला अमेरिका जागतिक स्तरावरील एकमेव महासत्ता असल्याने सर्वच राष्ट्रांना गृहीत धरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सत्तेचा वारू चौफेर उधळला आहे. त्यांना फक्त आपला स्वार्थ तेवढाच दिसतो आहे. कुणाचीही पत्रास ठेवण्याच्या मन:स्थितीत ते नाहीत. यावर उपाय म्हणजे भारतासहित कॅनडा, मेक्सिको, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आदी प्रमुख राष्ट्रांनी सामूहिक दबाव निर्माण करून अमेरिकेस चर्चा करण्यास भाग पाडून त्याद्वारेच उधळलेल्या वारूला वेसण घालता येईल. अन्यथा जागतिक आर्थिक वाढीला खीळ बसेल!- बेन्जामिन डॉम्निका पीटर केदारकर, विरार