‘तुघलकाचा तोरा !’ हा अग्रलेख (१ ऑगस्ट) वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपली अर्थव्यवस्था सुदृढ करणे आणि जागतिक व्यापारात वर्चस्व टिकवणे यासाठी विविध राष्ट्रांवर टॅरिफ लादून आणि निर्बंध आणून व्यापार युद्धाची पार्श्वभूमी तयार करत आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिका स्वत:च आपल्या पारंपरिक व्यापारी भागीदारांशी संबंध बिघडवत आहे. भारत, चीनसह युरोपीय देशांवर लादलेले आयात-निर्यात निर्बंध, आणि जागतिक व्यापार परिषदेच्या भूमिकेवर सतत होणारी टीका हे व्यापार युद्धाचे संकेत आहेत. आज कोणतेही राष्ट्र त्याला लागणारी सर्वच उत्पादने स्वत:च्या राष्ट्रांमध्ये निर्माण करू शकत नाही. आयात-निर्यात करूनच सर्व देशांचा कारभार सुरू आहे. जग मुक्त आणि खुल्या व्यापाराच्या दिशेने जात असताना, अमेरिकेचे हे उलटे धोरण जागतिक आर्थिक स्थैर्यावर परिणाम करणारे आहे. या व्यापारयुद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. भारतासारख्या देशांना नव्या व्यापारसंधी शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
● अनिल साखरे, कोपरी (ठाणे)
ही दांडगाई खपवून घेऊ नये
‘तुघलकाचा तोरा !’ हा अग्रलेख (१ ऑगस्ट) वाचला. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वागणे मी म्हणेन ती पूर्व दिशा या पद्धतीचे आहे. हे वागणे अठराव्या-एकोणिसाव्या शतकात एक वेळ समजून घेता आले असते, मात्र एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात हे वागणे इतर देश खपवून घेणार नाहीत. काही देशांनी अमेरिकेसमोर नमते घेतले असले, तरी भारताने आपले, आपल्या शेतकरी आणि उद्याोजकांचे हित विचारात घेऊनच पुढील पावले टाकावीत. आपण जगातील सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश आहोत आणि त्यामुळे जगातील सर्वांत मोठी बाजारपेठही आपल्याकडेच आहे. अमेरिकेच्या दांडगाईवर नियंत्रण आणण्यासाठी याचा योग्य वापर केला पाहिजे.
● प्रा. किरण शिंदे, पुणे</p>
काळ सोकावतो, त्याचे काय?
‘संशयाला पुराव्यांचा आधार नाही’ ही बातमी (लोकसत्ता- १ ऑगस्ट) वाचली. दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटांसंदर्भात अशीच बातमी प्रसिद्ध झाली होती. दोन्ही खटल्यांत न्यायालयाने आरोपींची पुराव्यांअभावी सुटका केली. या दोन्ही घटना घडल्या हे ढळढळीत सत्य आहे. त्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पण मग चुकले कुठे? वकिलांनी केस लढवताना केलेली गफलत कारणीभूत आहेच की आणखी काही? याच प्रकरणांचा आधार यापुढील अशाच प्रकरणांत घेतला जाण्याची शक्यता बळावते. पुढे कधीतर वरिष्ठ न्यायालयात निकाल वेगळा लागूही शकतो, तो भाग वेगळा. आणखी एक निरीक्षण म्हणजे, या दोन्ही निकालांपैकी एका निकालावर दु:ख व्यक्त केले जाते आणि दुसऱ्या निकालाविषयी कोणी अवाक्षरही काढत नाही. हे समाज व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारे. पुढे जे होईल, ते होईल, पण अशाने काळ सोकावतो, त्याचे काय?
● मिलिंद वराळे, मुलुंड (मुंबई)
राष्ट्रवादीकडे पात्र व्यक्ती नाही?
‘कोकाटेंचा खाते बदल, वादग्रस्त विधाने भोवली’ ही बातमी (लोकसत्ता- १ ऑगस्ट) वाचली. शेतकऱ्यांना पीक कर्ज फेडता येत नाही एवढी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. असे असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र विधिमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळताना आढळले याला काय म्हणावे? त्यांची अशी (रमी) ‘खेळातील आवड’ बघून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले का? राज्यात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना राज्याचे कृषीमंत्री भर विधिमंडळात रमी खेळून आपले मन रमवतात याला काय म्हणावे? ते दोषी असतानाही त्यांच्या पक्ष नेतृत्वाला त्यांना पुन्हा तुलनेने दुय्यम का होईना क्रीडा खाते देऊन मंत्रीपदावर विराजमान होण्याची संधी द्यावी लागली, यात त्यांच्या निवडून येण्याचे अर्थकारण दडले आहे का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात मंत्रीपदासाठी अन्य कोणी पात्र व्यक्ती नाही का?
● प्रवीण आंबेसकर, ठाणे</p>
हताश अजितदादा!
‘कोकाटेंचा खाते बदल’ या बातमीवरून लक्षात येते की, काकांना सोडल्यापासून कायम तडजोड अजितदादांनाच करावी लागते आहे. कोकाटे प्रकरणावरून जनतेच्या हे लक्षात आले आहे. कोकाटेंनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा घेण्याचा आव आणला गेला आणि केवळ खाते बदल करून प्रकरण मिटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्र्यांनीही या खाते बदलास होकार देऊन आपले कणखर अस्तित्व पूर्णपणे झाकोळून टाकले.
● अरुण बधान, डोंबिवली