विशुद्ध पर्यावरणाचा हक्क बजावताना आपण जगण्याच्या संवर्धनाचे कर्तव्यही पार पाडू शकतो…

एकविसाव्या अनुच्छेदानुसार आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, हे न्यायालयाने वेळोवेळी अधोरेखित केले. आरोग्याची व्याख्या व्यापक आहे. त्यामुळे ती करताना जगण्याच्या हक्काची परिभाषा अधिक विस्तारत गेली, असे दिसते. या अनुच्छेदामध्ये अनेक मौलिक अधिकारांचा उल्लेख नाही; मात्र वेळोवेळी न्यायालयाने घेतलेल्या निकालपत्राने या हक्कांना अधिकृत मान्यता दिली गेली आहे. उदाहरणार्थ, डेहराडून खोऱ्यातील खाणकाम प्रकल्पांच्या अनुषंगाने एक खटला उभा राहिला. या प्रकल्पांमुळे मातीचे प्रदूषण, वायुप्रदूषण आणि एकुणातच मानवी जगण्याला घातक असे बदल घडत होते. तेव्हा या प्रकल्पाला स्थगिती देताना (१९९७) न्यायालयाने सांगितले की, शुद्ध आणि स्वच्छ पर्यावरणात राहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अनुच्छेद २१ मध्ये असलेल्या जगण्याच्या अधिकारामध्येच हा अधिकार अंतर्भूत आहे. ‘एम. सी. मेहता विरुद्ध भारतीय संघराज्य’ (१९८६) या खटल्यातही न्यायालयाने प्रदूषणमुक्त पर्यावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार मान्य केला. तसेच सुभाष कुमार यांनी बिहारमध्ये बोकारो नदीजवळील स्टील व लोहाच्या कारखान्यांच्या विरोधात केलेल्या जनहित याचिकेच्या (१९९१) खटल्यात स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा अधिकार मान्य केला गेला. आरोग्यदायी हवा, पाणी आणि जमीन याबाबतच्या अनेक न्यायालयीन खटल्यांनी पर्यावरणविषयक अधिकार मान्य केले आहेत.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan right to clean environment amy
First published on: 24-05-2024 at 03:08 IST