कधी काळी जिचा स्पर्शही विटाळ मानला जात असेल, त्या दाक्षायनीच्या स्पर्शाने भारतीय संविधानाला मानवी चेहरा प्राप्त झाला..
स्वातंत्र्यलढय़ात स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी महात्मा गांधींनी प्रयत्न केले, तरीही संविधान सभेत केवळ १५ स्त्रिया होत्या. त्यापैकी एक महत्त्वाच्या सदस्य- दाक्षायनी वेलायुधन. संविधान सभेतील सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला.
मद्रास प्रांतातील पुलाया जातसमूहात दाक्षायनी यांचा जन्म झाला. या जातसमूहाला वर्षांनुवर्षे अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. त्याचे चटके दाक्षायनी यांनी सोसले. रसायनशास्त्रासारखा शिकत असताना अस्पृश्यतेची वागणूक त्यांना दिली गेली. प्रयोगशाळेत इतर विद्यार्थी-प्राध्यापकांपासून काही अंतर दूर उभे राहून त्या रसायनशास्त्र शिकल्या आणि पुढे शिक्षक म्हणून काम करू लागल्या. गांधींचा त्यांच्यावर प्रभाव होता मात्र गांधींच्या ‘हरिजन’ संबोधण्यावर त्यांनी टीकाही केली. १९४० ला दाक्षायनी यांचे लग्न वध्र्याच्या आश्रमात महात्मा गांधी, कस्तुरबा गांधींच्या उपस्थित झाले होते. स्वातंत्र्य आंदोलनात दाक्षायनी यांचा सक्रिय सहभाग होता.
१९४५ साली त्या कोचीतून निवडून आल्या आणि पुढे १९४६ ला संविधान सभेच्या सदस्य झाल्या. त्यांना संविधान सभेत प्रवेश करू देऊ नये, याकरता पं. नेहरू आणि सरदार पटेल यांना पत्रं पाठवण्यात आली होती. शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनमधल्या काही दलितांचा तर काँग्रेसमधल्या काही कर्मठ नेत्यांचा त्यांना विरोध होता. काँग्रेस मात्र ठामपणे दाक्षायनी वेलायुधन यांच्या पाठीशी उभी राहिली.
संविधान सभेमध्ये सामील झाल्यानंतर नेहरूंनी उद्देशिकेचा प्रस्ताव मांडताच दाक्षायनी यांनी आपला सहभाग नोंदवला. जमातवादाचा धोका त्यांनी सांगितला आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ‘फॅसिस्ट’ संघटना असल्याचे संबोधत जमातवाद आणि साम्राज्यवाद या दोन्हींचे धोके त्यांनी मांडले. स्वत: दलित असूनही विभक्त मतदारसंघांना त्यांनी ठामपणे विरोध केला. या भूमिकेमुळे शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशनच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. याआधीही दाक्षायनी यांना दलितांकडून विरोध झाला होता. कॅबिनेट मिशनला विरोध करायचा म्हणून मुस्लीम लीग आणि शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनने ‘प्रत्यक्ष कृती दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले तेव्हा या आवाहनालाही दाक्षायनी यांनी विरोध केला होता. प्रसंगी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवरही टीका केली.
भारताच्या संघराज्यवादाच्या रचनेत प्रांतांपेक्षा केंद्राला अधिक प्राधान्य दिले होते. यातून केंद्र अधिक वर्चस्वशाली होईल, अशी भीती व्यक्त करत अधिकाधिक विकेंद्रीकरण केले तर भारताची एकता शाबूत राहील, असे त्यांचे मत होते. संविधान सभेत त्यांनी हे आग्रहाने मांडले होते. दाक्षायनी यांनी अस्पृश्यतेचे विदारक अनुभव सोसले होते. त्यामुळे अस्पृश्यतेवर बंदी आणणाऱ्या कलम १७ विषयी चर्चा सुरू असताना त्या म्हणाल्या होत्या की, अस्पृश्यता निर्मूलनासाठी केवळ शिक्षा उपयोगाची नाही तर राज्यसंस्थेने त्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला पाहिजे, त्यासाठी मोहीम राबवली पाहिजे. संविधान लागू झाल्यानंतरही दाक्षायनी राजकारणात सक्रिय राहिल्या. स्वतंत्र भारतातही त्या खासदार म्हणून निवडून आल्या. गांधी इरा पब्लिकेशन्स, जय भीम या प्रकशनांचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. महिला जागृती परिषदेची स्थापना केली.
रा.स्व.संघ असो वा मुस्लीम लीग, गांधी असोत वा आंबेडकर, काँग्रेस असो की शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन अशा चिकित्सा करत दाक्षायनी वेलायुधन यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या बाणेदार स्त्रीने संविधान सभेत आणि नंतर संसदेत भारताचे नेतृत्व केले. कधी काळी तिचा स्पर्श झाला तर विटाळ मानला जात असेल; मात्र भारतीय संविधानाला दाक्षायनी यांच्या स्पर्शाने मानवी चेहरा प्राप्त झाला. हा खरा काव्यात्म न्याय होता! जणू सावित्रीबाई फुलेंचा वारसाच दाक्षायनी यांनी पुढे चालवला.
डॉ. श्रीरंजन आवटे