व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारखी माध्यमे केवळ खोट्या बातम्या पसरवण्याची साधने नाहीत तर वास्तवाचा आभास निर्माण करणारे कारखाने आहेत. त्यामुळे एखाद्या विधानातील सत्यता महत्त्वाची ठरत नसून सामाजिक विभागणीमध्ये त्याची उपयुक्तता किती आहे यावर ते व्हायरल होत आहे. सन २०२४ ची गोष्ट! महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरणाला जोर आला होता. खासगी गप्पांमध्ये संसदेच्या कँटीनमध्ये एक ज्येष्ठ पत्रकार उत्साहाने सांगत होते, महाराष्ट्र हा प्रबोधनाची परंपरा असलेला प्रदेश आहे. हिंदी गायपट्ट्याची भाषा येथील जनतेला भावणार नाही. फार तर दीड वर्ष झाली असतील या गोष्टीला! आज धार्मिक ध्रुवीकरण हा राजकारणाचा ‘कॉमन सेन्स’ झाला आहे.
उथळपणाला सोन्याचे दिवस आले आहेत. बहुतांशी समाजाची चिकित्सक वृत्ती, ज्ञानलालसा होऊन कळपातील मेंढरांप्रमाणे राजकीय नेतृत्वाचे अनुपालन करण्यात धन्यता प्राप्त होत आहे. प्रवाहाविरुद्ध आवाज उठविल्यास धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी वगैरे आभूषणांनी प्रश्न विचारणाऱ्याचा उद्धार केला जातोय. शैक्षणिक संस्थांची बजबजपुरी होऊन पूर्वेकडील ऑक्सफर्ड वगैरे समजली जाणारी विद्यापीठे आज रया घालवून बसली आहेत. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की यावर राजकीय चर्चाच व्हायला तयार नाही. महाराष्ट्राचे किंवा देशाचे गेल्या दीड वर्षातील ‘वैचारिक शीघ्रपतना’चे पैलू उलगडताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून उत्सव, इतिहास, खाद्या-संस्कृती, सिनेमा आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा राजकीय संभाषणासाठी केला जाणार प्रभावी वापर आणि तंत्रज्ञानाची मिळालेली जोड!
संस्कृतीतून मेंढरूपणाकडे
नागरिकांच्या मेंढरे बनण्याच्या या प्रक्रियेत ग्रामशी या तत्त्वज्ञाने २० व्या शतकात केलेल्या विश्लेषणाचा आधार घेता येतो. तुरुंगात होता बिचारा मुसोलिनीविरुद्ध आवाज उठवला म्हणून! त्याला प्रश्न पडला की डाव्यांनी इटलीचे राजकीय अवकाश व्यापले असताना मुसोलिनीने सत्ता काबीज कशी केली? मग त्याने सांगितले की स्थिर आणि दीर्घकालीन शासन हे प्रामुख्याने जोर-जबरदस्ती किंवा दडपशाहीद्वारे टिकत नाही, तर ते समाजात सूक्ष्म आणि सर्वव्यापी पद्धतीने संमती घडवून आणल्याने टिकते. प्रसारमाध्यमे, शिक्षण व्यवस्था, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्था या माध्यमातून सामाजिक मूल्ये, संकेत आणि कॉमन सेन्स घडवला जातो. या कॉमन सेन्समध्ये हिंदुत्वाची बीजे पेरली जात आहेत. हिंदुत्व म्हणजेच सत्य आहे, सामान्य आहे या विचारातून हिंदुत्वाची संकल्पना राजकीय फायद्याच्या पलीकडे सर्वमान्य सत्य म्हणून पेरण्याचा उद्याोग आहे. ग्रामशी म्हणतो की अर्थव्यवस्थेच्या भरवशावर सांस्कृतिक आणि राजकीय डोलारा उभारला गेला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सध्याची राजकीय शक्ती पहिल्यांदा सांस्कृतिक डोलाऱ्यावर झ्र संस्कृती, धर्म, अस्मिता आणि इतिहास यांवर नियंत्रण स्थापन करताना दिसत असून जेणेकरून या वर्चस्वाने आर्थिक नाड्या नियंत्रणात ठेवता येतील. यातूनच मग विशिष्ट धर्मावर आर्थिक बहिष्कार टाकणे, उत्सवांच्या माध्यमांतून विशिष्ट कथनाला बळ देणे, सर्वोच्च नेत्याकडून प्रत्येक सणाआधी संदेश देऊन त्यातून स्वदेशी, आत्मनिर्भर वगैरे नारे देऊन बाकीच्यांनी त्याचे अनुकरण करणे असले प्रकार सामान्य होत आहेत. इथे एक गोष्ट जाणवते की सर्वोच्च नेता नैमित्तिक दिशा देताना एक आदेश देत असतो. तो देशप्रेम, संस्कृती धर्म वगैरे शब्दांनी मढवला जाऊन आदेश नसून मार्गदर्शन आहे असे भासविले जाते. तो असतो केवळ एक ढाचा! मग दुसऱ्या फळीतील नेते त्यावर मुलामा चढवितात. सिनेअभिनेते, इन्फ्लुएन्सर्स यांच्याकडून तोच राग आळवला जातो. त्यातून इतर धर्मीयांबद्दल द्वेषमूलक विधाने, आत्यंतिक शाकाहारवाद, हलाल विरुद्ध झटका वगैरे वाद उकरून काढले जातात. समाजमाध्यमांकडून या ध्रुवीकरणाच्या आशयाला खतपाणी दिले जाते. भारतामध्ये स्वस्त असणारे इंटरनेट, ट्रोल्सकडून व्यूहात्मक पेरणी यांमुळे असले संदेश रात्रभरात सार्वत्रिक होतात. स्थानिक पातळीवर मग समाजमाध्यमे वगैरेंच्या माध्यमातून नवीन कथानक रचले आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. एखादा संघर्ष घडविला जातो. जेणेकरून नवीन कथानकच सत्य आहे याची जनतेला जाणीव होईल. जो या कॉमन सेन्सनुसार विचार करत नाही त्याला मग लेबलं लावली जातात. सर्वोच्च नेत्याने समाजमाध्यमावरील प्रोफाइल चित्र बदलले की त्याचे अनुकरण गल्लीपासून दिल्लीपर्यंत केले जाते. दिवाळीला अयोध्येला प्रकाशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्वच ठिकाणी त्याची नक्कल करण्यास सुरुवात झाली. ड्रोन शोच्या माध्यमातून उत्सव भव्यदिव्य आणि साजरा करण्याची एकच प्रथा अत्यंत सामान्य होत आहे. संघाच्या शंभरीनिमित्त देशव्यापी संचलने होत असताना संघाशी संबंध नसलेले लोक हिरिरीने सहभागी होत होते. कारण एकच होते. नक्कल करण्याची राष्ट्रीय परंपरा रुजत असताना आपण वेगळे राहू नये! स्वतंत्र विचार आणि अस्तित्व सोडून समाजाची निरागस मेंढरूपणाकडे वाटचाल हा तंत्रज्ञान, संस्कृती आणि राजकारण यांच्या मिलाफाचा सर्वोच्च परिपाक आहे.
प्रतिरूपातील सत्य
जॉ बॉड्रीलार्ड हा फ्रेंच तत्त्ववेत्ता या नकलीकरणाचे विश्लेषण करतो. तो म्हणतो की माध्यमांनी भरलेल्या या आधुनिकोत्तर जगात वास्तवाशी असलेला आपला संबंध पडद्यावर दिसणाऱ्या चित्र आणि दृश्यफितींनी प्रभावित केला आहे. ही चित्रे वास्तवाचे प्रतिंबिंब म्हणून आपल्या संकल्पना प्रभावित करण्यास सुरुवात करतात आणि एक वेळ अशी येते की माध्यमातून दिसणारी दृश्ये, समाजमाध्यमातून तयार होणारी कथानके यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. मात्र सर्वसामान्य लोक त्या कथानकात अडकून पडल्याने समाजमाध्यमातून प्रतीत होणारे जग म्हणजेच वास्तव अशी त्यांची फसगत होते. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारखी माध्यमे केवळ खोट्या बातम्या पसरवण्याची साधने नाहीत तर वास्तवाचा आभास निर्माण करणारे कारखाने आहेत. पर्यायी ‘तथ्ये’, उदाहरणार्थ, युनेस्कोने एका विशिष्ट राष्ट्रगीताला सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून घोषित केले असले दावे वेगाने आणि भावनिक तीव्रतेने पसरवले जातात, तेव्हा ती माहिती खोटी असूनही लाखो लोकांसाठी ‘व्यावहारिक वास्तव’ बनतात. या प्रतिरूपांची ताकद ही आहे की त्याचे मुख्य कार्य पटवून देणे हे नसून, विभागणी करणे हे आहे. एखाद्या विधानातील सत्यता महत्त्वाची ठरत नसून सामाजिक विभागणीमध्ये त्याची उपयुक्तता किती आहे यावर ते व्हायरल होत आहे. प्राचीन भारतीयांकडे प्रगत विमान तंत्रज्ञान होते, किंवा एखादी विशिष्ट मशीद एका भव्य मंदिराच्या अवशेषांवर बांधली गेली आहे, अशा दाव्यांवर विश्वास ठेवणे आणि त्यांचा प्रसार करणे, हे अनेक लोकांसाठी ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक चौकशीचे कृत्य नसते. ती असते निष्ठेची घोषणा झ्र एका विचारसरणीशी, संस्कृतीशी आणि तथाकथित अस्तित्वासाठी! तर्कहीन गोष्टी स्वीकारून त्यांचा बचाव करणे, हाच निष्ठेचा अंतिम पुरावा ठरतो.
यातून काय साध्य होतं? तर एक देश, एक धर्म, एक संस्कृती, एक आचार, एक विचार, एक नेता, एक पक्ष वगैरे लांबत जाणारी यादी आणि तिचे केवळ एकाच प्रतिमानात होणारे अवमूल्यन! देवाला नैवेद्या दाखविण्यापासून खाण्याच्या सवयीपर्यंत प्रत्येक ठिकाणी हजारो वर्षांचा वारसा आणि वैविध्य विसरून खोट्या प्रतिरूपात अडकून आपण एकसमान प्रक्रियेचा हट्ट धरत आहोत. आपण विरुद्ध ते या कॉमन सेन्समधून ‘त्यांच्या’ आस्थापनांवर बहिष्कार घालण्याची भाषा करत आहोत. इतिहास आणि पुरातत्त्व यांचा अभ्यास ज्ञानवृद्धीसाठी होत नसून इतिहासातील चुका दुरुस्त करून इतिहासाला न्याय देण्याचा कॉमन सेन्स वृद्धिंगत होत आहे. आशिया कपमधील हस्तांदोलन नाट्य बारकाईने समजून घेतल्यास हे देखील लक्षात येईल की राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली सामान्य लोकांना मूर्ख बनवून, खेळभावना पणास लावून गल्लेभरूपणापासून मात्र फारकत घेतली जात नाही. अर्बन नक्षल, तुकडे तुकडे गँग वगैरे शोध लावून विरोध करणाऱ्यांना, प्रश्न विचारणाऱ्यांना, टीका करणाऱ्यांना बेदखल केले जाते. भलेही ते प्रथितयश प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, वकील, कवी आणि विद्यार्थी असले तरीही! दशकांच्या मेहनतीने समाजमान्य झालेल्या या लोकांवर एखादा थिल्लर इन्फ्लुएन्सर येऊन चिखलफेक करतो आणि समाज त्याला स्वीकारतो हे आपले वास्तव झाले आहे.
देशभक्ती जेव्हा आक्रस्ताळी, आक्रमक आणि ठरावीक लोकांसाठी राखीव असलेली प्रदर्शनाची बाब बनते तेव्हा तिची सर्वसमावेशक प्रतिमा बदलून शांत आणि संयमी प्रेमापासून तिचा संबंध तोडला जातो. अशा वेळी देशातील मंदिरे, पुतळे, सण-उत्सव, घोषणा वगैरे प्रतीकांचा एक भव्य आणि झगमगता संग्रह उरतो. दुर्दैवाने ही प्रतीके आतून पोकळ झालेली असतात, त्यांचे खरे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व नष्ट होऊन एका कायमस्वरूपी राजकीय मोहिमेतील केवळ दिखाव्याच्या वस्तू इतकेच त्यांचे महत्त्व उरते. दृश्य स्वरूपातील ही घसरण सामूहिक बौद्धिक क्षमतेपर्यंत उतरते आणि नागरिकतेचा ऱ्हास होऊन मागे उरतो तो फक्त मेंढरांचा कळप!