राजकारणाचा धर्माशी सांधा का नको, हे सांगणारा व्होल्तेर शासकीय यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेनं केलेल्या बहुसंख्याकवादी अपराधाशी लेखणीनं लढला…
Crush the infamy. – Voltaire
सर्वसाधारणपणे, तत्त्वज्ञ म्हणजे ज्याचं मन जगात रमत नाही अशी निराशावादी निष्क्रिय व्यक्ती. तत्त्वज्ञाच्या या निष्क्रियतामूलक आणि निराशावादी प्रतिमेची मुळं आधुनिकतापूर्व काळातल्या तत्त्वज्ञानविषयक धारणांमध्ये आहेत. पारंपरिकरीत्या, तत्त्वज्ञान म्हणजे परलोकवादी, धार्मिक गोष्टींचं अमूर्त चिंतन असा अर्थ होत असे. अशा परलोकवादी अमूर्त चिंतनात वर्तमानाला गौण लेखून त्याला अदृश्य करण्याकडे कल असे. परिणामी, वर्तमानकाळ तत्त्वज्ञानासाठी आणि पर्यायाने कृतीसाठी अपात्र; म्हणून पारंपरिक तत्त्वज्ञ म्हणजे वर्तमानापासून रजा घेऊन खिन्न मानसिकतेत आकाशाकडे पाहात जगणारा निष्क्रिय, निराशावादी, दु:खी प्राणी! मनुष्याला कृतीप्रवण होण्यासाठी त्याला त्याची कृती अर्थपूर्ण वाटली पाहिजे. कृतीत आनंद वाटला पाहिजे. कृतीचं क्षेत्र वर्तमानकाळ हेच असतं. पण पारंपरिकरीत्या, तत्त्वज्ञान वर्तमानातल्या वास्तवालाच अदखलपात्र ठरवत असल्यानं तत्त्वज्ञाचं निष्क्रिय होणं स्वाभाविक मानलं गेलं. पण व्होल्तेर म्हणतो त्याप्रमाणे, ‘निष्क्रियता ही माणसाच्या खिन्न आणि दु:खी मानसिकतेचं मूळ कारण आहे’. तो लिहितो, Work keeps at bay three great evils: boredom, vice, and need.
याआधी आपण पाहिलं की आधुनिकतेच्या वाटचालीत तत्त्वज्ञानाच्या पारंपरिक व्याख्येत मूलभूत स्थित्यंतर होऊन तत्त्वज्ञानात ईहवादाला प्राधान्य देण्यात आलं. ‘प्रबोधन म्हणजे काय?’ या लेखात मिशेल फुको नमूद करतो की ‘वर्तमानाच्या सत्तत्त्वाला’ (ontology of the present) तत्त्वज्ञानाचा आणि कृतीचा केंद्रबिंदू म्हणून प्रस्थापित करून त्यात हस्तक्षेप करणं १८ व्या शतकातल्या प्रबोधनपर्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. वर्तमानाविषयी प्रखर भान, आकलन आणि हस्तक्षेप या गोष्टी प्रबोधनपर्वाच्या तत्त्वज्ञाला इतर प्रकारच्या तत्त्वज्ञांपासून वेगळं करतात. तत्त्वज्ञानाच्या या आधुनिक व्याख्येचे पैलू प्रबोधनपर्वाच्या प्रखर टप्प्यातला तत्त्वज्ञ व्होल्तेरच्या लिखाणात आणि कृतीत कशा प्रकारे अभिव्यक्त होतात, हे आजच्या लेखात पाहू.
विसाव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत रोलाँ बार्थ व्होल्तेरचं (१६९४- १७७८) वर्णन ‘शेवटचा आनंदी तत्त्वज्ञ’ असा करतो. व्होल्तेरच्या विपुल लिखाणाप्रमाणेच त्याचं दीर्घ आयुष्यही तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं आशयघन आहे. आधुनिक काळातला सॉक्रेटिस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्होल्तेरला ८४ वर्षांचं आयुष्य लाभलं. बहुआयामी विपुल लिखाण आणि विविध प्रश्नांवर पावलोपावली भूमिका आणि थेट हस्तक्षेप, असं त्याचं एकूण वादळी आणि देदीप्यमान आयुष्य होतं. अनेक वेळा त्याच्यावर हल्ले झाले. कुख्यात बास्तीईमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. अनेकदा मायदेश सोडावा लागला. पण व्होल्तेरला प्रबोधनाच्या कृतीत जोखीम आहे याची जाणीव असली तरी रूसोसारखी त्याला हुतात्मा होण्याची घाई नव्हती. जगाला काळोखातून बाहेर काढण्यासाठी पराभूत मानसिकतेच्या हुतात्म्यांची नव्हे तर आनंदी तत्त्वज्ञ-योद्ध्यांची आवश्यकता आहे, अशी त्याची ठाम भूमिका होती.
व्होल्तेरचा समकालीन नेमस्त तत्त्वज्ञ मोन्तेस्किअसाठी सत्तेचं विभाजन (Separation of Powers) व्यक्तीच्या उत्कर्षाची आणि समाजाच्या प्रगतीची पूर्वअट आहे. मात्र व्होल्तेरच्या दृष्टीनं जोवर धर्म आणि राजकारण यांच्यातला अन्यायमूलक सांधा (नेक्सस) टिकून आहे तोवर समाज काळोखातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे, धर्म आणि राजकारण यांच्यातली फारकत (Separation of Politics and Religion) घडवून आणणं व्होल्तेरच्या लिखाणाचं आणि कृतींचं प्रमुख ध्येय आहे; जे त्यानं उतारवयातही ‘कालास प्रकरणा’त (l’ affaire Calas) जगासमोर मांडलं. प्रस्तुत लेखात कालास प्रकरणाच्या निमित्तानं व्होल्तेरचा आणि एकूणच प्रबोधनपर्वाचा धर्मविषयक दृष्टिकोनाची चर्चा करू.
‘कालास प्रकरण’ ( l’ affaire Calas)
फ्रान्समधील तुलूझ शहरात १७६१ मध्ये घडलेली ही घटना. त्या कट्टरपंथी कॅथोलिक शहरात अल्पसंख्याक प्रोटेस्टंट व्यापाऱ्यांची वस्ती होती. एकेदिवशी जाँ कालास नावाच्या प्रोटेस्टंट व्यापाऱ्याचा मुलगा मार्क ऑन्त्वॉन गळफास घेऊन आत्महत्या करतो. ख्रिास्ती धर्मात आत्महत्या पाप समजलं जात असल्याने आपल्या मुलाला धार्मिक अंतिम संस्कारांना मुकावं लागेल आणि त्याच्या पार्थिव शरीराची विटंबना करण्यात येईल या भीतीनं, ‘त्यानं आत्महत्या केली नसून त्याचा खून झालाय’, अशी तक्रार जाँ कालासचे कुटुंबीय करतात. खून झाला असेल तर खुनी कोण याविषयीच्या तपासात कालास कुटुंबीयांनाच छळाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे तो जबानी बदलून, मुलानं आत्महत्या केल्याचं सांगतो. मात्र तोवर कालास प्रकरणाला धार्मिक वळण देण्यात आलेलं असतं. ‘जाँ कालासचा मुलगा मार्क ऑन्त्वॉन कॅथोलिक धर्मात प्रवेश करण्याच्या बेतात होता म्हणून त्याच्या प्रोटेस्टंट वडिलांनीच त्याचा खून केला’ अशी अफवा इतकी पसरते की, त्याच आरोपाखाली कालासवर खटला भरला जातो. कट्टरवादी कॅथोलिक शहरातली शासकीय तपासयंत्रणाही धर्मांध असल्यानं नावापुरता खटला चालवला जातो. बहुसंख्याक कॅथोलिक समाजाला खूश करण्यासाठी कालासला ‘धार्मिक अपराधी’ ठरवून देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात येते. त्याची संपत्ती जप्त करून कुटुंबालाही तडीपार करण्यात येतं.
कालासची ही बातमी व्होल्तेरच्या कानी पडल्यावर त्याच्या लक्षात आलं की कालास धर्मांधतेचा बळी ठरला आहे. शासकीय यंत्रणा आणि न्यायव्यवस्था मुळात अपराधी आहे. मात्र, अल्पसंख्याक कालासवर झालेल्या अन्यायाविषयी बहुसंख्याक कॅथोलिक समाजात उदासीनता होती, राज्यसंस्थेचा दृष्टिकोनही प्रतिकूलच होता. अशाही परिस्थितीत व्होल्तेर मैदानात उतरला. व्होल्तेरनं ‘कालास प्रकरणा’त उडी घेतली तेव्हा तो सत्तरीच्या जवळ पोहचलेला होता. महत्त्वाची बाब म्हणजे कालास हा प्रोटेस्टंट होता म्हणून व्होल्तेरनं व्यवस्थेला अंगावर घेतलं नव्हतं. तर ‘एका निष्पाप मनुष्याचा व्यवस्थेकडून खून झाला आहे’ म्हणून तो अन्यायाविरुद्ध पेटून उठला.
खरं तर, व्होल्तेरचं ठाम मत होतं की प्रोटेस्टंटसुद्धा कॅथोलिकांसारखेच असहिष्णु आणि धर्मांध आहेत. तो त्याच्या जहाल शैलीत लिहतो, ‘धर्मांध कॅथोलिक आणि धर्मांध कॅल्व्हिनिस्ट ही एकाच दुर्गंधीची भ्रष्ट अपत्यं आहेत.’
असं असेल तर, एका सामान्य व्यापाऱ्यासाठी व्होल्तेरसारख्या जागतिक कीर्तीच्या विचारवंतानं उतरत्या वयात मैदानात का उतरावं हा प्रश्न साहजिक पडू शकतो. व्होल्तेरनं या प्रकरणाचा वापर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी केला का? हे खरं आहे की, १८ व्या शतकात निर्णायक महत्त्व प्राप्त झालेल्या सार्वजनिक अवकाशाचा ( public sphere) आणि सार्वजनिक मताचा ( public opinion) प्रमुख शिल्पकार म्हणून व्होल्तेरला मान्यता मिळालेली होती. त्याला सार्वजनिक अवकाशाचं गतीशास्त्र अवगत होतं. सार्वजनिक मताला हवं ते वळण देण्यात आणि सार्वजनिक मत घडवण्यात व्होल्तेरला तोड नव्हती. त्याच्या आक्रमक, भेदक, उपरोधिक, तिरकस, खोचक, व्यंगात्मक, बिनतोड, विद्वत्तापूर्ण लिखाणापुढे अनेकांना शरण जावं लागलं होतं. पण ज्या वयात त्यानं एका सामान्य व्यक्तीसाठी जिवाचं रान केलं, त्या वयात त्याचं वर्णन ‘युगप्रवर्तक प्रबोधनकार’ म्हणून केलं जातच होतं. एवढंच नाही तर, १७ वं शतक जसं चौदाव्या लुईच्या नावाने ओळखलं जातं होतं, तशी १८ व्या शतकाची ओळख व्होल्तेरच्या नावानं होत असे. तो फक्त फ्रान्समध्येच नव्हे तर संपूर्ण पाश्चात्त्य जगात प्रबोधनपर्वाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून प्रसिद्धीस आला होता. Crush the infamy हे त्याच्या कृतिशील तत्त्वज्ञानाचं आक्रमक ब्रीदवाक्य होतं.
असं म्हटलं जातं की त्यानं लेखणी उचलली तर राजेशाहींचा थरकाप होत असे. त्यामुळे व्होल्तेरनं कालास प्रकरणाचा वापर प्रसिद्धीसाठी केला नसून आधुनिकतेच्या वाटचालीत धोंडा ठरलेल्या अन्यायमूलक अशा धर्मांधतेच्या प्रश्नाला जागतिक पटलावर आणण्यासाठीच केला, असा निष्कर्ष काढता येतो.
खरं तर, १६८५ मध्ये चौदाव्या लुईनं उपासनास्वातंत्र्य बहाल करणारा अध्यादेश ( Edict of Nantes) रद्द केल्यानंतर कॅथोलिक चर्च निरंकुश आणि दमनकारी बनलं होतं. असंख्य निरपराध लोक धार्मिक असहिष्णुतेची शिकार होत असत. व्होल्तेरनं कालासला न्याय मिळवून देण्यासाठी जगभरातील नामवंतांना धर्मांध व्यवस्थेचे वाभाडे काढणारी जवळपास पाचशे पत्रं लिहिली. त्यामुळे व्होल्तेरने धर्मांधतेच्या विरोधात आणि सहिष्णुतेसाठी अथकपणे सलग तीन वर्षे चालवलेली ही प्रबोधनपर मोहीम ‘कालास प्रकरण’ (l’ affaire Callas) म्हणून ओळखली जाते. शेवटी १७६४ मध्ये व्होल्तेरच्या प्रयत्नांना यश येऊन, कालासच्या स्मृतीचं पुनर्वसन करण्यात आलं. त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला.
‘ही माझी लढाई नाही!’ असं म्हणत आपापल्या कोषात जगणाऱ्या आत्मकेंद्रित लोकांमध्ये एका क्षुल्लक व्यापाऱ्यासाठी उतारवयातला व्होल्तेरनं अथकपणे सलग तीन वर्षांची स्तिमित करणारी मोहीम चालवलीच. त्याच दरम्यान Treatise on Tolerance हा ग्रंथ लिहून राजकारण आणि धर्म यांतील फारकत ही सहिष्णु, न्याय्य, उदारमतवादी, प्रगतिशील, ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीची पूर्वअट आहे, हे विशद केलं. त्याचं स्पष्ट मत आहे की ‘समाजात एकच धर्म असला तर तो निरंकुश आणि दमनकारी ( despotic) बनून व्यक्तीचा नाश करतो. समाजात दोन धर्म असले की यादवीला निमंत्रण असतं. अनेक धर्म असले तर शांतता, सहिष्णुता आणि प्रगतीची शक्यता निर्माण होते.’
तसं पाहिलं तर प्रबोधनपर्वातल्या बहुतेक विचारवंतांप्रमाणे व्होल्तेर धर्मश्रद्धेविरुद्ध नसून धार्मिक भावनांचं संस्थाकरण आणि धर्म- राजकारण यांच्यातल्या ‘नेक्सस’च्या विरुद्ध आहे. व्होल्तेर लिहितो- ‘विश्व म्हणजे एक क्लिष्ट पण अचूकपणे चालणारं घड्याळ. घड्याळ आहे तर घड्याळ बनवणाराही असला पाहिजे…’ या युक्तिवादातून त्याचं धर्मविषयक तत्त्वज्ञान नियंतावादी, ‘डेइस्ट’ असल्याचं लपून राहात नाही. मात्र प्रस्थापित धर्मसंस्था, धर्माधिष्ठित राजकारण आणि एकूणच धार्मिक रूढी परंपरांविषयी त्याच्यात कमालीचा कडवटपणा आहे. उदा.- मृत्युशय्येवर असताना पादरी त्याला भेटायला येतो आणि विचारतो, ‘आता तरी सैतानाचा त्याग करणार आहात का?’
‘किमान हा क्षण तरी परत एक शत्रू बनवण्याचा नाहीये!’ असं हजरजबाबीपणे व्होल्तेर उत्तरतो.