खास निवडणुकीसाठी तयार केलेल्या जाहिरातीची देशभर खिल्ली उडवली जात असल्यामुळे अस्वस्थ झालेले पक्षाचे माध्यमप्रमुख मुख्यालयातील कक्षात येरझारा घालत होते. त्या जाहिरातीशी संबंधित सारे येताच त्यांचा पारा पुन्हा भडकला. ‘सारे जग विश्वगुरूंना नमन करत असताना त्यांची टवाळी करणारे हे कोण?  झुक्याला सांगून त्यांचा बंदोबस्त करता येत नाही का?’ या सरबत्तीने सारे धास्तावले. मग त्यातल्या एकाने त्या जाहिरातीवरचे मिम्स वाचायला सुरुवात केली.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: भाऊ काणे

‘स्वयंपाकाचा गॅस फक्त दोन रुपयांनी स्वस्त झाला पापा. आता मी अवतार घेणार नाही असे विष्णूंनी जाहीर केले पापा. काल रविवार होता, आज विश्वगुरू सोमवार घेऊन आलेत पापा, रेड्डी बाहेर व केजरीवाल आत गेले पापा, आपल्या घरामागच्या नालीतून ११ किलो गॅस निघाला पापा. रेल्वेमंत्र्याचा चोरीला गेलेला हिरवा झेंडा सापडला पापा (हे ऐकताच सारे हसतात तसे माध्यमप्रमुख डोळे वटारतात) दिल्लीच्या स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी नापास झाले पापा, देशातील सर्व विद्यापीठात ‘एन्टायर पोलिटिकल सायन्स’चा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला पापा, प्रामाणिक करदात्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा व्हायला सुरुवात झाली पापा, ढगाळ वातावरणाला छेद देत शत्रूवर मारा करणारी यंत्रणा विकसित झाली पापा, मंत्र्यांना भूमिपूजन करण्याची परवानगी मिळाली पापा, डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशी पार झाला पापा, नोकरीची नियुक्तीपत्रे वाटून वाटून विश्वगुरू थकले हो पापा, पेट्रोल पाच तर डिझेल दहा पैशांनी स्वस्त झाले पापा, विश्वगुरूंच्या प्रयत्नामुळे गाझापट्टीत युद्धविरामाचा ठराव यूनोला घ्यावा लागला पापा.

हेही वाचा >>> संविधानभान: इंडिया हाच भारत!

आंबा चोखून व कापून अशा दोन्ही पद्धतीने खाण्याचे तंत्र त्यांनी शिकून घेतले पापा, खोटे बोलून बोलून मी दमले, आता थोडावेळ झोपते पापा, दोन हजाराच्या नोटेची खूप आठवण येत आहे पापा, त्यांनी सगळया खेळाडूंना मिठी न मारताच सोडून दिले पापा, पारदर्शी पक्षाला सर्वात जास्त रोखे कसे मिळाले पापा, रोखे प्रकरणात बँकेचीच चूक होती पापा,’ आता बस झाले, थांबवा हे असे प्रमुखाने सांगताच तो जाहिरातवाला वाचायचे थांबला. आणखी तीन पाने मजकूर शिल्लक आहे असे त्याच्या तोंडून बाहेर पडताच प्रमुखांनी रागाने त्याच्याकडे बघितले. ‘या देशात प्रतिभावानांचा भरणा फक्त आपल्याच परिवारात आहे एवढेच मला ठाऊक होते. हे इतके मिम्सधारी बाहेर कसे राहिले. या साऱ्यांना एकतर आपल्या वळचणीला आणा, अन्यथा ट्रोल करून सळो की पळो करू सोडा. प्रतिभा ही फक्त आपली मक्तेदारी आहे व राहील याची काळजी परिवारातील सर्वांनी घ्यायची अशा सूचना सर्व भक्तांना द्या. आता त्याच मॉडेलला घेऊन नवी जाहिरात अशी तयार करा की कुणाला मिम्स करताच यायला नको.’ प्रमुखांचे सांगणे संपताच तो यादी वाचणारा समोर येत त्याला भ्रमणध्वनीवर आलेला तिचा एक संदेश दाखवतो. ‘आता कितीही पैसे दिले तरी पक्षाच्या जाहिरातीत काम करणार नाही पापा.’