आंग फुर्बा शेर्पा या नावाऐवजी ‘कांचा शेर्पा’ म्हणूनच त्यांची ओळख कायम होत गेली ती १९५३ च्या मे महिन्यापासून. त्या महिन्यानेच त्यांना पुढे जागतिक कीर्ती दिली. गेल्या सुमारे दशकभरात तर ‘एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या मोहिमेचा अखेरचा जिवंत दुवा’ अशीही त्यांची ख्याती झाली. ‘एव्हरेस्टवीर’ तेन्झिंग नॉर्गे (निधन- १९८६) आणि एडमंड हिलरी (निधन- २००८) यांच्यासह त्या शिखराच्या मार्गावर बऱ्याच वरपर्यंत गेलेल्यांपैकी अनेक जणांना मृत्यूने गाठल्यानंतर अखेर त्या मोहिमेतले वयाने सर्वांत लहान- म्हणूनच ‘कांचा’ या टोपणनावाने ओळखले जाणारे – कांचा शेर्पाही गुरुवारी (१७ ऑक्टोबर) नेपाळमधील त्यांच्या नामचे बझार या गावी, वयाच्या ९२ व्या वर्षी निवर्तले. याच नामचे बझारमध्ये आंग फुर्बा शेर्पांचे बालपण गेले होते. तिथे थंडी इतकी की, लोकांना कपडे धुण्याची गरजच भासत नसे. याक राखणे हेच आंग फुर्बाचे काम; पण वयाच्या सतराव्या वर्षीपासून ते अस्वस्थ असत- किती काळ हेच काम करायचे. जवळच्या मोठ्या गावातले- खुम्बूमधले तेन्झिंग नॉर्गे आता भारतात राहून खूप पैसे कमावतात, असे वडील सांगतात; पण ‘तूही भारतात जा’ असे काही म्हणत नाही. पळूनच जावे का? बऱ्याच महिन्यांनंतर, दोघा मित्रांसह आंग फुर्बा यांनी ही ‘चलो भारत’ योजना यशस्वी केली. तीन दिवस चालत राहून चौथ्या दिवशी ते दार्जीलिंगला पोहोचले. तेन्झिंगकडे जाऊन मात्र वडिलांचे नाव सांगितले आणि काम मागितले. इथेच धुणीभांडी करावी लागतील, हे कळताच मित्र पांगले, पण आंग फुर्बा राहिले. आपल्याहून दुप्पट वयाच्या तेन्झिंगना त्यांनी गळच घातली, मला तुमच्याप्रमाणे शिखरांचे मार्ग शोधायचेत.
ती संधी १९५३ सालात आली, तेव्हा १९ वर्षांच्या ‘कांचा’वर तेन्झिंग यांचा विश्वास होता. बाकीचे शेर्पा काटक असूनही, सात हजार मीटरहूनही अधिक (सुमारे २३ हजार फूट) उंचीवर हातपाय गाळू लागले. पौगंडावस्थेतले कांचा मात्र उत्साही. त्यामुळे, आठ हजार मीटरहूनही अधिक उंचीवरचा अखेरचा तंबू-तळ उभारणाऱ्या शेर्पांचे नेतृत्व कांचा यांनी केले. पाठीवर किमान २५ किलोचे वजन घेऊन या तिघाचौघांनी, शिखरमाथ्यावर जाण्याआधीच्या अखेरच्या रात्री हिलरी आणि तेन्झिंग यांना राहता येईल, अशा सोयी करून, पुरेशी ऑक्सिजन-नळकांडी तिथे ठेवूनच कांचा आणि अन्य शेर्पा परतले. ही हकीकत कांचा शेर्पा नंतरही उत्साहाने सांगत आणि वर, ‘हे शिखर म्हणजे आम्हा तिबेटी शेर्पांची देवी. पण जगातले ते सर्वोच्च आहे, हे मात्र तेन्झिंगकडूनच मला कळले!’ असे सांगून मोकळे हसत.
पुढल्या सुमारे २० वर्षांत- १९७३ पर्यंत अनेक मोहिमा कांचा शेर्पांनी केल्या. त्यात एव्हरेस्टच्याही अनेक होत्या आणि शेर्पांच्या गटाचे नेतृत्वही ते करत, पण माथ्यावर जाणे हुकलेच. पत्नीच्या सांगण्यावरून वयाच्या चाळिशीत त्यांनी या मोहिमांवर जाणे बंद करून, नामचे बझार गावातच गिर्यारोहकांच्या सोयीसाठी लॉज सुरू केले. हे लॉज आज ‘निर्वाणा होम’ या नावाने त्यांचा मोठा मुलगा चालवतो. पण केवळ व्यवसायात धन्यता न मानता, शेर्पांचे संघटन करून त्यांच्या कल्याणासाठी ‘कांचा शेर्पा फाऊंडेशन’ ही स्थंस्थाही त्यांनी उभारली. सुख व समाधानच महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठे, असे अन्य शेर्पांप्रमाणे कांचाही मानत. पण ‘फाऊंडेशन’द्वारे त्यांनी दिलेले योगदान त्यांना समाधानाच्या सगरमाथ्यावर नेणारे ठरले.