ठाण्यातील प्रगती प्रतिष्ठानच्या अध्वर्यू आणि जव्हार, मोखाडा भागातील आदिवासींच्या आधारवड सुनंदाताई पटवर्धन आदिवासी विकासाच्या आघाडीवरील धडाडीच्या सेनानी होत्या. मूळच्या वाई येथील सुनंदाताई विवाहानंतर ठाण्यात आल्या. पती वसंतराव सामाजिक, राजकीय कार्यात होते. उपजत सामाजिक कार्याचा पिंड, त्याला भविष्यवेधी विकासाची जोड असल्याने सुनंदाताईंनी १९७२ मध्ये प्रगती प्रतिष्ठान संस्थेमार्फत ठाणे शहरातील दुर्बल, वंचित, झोपडपट्टी भागातील मुले, समाजाच्या विकासाचे काम सुरू केले. हे कार्य करत असताना त्यांना आदिवासी भागातील समाजाची, तेथील नवजात मुले, त्यांचे शिक्षण, आरोग्य, दारिद्रयाच्या भयावहतेची माहिती मिळाली. अस्वस्थ झालेल्या सुनंदाताईंना आपले काम ठाणे शहरापुरते मर्यादित ठेवून चालणार नाही याची जाणीव झाली. त्यांनी आपले बस्तान ५२ वर्षांपूर्वी ठाणे शहरातून हलवून जव्हार, मोखाडा तालुक्यांतील आदिवासी भागात बसविले.

अंधश्रद्धा, पारंपरिकपणामुळे आपली चौकट सोडून सुरुवातीला आदिवासी समाज सुनंदाताईंपासून अंतर राखून होता. सुनंदाताईंनी चिकाटीने आदिवासींना विश्वासात घेतले. त्यांना शिक्षण, नोकरी, व्यवसायाचे महत्त्व पटविले. दारिद्रयात राहणारा येथला समाज प्रगतीच्या वाटेवर कसा चालू शकतो. याची जाणीव करून दिली. त्यानंतर आदिवासी समाजाने बाईंना ताकदीने साथ दिली.

आदिवासी मुलांना त्यांच्या गरजा, भौगोलिक स्तराप्रमाणे प्रशिक्षण देणे, त्यामधून रोजगार मिळून देणे, पाडय़ांवर पाणी उपलब्ध करून देऊन जलसिंचन, सौर विजेच्या सुविधा उपलब्ध करून देऊन आदिवासी वाडे, पाडे अंधारातून मुक्त केले. मुलांना शाळेची सक्ती केली. कुटुंबीयांना स्वच्छता, आरोग्याचे धडे दिले. यापूर्वी पाण्यासाठी तीन किमीचा डोंगर चढ-उतार करून या मंडळींना पाणी भरावे लागत होते. घराच्या दारात पाणी आल्याने त्याचे सोने करून आदिवासींनी पाण्यावर भाजीपाला लागवड सुरू केली. लागवडीतून दरमहा २० ते २५ हजार रुपये हातात पडू लागले. कष्टाच्या कमाईतून स्वाभिमानाची जाणीव आदिवासींना झाली. सामान्य मुलांना तारतंत्री, मोबाइल दुरुस्ती, सुतार, गवंडी, टीव्ही दुरुस्तीची प्रशिक्षणे देऊन पायावर उभे करण्याचे सुनंदाताईंचे कामही पुढे गेले. ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमातून ‘प्रगती प्रतिष्ठान’ला २०१५ मध्ये ‘लोकसत्ता’च्या वाचकांनीही साथ दिली. सुनंदाताईंचे हे कार्य आहे त्याच जोमाने प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, आदिवासी समाजाने समर्पित भावाने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.