गणपती आगमनाच्या तयारीचे ढोल वाजू लागले आहेत. त्यांचा आवाज वाढत आहे. सपाट प्रदेशात आवाज घुमत जातो. मैलोनमैल कोणत्याही अडथळ्याशिवाय जिथे जमीन दिसत राहते तेथे मोठा आवाज करणारंच वाद्या असणार. त्यामुळे ढोल हे वाद्या उत्तरेतलं, हे कोणालाही कळेल. पण आता ढोल महाराष्ट्राचा होऊ लागला आहे. म्हणजे पंजाबी मंडळी भांगडा वगैरे करत असतील पण ढोल महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होत आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत गावागावांतील तबला दुरुस्त करणारे, पखवाज, मृदंग लावणारी मंडळी ढोल तयार करत नव्हती.
ताल धरण्यापुरता एखादा ढोल आणि ताशा असेल तरी लेझीम खेळत गणपती यायचा. पण आता ढोलाचे आकार बदलले आहेत. अगदी अगडबंब वाटावा असा ढोल वाजवणाऱ्या तरुणींची संख्या वाढते आहे. हे वाद्या आपल्या सांस्कृतिक जीवनात कमालीचं विस्तारत जात आहे. ढोल, तबला ही सगळी म्लेंच्छांची वाद्यां. ‘तब्ल’ या शब्दापासून तबला.. पण ढोल, मृदंग, पखवाज ही वाद्यां चालता चालता वाजवता येणारी.
आपलं मूळ वाद्या मात्र संबळ. गोंधळाला वापरलं जाणारं. देवीसमोरच्या या पूजाविधीतील गोंधळ या शब्दाचा उगम कसा झाला असेल? – खरं तर गोंधळ हा शब्द अनागोंदीदर्शक अर्थाने वापरला जातो. मग एका पूजाविधीला तो शब्द का दिला गेला असेल? पांडुरंगाची वारी आणि भवानी खेटा असं का असेल? काही देवतांच्या पूजांचं हेटाळणीयुक्त भाषेत वर्णन करण्याइतपत सांस्कृतिक ऱ्हास झाला असेल का? – वर्णव्यवस्थेत असा भाषिक वापर कोणी फारसा चुकीचा ठरवत नाही. परिणामी त्या परंपरा पुढे सरकत आल्या.
संबळाचा कडाडणारा आवाज हे महाराष्ट्राचं खरं वैशिष्ट्य. या वाद्याचीही एक आख्यायिका – चंड आणि मुंड या दोन राक्षसांनी अन्यायाचा कहर केला. सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं. तेव्हा देवीने त्यांचा संहार केला. त्यांची मुंडकी छाटली. त्यांचं शीर उलटं करून त्यावर चमडं लावलं आणि संबळ वाद्या तयार झालं. आख्यायिका हव्या तशा पेरल्या जात आणि जातात. पण राज्यात आजही संबळ वाजवणाऱ्यांची संख्या बरीच. हे पारंपरिक वाद्या अगदी शास्त्रोक्त तालात वाजवणारे गोंधळी आहेत. पण सहजपणे वाजवता येतं म्हणून असेल किंवा ढोल बडवला तरी तो वाद्यामेळ्याचा भाग असतो म्हणून असेल ढोल संख्यात्मक स्तरावर वाढतो आहे.
आता गावोगावी ढोल तयार करणारी मंडळी मुंबई आणि गुजरातहून बहुतांश साहित्य आणतात. एका लोखंडी सळईला गोलाकार चमडं किंवा आता ‘गरवारे प्लास्टिक’ बांधलं जातं. दोन्ही बाजूंनी एका पत्र्याला तो धरून ठेवण्यासाठी आता हुक निघाले आहेत. पूर्वी ते दोऱ्यांनी आवळले जायचे. हजारो तरुण सध्या रात्री उशिरापर्यंत ढोल वाजवण्याचा सराव करताहेत. ढोलास संस्कृतमध्ये ‘पटह’ असे म्हणतात. तसे हे प्राचीन वाद्या. कोलकाता येथे एका संग्रहालयात म्हणे २८७ प्रकारचे ढोल आहेत.
साधारण वीसएक प्रकारे ढोल वाजवला जातो. आता त्यात भरही पडत आहे. ताशा गुजरातहून येतो, असं विक्रेते सांगातात. वाजवण्यासाठीच्या प्लास्टिकच्या काड्यांचीदेखील स्वतंत्र बाजारपेठ आहे. आता शहरी भागांत सगळीकडे ढोल तयार करणाऱ्या व्यक्ती आहेत. वेगवेगळ्या आकारांचे ढोल. ग्रामीण भागात अजूनही एखादा ढोल आणि लेझीम एवढंच स्वागताचं साहित्य. पण मोठा दणदणाटी आवाज करणारं हे वाद्या एका बाजूला आणि त्याच वेळी जराशी किणकिण किंवा ‘कुडकुड’ आवाज करणारी वाद्यांही महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा भाग आहेत. याचं कारण उत्तरेचा शेवट आणि दक्षिणेची सुरुवात.
उत्तरेतल्या गाण्यावाजवण्यातील शृंगार दक्षिणेकडे हळूहळू कमी होत जातो किंवा त्याचा बाज बदलतो. अगदी गजरा माळण्याची पद्धतही बदलते. ठुमरीचं रूप आपल्याकडे लावणीत बघतातच की. मूळ परंपरा जपताना त्यात एक द्राविडी दर्शन अनेकदा बघायला मिळतं. पण महाराष्ट्र ही समन्वयाची भूमी. एक उदाहरण – नवरात्रीतील नवमी होमाच्या दिवशी गर्वाचं प्रतीक मानला जाणारा मेंढा कापला जातो. म्हणताना त्याला बकऱ्याचा बळीच म्हणतात. पण हा विधी योग्य व्हावा म्हणून ब्राह्मणांनी अनुष्ठान करावं, असं शास्त्र शक्तिपीठात पाळलं जातं.
द्रविडी आणि आर्य यांच्या या दोन जमातींचा संकर हा असा दिसतो. अशी अनेक रूपे. परिणाम असे होतात की, ढोल आणि ढोलकी हे दोन्ही एकत्र नांदतात. वाजत राहतात या भूमीत. इथे दिमडीही वाजते आणि संबळही. अर्थात वाजविणाऱ्यांमध्ये वर्णव्यवस्था कायम आहे आजही. मल्हारी म्हाळसाकांतांची भक्त मंडळी ढोलही वाजवतात आणि उपासक असणाऱ्या वाघ्या दिमडीही वाजवतो.
भारतीय मनातील संगीत हे देवाचं रूप. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असंही मानलं जातं. त्यामुळे अनेक देवी – देवतांच्या हाती वाद्यां आली आहेत. सरस्वतीच्या हाती वीणा आहे. शंकराचा डमरू आहे. श्रीकृष्णाची बासरी आहे. आपल्या देवतांचं हे सांगीतिक रूप नेहमीच मनाला भावणारं आहे. त्यामुळे वाद्या वाजवून ईश्वरापर्यंत पोहोचता येतं ही धारणा खूप जुनी.
जिथे देवनागरी संपते आणि पुढे दक्षिणेत लिप्यांतर घडतं तिथे भाषेचा लहेजा बदलतो. शब्दांचे वापर आणि त्यांचा संकरही वाढत जातो. सोलापुरी भाषेवर तमिळ आणि कानडी भाषेचा प्रभाव लगेच जाणवतो. अनेक शब्द सहज स्वीकारले जातात. ‘हुच्च’ हा तसा कानडी शब्द. वेडसर किंवा वेडा या अर्थाने वापरायचा. मराठीत तो वापरला जातोच. ‘घंघाळे’ या शब्दाला सीमावर्ती भागात ‘वत्तल’ म्हटलं जातं.
‘पोळ्या’ऐवजी ‘कारहुनवी’ असा सणच साजरा होतो. चिनकोल नावाचा राधा – कृष्णाचा एक खेळ या भागात आहे. येळ अमावस्या नावाचा एक सण धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात होतो. त्याला आता वेळ अमावस्या असे म्हटले जात असले तरी ती वेळ म्हणजे येळू. म्हणजे सातवी अआवस्या. या दिवशी लोक शेतात जेवायला जातात. ताकाला ज्वारीचे पीठ लावून केलेला आंबिल नावाचा पदार्थ या जेवणात असतो. हे सारं आजही जपलं जातं तेव्हा आपली भूमी ही संकराची आहे. त्यामुळे अगदी वाद्या मेळापासून ते खाद्यासंस्कृतीपर्यंत सर्वत्रच हा मेळा दिसून येतो.
आंध्र आणि कर्नाटकातील मंडळी देवीचे दर्शन घ्यायला येतात म्हणून पुरणपोळीतील कटाच्या आमटीमध्ये थोडासा गूळ आणि आंबटपणा आणला जातो. आमरा म्हणतात त्याला. हा खास दक्षिणी पदार्थ. पण सीमाभागात केला जातो. अशा दक्षिणी प्रभाव असणाऱ्या भागात आता ढोल परंपरेची भर पडू लागली आहे. असे का होते? कारण कोणतीही गोष्ट मराठी माणूस सहज स्वीकारतो.
वेरुळमधील लेणींची बांधणी द्राविडी शैलीतील. पण १७९१ मध्ये बांधलेल्या घृष्णेश्वर मंदिराचा कलश मात्र दोन शिल्पशैलींचा मिलाफ. सर्वसाधारणपणे उत्तरेतील मंदिरांचे कळस निमुळते होत जातात. त्यांच्या कळसाला एक प्रकारची गाठ दिसते. मंदिरावर अनेक प्रकारची शिल्पंही आहेत. यात नागर आणि नंतर विकसित झालेल्या शैलीचा मिलाफ दिसतो. वेरुळ लेणींचे अभ्यासक योगेश कुलकर्णींच्या मते दक्षिणेतील मंदिरांचे कळस तसे वरच्या बाजूला निमुळते नसतात. वर टोकाला आडव्या आकाराचे. यामध्ये मंदिरांच्या भिंतीवर शिल्प, हे वैशिष्ट्य. तुलनेने उत्तरेतल्या मंदिरात तसं शिल्पकाम कमीच. काही अपवाद आहेत.
पण वेरुळच्या मंदिराच्या शैलीत दक्षिण आणि उत्तरेचा मिलाफ दिसतो. त्यामुळे भाषेपासून ते शिल्पकलेपर्यंत असे प्रभाव दिसतात. अगदी उपासकही विभागले गेले आहेत. उत्तरेत शिवभक्ती आणि दक्षिणेत शक्तीची उपासना. ही शक्ती म्हणजे मातृदेवी. तेर, भोकरदनसारख्या गावातही लज्जागौरीच्या मूर्ती सापडल्या आहेत. सर्जनाची ही पूजा. आपण कसे जन्मतो, कुठून येतो या उत्सुकतेतून मातृदेवतांचे भक्त आणि उपासकांची संख्या अधिक, हे दक्षिण भारताचं वैशिष्ट्य. त्यामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील यात्रेकरू महाराष्ट्रात येतात.
श्रीशैल्यमचा इतिहास सांगताना हे मंदिर संस्थान म्हणजे स्त्री राज्य होते, असं संशोधक रा. चिं. ढेरे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे. तुळजाभवानी, रेणुकामाता, बनशंकरी अशी अनेक ठाणी दक्षिणेत तर शिवभक्तीचा सारा भाग उत्तरेचा. साडेतीन शक्तिपीठं आणि त्याच वेळी ज्योतिर्लिंग यांची एकाच वेळा उपासना करणारं महाराष्ट्राचं भक्तीरूप मन म्हणजे दक्षिणोत्तरी मिलाफ. चर्मवाद्याच्या परंपरेतलं त्याचं प्रतिबिंब अधिक ठसठशीत.
यात सर्वांत महत्त्वाचं वाद्या- पखवाज. प्रत्येक गावात हे वाद्या असतंच. आणि सोबतीला टाळ. भजनी मंडळीचा पांडुरंग म्हणजे महासमन्वयक. विठ्ठलाची भक्ती जिथे तिथे पखवाज असतोच असतो. भागवत धर्माची पताका उंचावणाऱ्या वारकऱ्याला देवीची भक्तीही करायची असते आणि श्रावणी सोमवारचा उपवासही करायचा असतो. कारण ही भूमीच समन्वयाची आहे. पण अर्थहीन सांस्कृतिक वातावरणात फक्त ढोल बडवणे हीच ओळख ठरेल अशी शक्यता आता बळावते आहे. ज्या भागात देवनागरी संपते आणि नवी लिपी सुरू होते, (एकीकडे गुजरात आणि दुसरीकडे कर्नाटक) अशा लिप्यांतराच्या भूभागात समन्वय असणे हाच ‘भारत जोडो’चा खरा मंत्र आहे. हे समजून घेऊन त्याचे ढोल वाजवायला हवेत. अन्यथा नुसतेच ढोल बडवणे हाती राहील. suhas.sardeshmukh @expressindia.com