कोणतीही कालगणना घ्या, त्यातल्या महिन्यांना नावं असतात आणि अनेकदा ती अर्थपूर्णही असतात. पण महिन्यातल्या तारखांना मात्र फक्त क्रमांक असतात. पाहा ना, आज १८ ऑक्टोबर. त्यातला १८ हा क्रमांक आहे. किंवा आज हिजरी कालगणनेनुसार २४ रबी-अल-थानी. त्यातला २४ हादेखील क्रमांकच आहे.

शालिवाहन शकातदेखील तिथींना क्रमांकच आहेत! ‘द्वितीया’, ‘तृतीया’, ‘चतुर्थी’ म्हणजे दुसरी, तिसरी, चौथी असंच की. अगदी बरोबर. पण तीन तिथी यात वेगळेपणाने उठून दिसतात – ‘प्रतिपदा’, ‘पौर्णिमा’ आणि ‘अमावास्या’. यांची नावं म्हणजे काही नुसते क्रमांक नव्हेत. पण काही अर्थ आहे का त्यांना, की अशीच आपली सुचली नावं असा प्रकार आहे? शालिवाहन शकाची नियमबद्धता पाहिली आहे आपण. बाकी सगळ्या गोष्टी इतक्या विचारपूर्वक करणारे पंचांगकर्ते तिथींची नावं अशी मन:पूत देतील हे संभवत नाही. आणि तशी ती नाहीच आहेत. ‘प्रतिपदा’, ‘पौर्णिमा’ आणि ‘अमावास्या’ हे अत्यंत अर्थपूर्ण शब्द आहेत.

सुरुवात ‘अमावास्या’ या शब्दापासून करू. काय होतं या दिवशी? चंद्र आकाशात दिसत नाही. का? कारण त्यादिवशी त्याचा प्रकाशमान भाग पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असतो. पण एवढं एकच कारण नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्या दिवशी चंद्र सूर्याबरोबर उगवतो आणि सूर्याबरोबर मावळतो. थोडक्यात, या दिवशी चंद्र सूर्याबरोबर असतो, सूर्यासोबत असतो, सूर्याजवळ असतो. ‘अमावास्या’ या शब्दात नेमकं हेच सांगितलं आहे. ‘अमा’ म्हणजे जवळ, निकट आणि ‘वास’ म्हणजे राहणे. थोडक्यात, ‘अमावास्या’ म्हणजे चंद्र आणि सूर्य एकमेकांच्या जवळ राहतात अशी अवस्था. एक महत्त्वाची खगोलीय घटना अवघ्या एका शब्दात पकडली आहे पंचांगकर्त्यांनी!

हेही वाचा

आता ‘पौर्णिमा’ म्हणजे काय ते पाहू. हे तर उघडच आहे. ‘पूर्ण’ पासून पौर्णिमा. चंद्राच्या पूर्णत्वाची स्थिती म्हणजे पौर्णिमा! परत एकदा, एक महत्त्वाची खगोलीय घटना अवघ्या एका शब्दात पकडली आहे पंचांगकर्त्यांनी!

पौर्णिमेच्या दिवशी पूर्णत्वाला पोहोचत असला तरी त्या दिवशी चंद्र सूर्यापासून सर्वात दूर असतो. त्याच्या पुढच्या दिवशी सूर्याच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल पडतं. ‘प्रतिपदा’ या शब्दात नेमका हाच आशय सामावला आहे. ‘प्रति’ म्हणजे कोणाकडे तरी आणि ‘पद’ म्हणजे अर्थातच पाऊल. कोणाकडे तरी टाकलेलं (पहिलं) पाऊल अशी स्थिती म्हणजे ‘प्रतिपदा’. म्हणून पक्षातली पहिली तिथी असली तरी तिला प्रथमा न म्हणता प्रतिपदा म्हणतात ते याचकरता. पुन्हा एकदा, एक महत्त्वाची खगोलीय घटना अवघ्या एका शब्दात पकडली आहे पंचांगकर्त्यांनी!

तिथींच्या नावांचादेखील इतक्या बारकाईने विचार करणाऱ्या पंचांगकर्त्यांनी महिन्यांची नावंही अशीच विचारपूर्वक ठेवली आहेत. आणि तीदेखील खगोलीय घटनांवर अवलंबून आहेत. कशी ते पाहू.

शालिवाहन शकाचे महिने ठरतात चंद्रभ्रमणावरून. त्यामुळे महिन्यांची नावंही चंद्रभ्रमणावरून ठरावीत हे तर्काला धरून झालं. आणि हे ‘काळाचे गणित’ अगदी सोपं आणि सुटसुटीत आहे. एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र कोणत्या नक्षत्रात (किंवा त्या नक्षत्राच्या जवळच्या नक्षत्रात) आहे यावरून त्या महिन्याचं नाव ठरतं. उदाहरणार्थ ४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३६ वाजता पौर्णिमा सुरू होईल तेव्हा चंद्र कृत्तिका नक्षत्रात असेल आणि ४ डिसेंबर रोजी सकाळी ०८:३७ वाजता पौर्णिमा सुरू होईल तेव्हा तो मृगशीर्ष नक्षत्रात असेल आणि म्हणून त्या महिन्यांची नावं अनुक्रमे कार्तिक आणि मार्गशीर्ष अशी! कृत्तिकेचा तो कार्तिक आणि मृगशीर्षाचा तो मार्गशीर्ष! सोबतचा तक्ता पाहा म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल.

महिन्याचं नाव / पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं नक्षत्र

चैत्र – चित्रा

वैशाख – विशाखा

ज्येष्ठ – ज्येष्ठा

आषाढ – पूर्वाषाढा/ उत्तराषाढा

श्रावण – श्रवण

भाद्रपद – पूर्वाभाद्रपदा/ उत्तराभाद्रपदा

आश्विन – अश्विनी

कार्तिक – कृत्तिका

मार्गशीर्ष – मृगशीर्ष

पौष – पुष्य

माघ – मघा

फाल्गुन – पूर्वा/ उत्तरा

फाल्गुन महिन्याशी संबंधित नक्षत्र आणि त्या महिन्याचं नाव यांचा काही संबंध नाही असं वाटू शकतं. पण तसं नाही आहे. वास्तविक त्या नक्षत्रांची नावं पूर्वाफाल्गुनी आणि उत्तराफाल्गुनी अशीच आहेत. पण ती संक्षेपाने वापरण्याचा प्रघात आहे.

विल्यम शेक्सपिअरला ‘नावात काय आहे’ असा प्रश्न पडला होता खरा. पण नुसत्या तिथींच्या आणि महिन्यांच्या नावांमागचा एवढा सूक्ष्म विचार पाहिला की नावात बरंच काही आहे हे पटतं.