‘नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल’ या वक्तव्याला राज्यभर प्रसिद्धी मिळाल्याने दादा खुशीत होते. दिवसभराचे कार्यक्रम आटोपून परतल्यावर पलंगावर पडल्या पडल्या त्यांना गाढ झोप लागली. रात्री दोनच्या सुमारास फोन वाजू लागला. एवढ्या रात्री कोण असे म्हणत त्यांनी अनिच्छेनेच तो घेतला तर पलीकडे ‘व्हाईट हाऊस’ मधील राष्ट्राध्यक्षांचा सहाय्यक. ‘ट्रम्प बोलणार आहेत’ असे त्याने सांगताच दादा हडबडलेच. ‘पाच मिनिटांनी करा’ असे सांगून ते धावतच खाली आले व सोफ्यावर झोपलेल्या इंग्रजी येणाऱ्या सहाय्यकाला घेऊन पुन्हा वर गेले.

मग दुभाषाच्या माध्यमातून दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. ‘तुम्ही माझी मदत घेण्याची इच्छा व्यक्त केली असे माझ्या माध्यम सल्लागाराने आताच सांगितले. बोला काय प्रॉब्लेम आहे?’ हे ऐकताच ऊर भरून आलेले दादा भडाभडा बोलू लागले. ‘आमच्याकडे जिल्ह्याचा मुख्य म्हणजे पालकमंत्रीपदाची सिस्टिम आहे. तीन पक्षाचे एकत्रित सरकार असूनही भाजपवाले हे पद आम्हाला द्यायला तयार नाहीत. त्यामुळे वाद निर्माण झाला असून तो सुटला नाही तर अंतर्गत युद्ध भडकू शकते’ युद्ध हा शब्द ऐकताच गडगडाटी हसून ट्रम्प म्हणाले, ‘मला जगातली सात युद्धे थांबवण्याचा अनुभव आहे. ती विविध देशांतील असली तरी देशाच्या व त्यातल्या त्यात सत्तापक्षांच्या अंतर्गत युद्धातही हस्तक्षेप करायला मला आवडेल. तसेही भारतावर माझे पूर्ण लक्ष आहे. जगात कुठेही शांतता निर्माण करून नोबेल मिळवणे हेच माझे लक्ष्य आहे. तेव्हा तुम्ही आता काळजी करू नका. मी लगेच माय डिअर फ्रेंड मोदीजींना फोन करतो. सांगून ऐकले नाही तर थेट ‘एक्स’वर दीडशे टक्के टेरीफची पोष्ट करतो. सध्या भारतच काय सर्वच देश मला घाबरायला लागलेत. तुमचा प्रश्न २४ तासांत सुटेल’ फोन बंद होताच दादांच्या आनंदाला भरतेच आले. त्यांनी सहाय्यकाला सांगून फोन व्हाइट हाऊसमधूनच आला होता याची खात्री करून घेतली.

सकाळी आठ वाजता दादांनी माध्यमांना बोलावून या घडामोडींची माहिती देताच महायुती तसेच देशाच्या सत्ता वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. ट्रम्प काहीही करू शकतात याची कल्पना साऱ्यांना असल्याने आता काय करावे तेच कुणाला कळेना! तिकडे दादा माध्यमांच्या केंद्रस्थानी होते. त्यांनी मुद्दाम त्यांच्या या वक्तव्यावर टीका करणाऱ्या किशोरी पेडणेकरांच्या घराकडे दौरा काढला. विजयी मुद्रेने त्यांनी किशोरीताईंच्या घराकडे बघितले तर त्यांचा नोकर दारेखिडक्या बंद करत होता. दादांना कधी एकदाचे चोवीस तास होतात याची घाई झाली होती. ते वारंवार शिंदेंच्या कार्यालयात फोन करून काही तोडगा निघाला का अशी विचारणा करत होते. दिल्लीहून काहीतरी निरोप येईल व पालकत्वाचे दान नक्की पदरात पडेल या आशेवर त्यांनी दिवसभराचे कामकाज संपवले. रात्री घरी गेल्यावर केव्हा एकदाचा दीड वाजतो याची ते वाट बघत जागेच होते. बरोबर दोन वाजता ट्रम्प यांचा दीडशे टक्के टेरीफचा संदेश दृष्टीस पडला. म्हणजे भाजपने त्यांचेही ऐकले नाही तर! यामुळे हताश झालेले दादा झोपण्याच्या तयारीत असताना फोन वाजला. पलीकडे शिंदे होते. ‘देशातल्या अंतर्गत घडामोडींची माहिती ट्रम्प यांना दिल्यामुळे भाजप नेतृत्व कमालीचे संतापले असून तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा रासुका खाली अटक करून जोधपूरच्या तुरुंगात पाठवले जाईल’ हे ऐकताच दादांना दरदरून घाम फुटला.