डॉ. जयदेव पंचवाघ

रक्त थंड, मेंदूचं कार्य आणि हृदयही बंद.. अशा अवस्थेतसुद्धा पाम रेनॉल्ड्स यांची ‘जाणीव’ शाबूत कशी काय राहिली?

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या परमहंस योगानंद यांच्या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी त्यांचे गुरू श्री युक्तेश्वर गिरी यांच्या सान्निध्यात साधना करताना आलेला एक अनुभव अत्यंत तपशिलानं नमूद करून ठेवला आहे. ध्यानाच्या विशिष्ट खोलवरच्या अवस्थेत त्यांना श्वास आपोआप बाहेर रोखला गेल्याचा अनुभव आला. त्याच वेळेला त्यांना असं जाणवलं की शरीर सोडून ते बाहेर पडलेले आहेत तिथून सभोवतालचा सर्व परिसर अतिशय स्पष्टपणे ते बघू शकत आहेत. हा दृष्टिक्षेप नेहमीप्रमाणे फक्त पुढच्या भागातला नसून सर्व दिशांमध्ये घडणाऱ्या घटना त्यांना दिसत होत्या. त्यांच्या आश्रमाच्या भिंतीच्या पलीकडे जाणारी गाय त्यांना मध्ये भिंत नसल्यासारखी सुस्पष्ट दिसत होती. इथपासून हा दृष्टिक्षेप विविध तारे आणि ग्रहांमधून फिरत विविध आकाशगंगांच्या पुढपर्यंत पसरत गेला आणि त्या ठिकाणी अतिशय तेजस्वी असा प्रकाश सर्व दिशांमध्ये भरून राहिला आहे असं अगदी स्पष्टपणे दिसलं. या अनुभवाच्या पुढच्या भागांत, आसपासच्या व्यक्ती व प्राण्यांच्या विविध आकृती प्रकाशामध्ये मिसळून जाताना त्यांना दिसल्या.. ‘पाण्यामध्ये चमच्यानं ढवळल्यावर साखर जशी पाण्यात विरघळून एकरूप होऊन जाते तसं सर्व आकृतिबंध थोडे आंदोलित होऊन त्या प्रकाशात विरघळले’ असं वर्णन त्यांनी केलं आहे.

या अनुभवाबद्दल शास्त्रीयदृष्टय़ा तर्कवितर्क होऊ शकत असले तरी त्यांना त्यांच्या आश्रमाच्या परिसरात घडत असलेल्या गोष्टी जशाच्या तशा दिसल्या हे नंतरच्या पडताळणीवरून लक्षात आलं होतं. ‘संवेदनांची अनुभूती येण्यासाठी शरीराची गरज असते का’ असा प्रश्न हजारो वर्ष शास्त्रज्ञांनी उपस्थित केलेला आहे. चैतन्य किंवा कॉन्शसनेस असायला शरीर गरजेचं आहे का? मेंदू हा अवयव आणि शरीरातील इतर गात्रांवर अवलंबून न राहता ‘आत्मतत्त्व’ पाहण्या/ ऐकण्याची प्रचीती घेऊ शकतं का? हा त्या प्रश्नाचा दुसरा अर्थ.

या पार्श्वभूमीवर १९९१ सालची अमेरिकेत घडलेली आणि संपूर्ण वैद्यकशास्त्राला बुचकळय़ात टाकणारी एक घटना सर्वाना विचारात पाडेल हे निश्चित. मुख्य म्हणजे ही घटना ज्या व्यक्तीच्या बाबतीत घडली ती व्यक्ती त्या वेळी अत्यंत सखोल वैद्यकीय निरीक्षणाखाली होती. या घटनेनंतर अनेक आस्तिक आणि नास्तिक डॉक्टरांनी तिचा खोलवर अभ्याससुद्धा केलेला आहे.

ही घटना १९९१ ची. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातल्या अटलांटा शहरात राहणाऱ्या पाम रेनॉल्ड्स या महिलेची. १९९१ मध्ये वयाच्या ३५ व्यावर्षी तिला अचानक डोकेदुखी, चक्कर येणं, बोलण्यामध्ये अडखळणं असा त्रास होऊ लागला. तिच्या डोक्याच्या सी टी स्कॅनमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीला मोठय़ा आकाराचा फुगा असल्याचं लक्षात आलं. याला न्यूरोसर्जरीच्या भाषेत ‘अन्यूरिझम’ असं नाव आहे. मेंदूमधल्या रक्तवाहिन्यांना असे फुगे आले तर ते अचानक फुटून त्यातून रक्तस्राव होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा कधी कधी या फुग्याचा आकार वाढत गेल्यामुळे मेंदूतील महत्त्वाच्या भागांवर दाब येऊन प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे पाम रेनॉल्ड्सला असलेल्या मेंदूतील या फुग्यावर शक्य तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं होतं. पण त्या फुग्याचा आकार आणि त्याचं स्थानच असं होतं की नेहमीच्या पद्धतीनं उपाय करणं अशक्यच.

त्या काळातल्या या क्षेत्रातल्या अत्यंत नावाजलेल्या न्यूरोसर्जनकडे पाम रेनॉल्ड्सची केस पाठवली गेली. या न्यूरोसर्जनचं नाव रॉबर्ट स्पेट्झलर. मागच्याच लेखात मी त्याचा उल्लेख केलेला होता. डॉक्टर स्पेट्झलरच्या लक्षात आलं की या अन्यूरिझमवर यशस्वी उपचार करायचा तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे.. नाहीतर पाम रेनॉल्ड्सचा जीव वाचण्याची कोणतीही शक्यता नाही.

डॉक्टर स्पेट्झलरने ठरवलेली योजना अशी होती की, शस्त्रक्रियेसाठी भूल देऊन शस्त्रक्रियेच्या प्राथमिक पायऱ्या पार पाडल्यानंतर थंडगार सलाइन देऊन आणि रक्त थंड करून रेनॉल्ड्सच्या शरीराचं तापमान अगदी कमी करायचं. त्यानंतर तिच्या हृदयाचं कार्य बंद करायचं. मेंदूतलं रक्ताभिसरण पूर्णपणे बंद करायचं आणि अशा स्थितीत – म्हणजेच बिलकूल रक्ताभिसरण नसलेल्या स्थितीत- फुगा असलेली मेंदूतील रक्तवाहिनी उघडून अन्यूरिझम ठीक करायचा!  म्हणजे या काळापुरतं पाम रेनॉल्ड्सच्या मेंदूतल्या पेशींचं कार्य पूर्णत: थांबणार होतं. हृदय बंद राहणार होतं. थोडक्यात, तेवढय़ा काळापुरती ती व्यक्ती मृत होणार होती. ही टोकाची योजना बनवण्याचं कारण म्हणजे तिच्या मेंदूचा रक्तपुरवठा पूर्णत: थांबवल्याशिवाय हा अन्यूरिझम काढून रक्तवाहिनी ‘रिपेअर’ करणं शक्य नव्हतं.

मेंदूच्या पेशींना तीन ते पाच मिनिटं रक्तपुरवठा आणि पर्यायाने ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर त्या पेशी कायमच्या नाश पावू लागतात. पण शरीराचं तापमान अतिशय कमी केलं तर मेंदूतील पेशींचं तापमानसुद्धा ओघानंच कमी होतं आणि अशा स्थितीत या पेशींचा कार्य पूर्णपणे थांबूनसुद्धा त्यांची ऑक्सिजनची गरज तात्पुरती नाहीशी झाल्यामुळे त्या कायमच्या मरत नाहीत. या पद्धतीला ‘हायपोथरमिक कार्डियाक अरेस्ट’ असं नाव आहे. अर्थातच या पद्धतीत भरपूर धोके असतात आणि पाम रेनॉल्ड्सशी याची चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला.

या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या शरीराचं तापमान (जे नेहमी ९७-९८ अंश फॅरनहाइट असतं) ते जवळजवळ ६० अंशापर्यंत खाली आणण्यात आलं होतं. तिच्या कानामध्ये वारंवार आवाज (क्लिक्स) करणारं यंत्र बसवण्यात आलं होतं. मेंदूतल्या पेशींच कार्य पूर्णपणे थांबलं आहे याची खात्री करण्यासाठी याचा उपयोग होतो. याला ‘ऑडिटरी इव्होक्ड पोटेंशियल्स’ म्हणतात.

प्रत्येक मिनिटाला मेंदूतील लहरींचा अभ्यास केला जात होता. त्याचप्रमाणे इतर सर्व अवयवांचं मॉनिटिरगही केलं जात होतं. चार ते पाच तासांच्या या शस्त्रक्रियेमध्ये रॉबर्ट स्पेट्झलर आणि त्याच्या टीमला ही शस्त्रक्रिया करण्यात यश आलं. पाम रेनॉल्ड्सची तब्येत झपाटय़ानं सुधारली! ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया होती.. पण या नाटय़ाचा उत्तरार्ध अधिक महत्त्वाचा आहे.

 शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमध्ये असताना पामला शस्त्रक्रियेदरम्यान घडलेल्या घटना अत्यंत सुस्पष्टपणे आठवू लागल्या. म्हणजे ती अत्यंत खोल भूल दिलेल्या स्थितीत असताना आणि वैद्यकीयदृष्टया ‘मृत’ असताना घडलेल्या घटना नेहमीच्या स्मृतीपेक्षाही अधिक सुस्पष्टतेने तिला आठवू लागल्या. आपण इथे लक्षात ठेवायला हवं की शस्त्रक्रियेदरम्यान पामचे डोळे पट्टी लावून बंद होते आणि दोन्ही कानांत आवाज करणारी यंत्रं चालू होती. त्या यंत्रांच्यावरून दोन्ही कानांवर पट्टी लावून तेही बंद होते.

शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांमध्ये झालेलं संभाषण तिनं जसंच्या तसं सांगितलं. तिच्या पायावरल्या रक्तवाहिन्यांचा आकार लहान असल्यामुळे एकाऐवजी दोन्ही पायांतील रक्तवाहिन्यांमध्ये नळय़ा घालून शरीरातलं रक्त काढून घ्यावं लागेल असं एका स्त्रीच्या आवाजातलं बोलणं तिला आठवत होतं. शस्त्रक्रिया चालू असताना टेबलच्या वरून एखाद्या व्यक्तीने बघितल्यावर जे दृश्य दिसेल तसं वर्णन तिनं केलं. शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं कशा प्रकारे मांडून ठेवलेली होती याचाही तपशील तिला जसाच्या तसा आठवत होता. डॉक्टर स्पेट्झलर यांनी कशा प्रकारच्या उपकरणानं कवटी उघडली, हे तिला आठवत होतं. ‘‘यानंतर थोडय़ा वेळाने एक विशिष्ट नाद किंवा ध्वनी ऐकू आला. त्यानं मी माझ्या डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर खेचले गेले. यात कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता तर एक प्रकारचा आनंद होता. दृष्टी आणि श्रवण या संवेदना इतक्या सुस्पष्ट होत गेल्या की मी याआधी असा अनुभव कधीच घेतला नव्हता. दृष्टीचा आवाका वाढून तो ३६० अंश झाला होता. एका आनंददायक प्रकाशाच्या दिशेने मी खेचले गेले..’’ त्यानंतर तिला तिची स्वर्गवासी आजी व इतर व्यक्ती भेटल्याचं वर्णन आहे. शस्रक्रिया संपताना त्वचेचे टाके घेताना डॉ. स्पेट्झलर यांच्या सहकाऱ्यांनी लावलेलं गाणं ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ हे होतं,  हेसुद्धा तिनं नमूद केलं.

ही घटना प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये आणि न्यूरोसर्जन्ससमोर घडली. त्यामुळे त्याची अनेक वेळा वेगवेगळय़ा डॉक्टरांकडून पडताळणी झाली. त्याच्यात उलटसुलट तर्क-वितर्क झाले. ‘बीबीसी’नं या घटनेवर एक डॉक्युमेंटरीसुद्धा केली. डॉक्टर स्पेट्झलर यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी, ‘‘यावरून मी कुठलाही निष्कर्ष काढू शकत नाही पण तिने ज्या गोष्टी बघितलेल्या आणि ऐकलेल्या सांगितल्या त्या तिच्या स्थितीत तिनं बघणं किंवा ऐकणं अशक्य होतं’’ असं ‘शास्त्रीय’ मंडळींसाठी ‘पॉलिटिकली करेक्ट’ विधान केलं.

या घटनेइतकी अशा प्रकारची शास्त्रज्ञांसमोर घडलेली आणि अभ्यासली गेलेली दुसरी घटना माझ्या ऐकण्यात नाही. मेंदू आणि हृदयाची ‘फ्लॅट लाइन’ असताना आलेले हे अनुभव आहेत.  या सगळय़ा घटनेचा अन्वयार्थ काय घ्यायचा, ही ज्यानं-त्यानं ठरवण्याची गोष्ट आहे.

लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com