दिल्लीवाला

राजकारणी कितीही मुरलेला असो, त्यांच्या समोर बाकं रिकामी असतील तर बोलून काय फायदा? नाटय़गृह भरलेलं असेल तर कसलेल्या नाटय़ अभिनेत्याच्या अभिनयाचं चीज होतं. पण, नाटय़गृहात ऐकायला-बघायला कोणी नसेल, फक्त विंगेतल्या सहकलाकारांसाठी अभिनय करायचा असेल तर ते म्हणतील नवीन काय? तालमीमध्ये तर तुमची प्रॅक्टिस बघितली आहे, अभिनयाचा कस लोकांपुढे लागेल. मोदींच्या भाषणाचं नेमकं असंच झालं. मोदी त्यांच्या भाषणाची कसून तयारी करतात. या वेळी अविश्वास ठरावाच्या चर्चेत बोलायला तर मोदींनी गठ्ठेच्या गठ्ठे सोबत आणले होते. त्या कागदपत्रांचं ओझंच कित्येक किलो असेल. गठ्ठे उचलणाऱ्या कर्मचाऱ्याचे हात दुखले असतील. ‘मोदी.. मोदी’..या घोषणांमध्ये त्यांचं सभागृहात आगमन झालं. मोदी बोलणार म्हणजे अडीच-तीन तासांचं जबरदस्त नाटय़ पाहायला मिळणार, हे भाजपच्या सदस्यांनी गृहीत धरलेलं होतं. सभागृह अख्खं भरलं होतं. ज्यांना शालजोडीतील मारता येतील असे राहुल गांधी, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी, सौगतदादा असे सगळेच दिग्गज कलाकार प्रेक्षागृहात बसले होते. मोदींच्या भाषणाची सुरुवातही तडाखेबंद झाली. आवाजातील चढउतार, संवादफेक, हालचाली, चेहऱ्यावरील हास्य हे पाहून विरोधी बाकांवरील सदस्यही प्रतिसाद देऊ लागले. अधीर रंजन नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये बोलू लागले. प्रयोग चढत गेला, दीड तास कधी-कसा उलटून गेला कोणाला कळलंही नाही. मग, विरोधी बाकांवरून चुळबुळ सुरू झाली. ‘मणिपूरवर या, मणिपूरवर या’ असे आवाज येऊ लागले. नाटय़ अभिनेता जसा लाइट अंगावर घेऊन भारदस्त स्वगत बोलतो तसे मोदींनी कॅमेरे अंगावर घेतलेले होते. स्वगत सुरू असताना अचानक कोलाहल सुरू झाला, प्रेक्षागृहातून एक-एक उठून निघून जाऊ लागला. तेवढय़ात भाषणातून ‘मणिपूर’ असा आवाज ऐकू आला. ‘मणिपूर..’ शब्द प्रेक्षकांच्या कानावर पडला. पण, उशीर झाला होता. प्रेक्षक मागे वळले नाहीत. मग, अभिनेत्याला रिकाम्या प्रेक्षागृहात मणिपूरवर बोलावं लागलं. आवाज निस्तेज होत गेला. स्वगतातील गंमतही निघून गेली. विंगेत स्वपक्षीय जांभया देऊ लागले. इतकं सगळं घडत असताना, राजकारण म्हणजे एक रंगमंच असल्याची खात्री पटलेला एकच प्रेक्षक विरोधी बाकांवर अखेपर्यंत बसून होता तो म्हणजे सुनील तटकरे!

‘मंगलकार्या’चा माहोल

एखाद्या लग्नकार्यामध्ये जशी लगबग असते तसं वातावरण लोकसभेत होतं. भाजपसाठी तो दिवस जणू मंगलकार्याचा होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येणार हा भाजपच्या खासदारांसाठी भाग्याचा दिवस. या दिवसातील क्षण न् क्षण टिपण्याची ओढ त्यांच्या मनात दाटून आलेली होती. सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होतं. चारची वेळ जवळ आली तसं सभागृह भरू लागलं. सभागृहाच्या चारही बाजूंनी असलेल्या दारातून सदस्य आत येत होते. मोदी चार वाजता भाषणाला सुरुवात करतील हा संदेश त्यांना पोहोचवण्यात आला होता. तीनच्या सुमारास ज्योतिरादित्य शिंदे बोलायला लागले, त्यांचं भाषण संपतच नव्हतं. तरी सदस्यांनी नेटानं ते ऐकलं. त्यांनी काँग्रेसवर इतका हल्लाबोल केला की, तेवढा मोदींनीही त्यांच्या भाषणात केला नसेल. काँग्रेसच्या सदस्यांनी थोडा वेळ ज्योतिरादित्यांची बडबड ऐकून घेतली. विरोधी बाकांवरून आवाज आला, अरे पलटीमार काय बडबडतोस!.. ज्योतिरादित्य चापर्यंतचा वेळ भरून काढत असावेत म्हणून कदाचित भाषणात पाणी घालत आहेत, असं वाटून गेलं. वातावरणात ज्वर चढत असताना मराठी खासदार कुठं बसायचं यावरून एकमेकांशी कुस्ती लढत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्याशेजारी अकाली दलाचे प्रमुख व खासदार सुखबीरसिंह बादल बसले होते. ते पंजाबी असल्यानं त्यांचा भारदस्तपणा बघून राणेंनी अंग आकसून घेतलं होतं. सुखबीर उठून निघून गेल्यावर राणेंनी त्यांची जागा घेतली. दुसऱ्या रांगेत सुखबीर यांच्या पत्नी व खासदार हरसिमरत कौर बादल बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी दोन खासदार होते, त्यापैकी एक राहुल शेवाळे होते. सगळे आपापल्या जागेवर आसनस्थ झाले असतानाच गजानन कीर्तिकर आले, त्यांना दुसऱ्या रांगेतच बसायचे होते. तिथं तिघेच बसू शकत होते. शेवाळेंना उठावं लागलं. शेवाळे राणेंना विनंती करत होते की, हरसिमरत कौर यांना पहिल्या रांगेत बसू द्या, तुम्ही दुसऱ्या रांगेत आमच्यासोबत बसा, आपण सगळेच दाटीवाटीनं बसू. राणेंना पहिली रांग सोडायची नव्हती. तिथून ते थेट मोदींच्या नजरेत येत होते. ही संधी त्यांना गमवायची नव्हती. शेवाळे आणि राणेंची हातवारे करून जुगलबंदी झाली, त्यात अर्थातच शेवाळेंना माघार घ्यावी लागली! तोपर्यंत सदस्यांपर्यंत बातमी आली की, मोदी पाच वाजता बोलतील. हे ऐकताच सगळं सभागृह फैलावलं. हळूहळू एक-एक सदस्य बाहेर जाऊ लागला. छोटय़ा मध्यंतरानंतर हे सगळे पुन्हा स्थानापन्न झाले. आता प्रतीक्षा होती मोदींची. कल्पना करा, सभागृह म्हणजे मुंबई लोकल आहे. तुम्ही विरार लोकलच्या खचाखच भरलेल्या डब्यात आहात. तुम्हाला काहीही करून चौथी सीट मिळवायचीच आहे. तुम्ही काय कराल?.. सभागृहातलं चित्रही असंच होतं. सत्ताधारी बाकांवर पहिल्या रांगेत बसण्याचा मान अगदी मोजक्यांनाच असतो. सभागृहनेते मोदी, उपनेते राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते-वाहतूकमंत्री नितीन गडकरी, त्यापलीकडे स्मृती इराणी. कोपर मारण्याचा प्रकार दुसऱ्या रांगेतून सुरू होतो. मोदी बोलणार असल्यामुळं त्यांच्या मागच्या रांगेत बसण्यासाठी इतके जण आतुर होते की ते सगळे लोकल प्रवास करताहेत असं वाटावं..

कटप्पाने का मारलं?

संजय बंडी हे भाजपचे तेलंगणातील खासदार. प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर त्यांना कार्य- समितीमध्ये सामावून घेतलं गेलं आहे. पण, या लोकसभेत संजय बंडींप्रमाणे बहुतांश खासदारांचा जीव आपापल्या राज्यात अडकलेला आहे. कारण विधानसभेच्या निकालांवर खासदारांचंही भवितव्य ठरणार आहे. कोणत्या खासदाराने किती विधानसभा मतदारसंघात जोर लावला ते तपासलं जाणार आहे. त्यामुळं लोकसभेत जोरदार भाषणातून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं किंवा, आपल्या राज्यातील प्रतिस्पर्ध्याला बोलू न देण्यासाठी कौशल्य पणाला लावायचं या दोनच गोष्टी लोकसभेत सदस्यांना कराव्या लागतात. हे केलं तरच मोदी-शहांच्या नजरेत भराल, हे गणित डोक्यात असतं. मोदींच्या भाषणाआधी तासभर काढायचा होता. काही सदस्यांची भाषणं सुरू होती. ती रटाळ होत होती. तेवढय़ात बंडींना बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्या तेलुगु भाषणात इतका आवेश होता की, गॉसिपमध्ये गुंग झालेलं अवघं सभागृह अचानक शांत झालं आणि बंडी काय बोलताहेत हे कळत नसूनदेखील उत्तर भारतातील भाजपचे सदस्य कान देऊन ऐकू लागले. असं वाटत होतं की, ‘बाहुबली’ सिनेमा थेट थ्रीडीमध्ये सुरू आहे. बंडींचे संवाद काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीविरोधातील होते. पण एक क्षण असं वाटलं की, बंडी उलगडून सांगताहेत, बाहुबलीला कटप्पाने नाही, तर याच काँग्रेस, बीआरने मारलं!.. बंडींचं अवाक्षर कळलं नाही, पण त्यांचा मुद्राभिनय पाहून सदस्यांच्या माना होकारार्थी हलत होत्या. तेवढय़ात बीआरएसचे सदस्य तेलुगुमध्ये बंडींशी वाद घालू लागले. आम्ही बाहुबलीला मारलं नाही, असं ते कदाचित म्हणत असावेत! मग छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेशच्या खासदारांना हत्तीचं बळ आलं. भाजपचे राजवर्धन राठोड त्यांच्या राज्यातील सरकारविरोधात तावातावाने बोलत होते. लोकसभेत विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम रंगली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निरोपाचं भाषण..:

राज्यसभेत तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव यांच्यासह काही खासदार निवृत्त झाले. अखेरच्या दिवशी हे सदस्य निरोपाचं भाषण करतात. सुष्मिता देव १६ व्या लोकसभेत सदस्य होत्या. १७ व्या मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांचं राहुल गांधींशी पटलं नाही, मग सुष्मिता देव यांनी ममता बॅनर्जीचं बोट पकडलं. आता त्या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आसाम वा त्रिपुरामधून निवडणूक लढवू शकतील. म्हणूनच त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेची उमेदवारी दिली नाही असं म्हणतात. निरोपाचं भाषण राजकीय नसतं, सुष्मिता यांचंही नव्हतं. पण, त्यांच्या भाषणातून काळ किती बदलला याची चुणूक दिसली. लोकसभेत असताना सुष्मिता देव यांना आर्थिक वा तंत्रज्ञानविषयक विषयावर बोलायचं होतं. बहुधा ‘जीएसटी’वर सभागृहात काँग्रेसच्या वतीने मुद्दे मांडायचे होते. त्या काळात अरुण जेटली केंद्रीय अर्थमंत्री होते. विषय अवघड होता, सुष्मिता देव यांचा त्या विषयाशी संबंधही नव्हता. पण, खरगेंनी सांगितल्यामुळे पक्षासाठी बोलावंच लागणार होतं. सुष्मितांनी दिग्विजय सिंह यांच्याशी चर्चा केली, अन्य एक-दोन जाणकारांशी चर्चा केली. तरी, विषयाचा आवाका येईना. मग, सुष्मिता थेट जेटलींकडे गेल्या. जेटलींनीच त्यांना सभागृहात काय बोलायचं हे समजावून सांगितलं! सुष्मिता देव म्हणाल्या, हीच तर लोकशाही असते. सत्ताधारी-विरोधक कधीही शत्रू नसतात.. सुष्मिता यापेक्षा जास्त बोलल्या नाहीत, पण आत्ताच्या वातावरणावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं असं म्हणता येईल.