काही कवितांना लोकगीत होण्याची महत्ता प्राप्त होते. कवीने लिहिलेले शब्द लोकांच्या ओठावर रुळतात. हे शब्द कोणाचे आहेत हेही अनेकांना माहीत नसतं पण हे शब्द झिरपत जातात. कवीची नाममुद्रा पुसट होत जाते पण गाणी समाजाच्या मालकीची होत राहतात. आजही वर्गसंघर्षाच्या लढ्यात ‘हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है’ अशी घोषणा दिली जाते. यातल्या ‘संघर्ष’ शब्दाच्या ठिकाणी ‘हडताल’ असा मूळ शब्द आहे. संघर्षासाठी मुठी आवळणाऱ्या प्रत्येकाच्या जिभेवर गीतकार शैलेंद्र यांची ही ओळ येतेच. भारतीय मानस पुरेपूर उमगलेल्या या कवीने जशी संघर्षाची कविता लिहिली तशीच प्रेमाचीही.
भारताला स्वातंत्र्य मिळालं. पाठोपाठ फाळणी. त्यानंतरचा हिंसाचार. या पार्श्वभूमीवर पंचविशीत असलेल्या शंकरदास केसरीलाल अर्थात शैलेंद्र यांनी ‘जलता है पंजाब हमारा प्यारा, जलता है, जलता है भगतसिंह की आंखो का तारा’ अशी कविता लिहिली होती. ती ऐकून राजकपूर प्रभावित झाले होते. तेव्हा त्यांनी ‘आग’ सिनेमासाठी शैलेंद्र यांना गाणी लिहिण्याचं निमंत्रण दिलं. ‘‘मी पैशांसाठी लिहीत नाही. तुमच्या सिनेमासाठी मला गाणी लिहिण्याची प्रेरणा मिळावी असं आहे काय त्यात ? मी का लिहू?’’ असं उत्तर शैलेंद्र यांनी दिलं. व्यवहार ही गोष्ट भावनाप्रधान व्यक्तीला क्रूर वाटू शकते. तसे अनुभवही येत असतात. पुढे असा एखादा क्षण येतो की निग्रह ढळतात आणि विचित्र अर्थाने वर्तुळ पूर्ण होत असतं. निवाडा करण्यासाठी काळ संधीच देत नाही.
शैलेंद्र यांचा जन्म अविभाजित भारतातल्या रावळपिंडी इथला. वडिलांचे मूळ बिहारचे. कामधंद्याच्या शोधात गेलेल्या वडिलांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षे नोकरी केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वडिलांनी नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या मोठ्या भावाकडे मथुरा इथं मुक्काम हलवला. शैलेंद्र यांचं तिसरीपासून ते दहावीपर्यंतचं शिक्षण मथुरा इथल्या सरकारी शाळेत झालं. दहावीला वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी प्रवेशही घेतला. पण आर्थिक अडचणीमुळे शिक्षणावर पाणी सोडावं लागलं. रेल्वेत नोकरी लागली. काही दिवस झांसी आणि काही दिवस मुंबई असं राहावं लागायचं. पुन्हा मुंबईतच बस्तान मांडलं. लग्न झालं होतं. बायकोला घेऊन यायचं तर राहण्यासाठी काही ठावठिकाणा नव्हता.
सोचा था ढुंढुंगा कही मकान,
नही, बस एक कोठरी,
एक कोठरीही काफी है!
दोनो सुख से साथ रहेंगे
जैसे किसी घोंसले मे कपोत की जोडी
असं मुंबईत राहण्याचं त्यांचं स्वप्न त्यांच्याच एका कवितेत शब्दबद्ध झालं आहे. बायकोसह मुंबईत बिऱ्हाड हलवल्यानंतर काही काळ गेला. तुटपुंज्या पगारातली रेल्वेतली नोकरी फक्त दोन वेळची भूक भागवत होती. बायको गरोदर राहिली. बाळंतपणासाठी परत माहेरी झांशीला पाठवायचं होतं पण जवळ काहीच नाही. राज कपूरला आधी जे ऐकवलं होतं, ‘‘मी कवितेचा धंदा करत नाही.’’ ते सगळं मनात तसंच दाबून टाकलं. पावलं पुन्हा राज कपूरकडे वळली. हे वर्ष १९४९. कुठलाही आडपडदा न ठेवता शैलेंद्र यांनी राज कपूरकडे ५०० रुपये मागितले. त्या वेळी बरसात सिनेमाची जुळवाजुळव चाललेली होती. शैलेंद्र यांनी या सिनेमासाठी दोन गाणी लिहिली. ‘बरसात में हमसे मिले तुम’ आणि ‘पतली कमर’ ही ती गाणी नंतर कमालीची लोकप्रिय झाली. त्यानंतर राज कपूर यांच्यासोबत शैलेंद्र यांचा प्रवास सुरू झाला. रेल्वेतली नोकरी सोडली. पुढे चित्रपट गीतकार म्हणून जो प्रवास सुरू झाला तो थक्क करणारा होता. राज कपूर यांच्या कलावंत म्हणून लोकप्रिय होण्यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा किती मोठा होता हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल. १९५५ ते ६० या काळात शैलेंद्र यांनी जागते रहो, चोरी चोरी, बूट पॉलिश, मुसाफिर, मधुमती, उजाला, जिस देश मे गंगा बहती है अशा असंख्य सिनेमांतल्या गाण्यांच्या माध्यमातून अर्थपूर्ण अशी गाणी दिली.
लोकलयीचे संस्कार पचवून आलेली शब्दकळा आणि जीवनासंबंधीचा आशय मोजक्या ओळींमधून सांगण्याचे अचाट सामर्थ्य या गोष्टींनी शैलेंद्र यांना लाखोंच्या अंत:करणात प्रवेश मिळाला. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार / किसी का दर्द मिल सके तो ले उधार/ किसी के वास्ते तेरे दिल में प्यार/ जिना इसी का नाम है… इतक्या साध्या ओळींमधून सांगितलेला जीवनाचा अर्थ अन्य कोणत्याही गीतात आढळणार नाही. या गीतकाराची सगळी गाणी अशीच साधी तरीही अर्थपूर्ण आहेत.
चित्रपट गीतांसाठी लेखनाचा धडाका सुरू होण्यापूर्वी १९५५ साली शैलेंद्र यांचा ‘न्योता और चुनौती’ हा कवितासंग्रह आलेला होता. आधीच्या सात-आठ वर्षांत लिहिलेल्या कविता त्यात संकलित होत्या. बहुतांश कविता कष्टकऱ्यांच्या जीवनातले हुंकार शब्दबद्ध करणाऱ्या. त्या संदर्भातल्या चळवळीला आणि आंदोलनांना बळ पुरवणाऱ्या. मजुरांच्या आयुष्यातली वेदना तर या कवितांमध्ये होतीच पण त्यांना संघर्षासाठी सिद्ध करायला लावणारा आवेग होता. लढ्याची प्रेरणा होती.
गर्दिशों से हारकर ओ बैठने वाले
तुझको खबर क्या अपने पैरों में भी हैं छाले
पर नहीं रुकते कि मंज़लि ने पुकारा है
आज अपना हो ना हो पर कल हमारा है
ये ़कदम ऐसे जो सागर पाट देते हैं
ये वो धाराएँ हैं जो पर्वत काट देते हैं
स्वर्ग उन हाथों ने धरती पर उतारा है
आज अपना हो ना हो पर कल हमारा है
असा आशावाद असणाऱ्या या कविता होत्या. गीत लेखनाच्या माध्यमातून शैलेंद्र यांनी वेगळं वळण घेतलं जे त्यांना खऱ्या अर्थाने लोककवी म्हणून देश-विदेशात लोकप्रिय होण्यास कारण ठरलं. पडद्यावर शैलेंद्र यांची गाणी वाजत-गाजत राहिली. त्याचबरोबर ती अनेक पिढ्यांच्या जिभेवर रेंगाळत राहिली. आजही या गाण्यांची जादू तीच आहे. समाजमनाची हेरलेली नेमकी नस, थेट काळजाला भिडणारे साधे, सोपे शब्द, यामुळे त्यांची गाणी जनमानसात रुजली. ‘सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है/न हाथी है न घोड़ा है वहां पैदल ही जाना है’ हे गीत ओठांवर येण्यासाठी अक्षरांची ओळख असायलाच हवी असे नाही. लिहिता वाचता न येणाऱ्या असंख्य लोकांच्या मनावर अशा गाण्यांनी अधिराज्य मिळवले. ‘सजनवा बैरी हो गए हमार’ यासारखे गाण्यातले शब्द पुस्तकी वाटत नाहीत. ‘चिठिया हो तो हर कोई बांचे, हाल न बांचे कोय’ यासारखी ओळ अंतर्मनाला स्पर्श करते. म्हणूनच त्यांची अनेक गाणी ही लोकगीतांसारखी लोकस्मृतीत कायम राहिली. काही गाणी प्रार्थना म्हणून म्हटली जातात. काही गाणी भजन वाटू लागतात. काही प्रचंड लोकप्रिय असलेली बालगीतं आहेत. लोकमानस जाणल्यामुळे आणि लोकांच्या अंतरंगात प्रवेश करण्याची सहजशैली असल्याने जे मोल या गाण्यांना आहे ते अपवादाने अन्य गाण्यांना लाभल्याचे पाहायला मिळते. दिव्यावर कुणाची तरी मालकी असू शकते पण ‘आसमान का तारा’ तसाही कुणाच्या मालकीचा असू शकत नाही. पण तो सर्वांना आपला वाटतो, असंच काहीसं शैलेंद्र यांच्या गाण्यांच्या बाबतीत आहे.
‘बरसात’मधल्या गाण्यांपासून लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेल्या शैलेंद्र यांना फणीश्वरनाथ रेणू यांच्या ‘मारे गये गुल्फाम’ या कथेने आकर्षित केलं. या कथेवर सिनेमाची निर्मिती करण्याच्या जिद्दीने ते झपाटले. सिनेमासाठी सर्वस्व पणाला लावलं. सिनेमा रखडला. डोक्यावर कर्जाच्या ओझ्याचा असंही ताण, सिनेमाला सुरुवातीला यश लाभलं नाही अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम शैलेंद्र यांच्या आयुष्यावर झाला. अकाली म्हणजे अगदी वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण हा सिनेमा ही त्यांच्या आयुष्यातली अतीव परिश्रमातून झालेली निर्मिती होती. त्या काळी या कथेचे मानधन म्हणून रेणू यांना शैलेंद्र यांनी दहा हजार रुपये दिले होते. या सिनेमातल्या गाण्यांनी इतिहास रचला. चित्रपटही पुढे कमालीचा लोकप्रिय झाला पण हे यश पाहायला शैलेंद्र मागे राहिले नव्हते. (‘पडद्यावरची कविता’ या लेखात याच ठिकाणी कथेचा पडद्यापर्यंतचा प्रवास यावर लिहिले आहे.) शैलेंद्र यांच्या जाण्याची बातमी जेव्हा रेणू यांना आकाशवाणीवरून कळली तेव्हा ते धक्क्यातून सावरले नाहीत. शैलेंद्र यांच्या अकाली जाण्याला जणू आपणच जबाबदार आहोत असं त्यांना वाटू लागलं. कथेवर सिनेमा निर्माण करण्यासंबंधी विचारणा करणाऱ्या पत्राला जर उत्तरच दिलं नसतं तर या सिनेमाची निर्मिती आणि बाकीच्या गोष्टी यातलं काहीही घडलं नसतं असं रेणू यांना वाटत होतं. अपराधाची ही बोचणी त्यांच्या मनात कायम राहिली.