रजत कांत रे हे इतिहासतज्ज्ञ असले, तरी त्यांची पहिली आणि ठळक ओळख विद्यार्थीप्रिय प्राध्यापक हीच होती. विद्यादानाची प्रदीर्घ परंपरा लाभलेले कोलकाता येथील प्रेसिडन्सी महाविद्यालय ही त्यांची कर्मभूमी. रे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
भारतीय प्रशासकीय सेवेत (त्या काळी ‘आयसीएस’ म्हणून संबोधली जाणारी) अधिकारी असलेल्या कुमुद कांत रे यांचा हा मुलगा. कुमुद रे साठच्या दशकात पश्चिम बंगालचे गृहसचिव होते. शांतिनिकेतनच्या ‘पाठ भवना’च्या पहिल्या चार विद्यार्थ्यांपैकी एक असलेले कामाक्ष रे हे रजत यांचे आजोबा. रजत यांचे शालेय शिक्षण कलकत्त्यातील (आताचे कोलकाता) ‘बल्लीगुंगे गव्हर्नमेंट हायस्कूल’मध्ये झाले. प्रेसिडन्सी महाविद्यालयात त्यांनी इतिहास या विषयात बीए (ऑनर्स) केले. प्राध्यापक अशिन दासगुप्तांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. केम्ब्रिज विद्यापीठात अनिल सील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी प्राप्त केली.
परदेशातून परतल्यावर त्यांनी कलकत्त्यातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये अध्यापन सुरू केले. पुढे ते प्रेसिडन्सी महाविद्यालायात रीडर म्हणून रुजू झाले. १९७५ ते २००६ या तीन दशकांच्या कालावधीत त्यांनी प्राध्यापक आणि नंतर इतिहास विषयाच्या विभागप्रमुखपदाची धुरा सांभाळली. या माहविद्यालयात सर्वाधिक काळ सेवा दिलेल्या प्राध्यापकांत त्यांचा समावेश होतो. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक उत्तमोत्तम इतिहासकार घडवले. २००६ ते २०११ या काळात ते विश्व भारतीचे कुलगुरूही होते.
रजत रे आधुनिक भारतीय इतिहासाचे अभ्यासक होते. वसाहतकालीन बंगालच्या इतिहासाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. आधुनिक भारत, बंगाल, राष्ट्रवाद, औद्याोगिकीकरणापूर्वी काळ आणि औद्याोगिक क्रांती इत्यादी विषयांवर त्यांनी बंगाली आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली ‘इंडिया : ग्रोथ अँड कॉन्फ्लिक्ट इन द प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टर’, ‘माइंड, बॉडी अँड सोसायटी : लाइफ अँड मेंटॅलिटी इन कलोनियल बंगाल’, ‘एक्स्प्लोरिंग इमोशनल हिस्ट्री जेंडर, मेंटॅलिटी अँड लिटरेचर इन द इंडियन अवेकनिंग’ इत्यादी पुस्तके आजच्या काळातील इतिहास अभ्यासकांसाठी आणि इतिहासात स्वारस्य असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली.
इतिहासाला आकार देण्यात जेवढा मानवी विद्वत्तेचा वाटा आहे, तेवढाच मानवी भावभावनांचाही आहे, असे मत मांडून ते स्पष्ट करणारे लेखन त्यांनी आपल्या पुस्तकांतून आणि लेखांतून केले. त्यांचे ‘एक एक निमालु’ हे चरित्र साहित्यवर्तुळात चर्चेचा विषय ठरले. या चरित्राला १९९५ साली नरसिंह दास स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वृत्तपत्रांतून विपुल लेखन करून त्यांनी इतिहासाविषयी वाचकांची उत्सुकता जागृत केली.
रजत कांत रे यांच्या विद्यार्थीप्रियतेची महती एवढी की त्या काळचे गव्हर्नर गोपाळकृष्ण गांधी यांनी एकदा प्रेसिडन्सी महाविद्यालयात जाऊन त्यांच्या वर्गात हजेरी लावली होती. इतिहासाविषयी रोज नवे वाद निर्माण होत असलेल्या आजच्या काळात रे यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या रूपाने भावी पिढीच्या इतिहास अभ्यासकांचा समृद्ध वारसा मागे ठेवला आहे.