राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुकुंज आश्रमात १९५२ मध्ये स्वावलंबन सप्ताहात प्रचारकांना बौद्धिक देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘सेवाकार्य  देखावा म्हणून करू नये. सरकारी अधिकारी किंवा पुढारी येऊन मनापासून कार्याची प्रशंसा करतात. इतक्या अल्पावधीत सत्तेशिवायच सेवकांनी नावारूपास आणलेले काम पाहून सेवेचे सामर्थ्य किती असू शकते हे त्यांना थक्क करते. परंतु यामुळे आपण हुरळून जाणे योग्य नाही. इतरांना दाखविण्यासाठी जे लोक काम करतात, ते यशस्वी होत नाहीत. कार्याच्या तळमळीचे समाधान व्हावे म्हणून जे कार्य करतात, ईश्वराची सेवा करत असल्याची भावना बाळगून कार्य करतात, तेच सुखी व विजयी होत असतात.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : रामराज्यनिर्मितीचा रामबाण उपाय

‘‘आत्मसमाधान, आत्मप्रसाद हेच आपल्या सेवेचे ध्येय असले पाहिजे. आत्मप्रेमाने प्रेरित होऊनच अखिल विश्वाची सेवा केली पाहिजे. ईश्वराजवळ उजळ तोंडाने स्वत:चे कर्तव्य पार पाडल्याची ग्वाही आपणास शेवटी देता येईल, यासाठीच आपणासही सर्व कार्य केले पाहिजे.’’ स्वावलंबी सेवक व्हा, असे सांगून महाराज म्हणतात, ‘‘समाजपुरुषाची सेवा करावयाची तर, सर्वस्वी लोकांवर अवलंबून राहणे बरोबर होणार नाही. ‘जना घालावे साकडे। हेचि अभाग्य रोकडे’ हे वचन ध्यानात ठेवून, ‘भिक्षापात्र अवलंबणे’ आपण सोडून दिले पाहिजे. केवळ मंचावरून व्याख्याने देणाऱ्यांचा प्रभाव आता लोकांवर पडू शकत नाही. लोक मोठे दक्ष झाले आहेत. त्यांना त्यांच्याचबरोबर काम करू शकणारा, स्वत:च्या पायावर उभा राहून इतरांनाही मदत करू शकणारा हवा आहे. तुम्हाला परिश्रम करण्यात उत्साह वाटेल, स्वत:चे पोट भरण्यासाठी- कपडेलत्ते घेण्यासाठी तुम्ही स्वत:च कष्ट करू शकाल, तर समाजावर तुमच्या आदर्श स्वावलंबी जीवनाचा परिणाम हजारो व्याख्यानांहूनही अधिक होईल! लोक आता नुसते तत्त्वज्ञानाला महत्त्व देत नाहीत; त्यांच्या अडीअडचणी दूर करणाऱ्या गोष्टी जे कोणी त्यांना सांगतील तेच त्यांचे जिव्हाळय़ाचे मित्र होतात. त्यांच्या शेतीच्या सुधारणेसाठी, पिकावरील रोग नाहीसे करण्यासाठी, जनावरांचे व मनुष्यांचे आजार दूर करण्यासाठी आणि त्यांच्या गावांची सुधारणा करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवून प्रचारकांनी लोकांना दिले पाहिजे. दवाखाने किंवा कारखाने काढणे हा आपला उद्देश नव्हे. लोकांना स्वावलंबी करणे व त्यांत समूहभावना निर्माण करून त्याद्वारे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींचे निवारण करणे, हाच आपल्या कार्याचा प्रमुख उद्देश आहे.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात.

आदर्श प्रचारक मिळणे कठीण।

मिळाले तरी टिकणे कठीण।

आमुच्यासाठी दुजा मार्ग कोण?

ग्रामोन्नतीचा।

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj explained importance of social work zws
First published on: 12-10-2023 at 05:15 IST