scorecardresearch

चिंतनधारा: उपासना आळशी नसते!

उपासनेशिवाय जगात कोणीच उन्नती करू शकत नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ठाम मत आहे. महाराज म्हणतात : ‘‘उपास्य आणि उपासनेची रीत या गोष्टी भिन्न असतील तथापि उपासनेची आवश्यकता मात्र सर्वाना आहे.

tukdoji maharaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

उपासनेशिवाय जगात कोणीच उन्नती करू शकत नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ठाम मत आहे. महाराज म्हणतात : ‘‘उपास्य आणि उपासनेची रीत या गोष्टी भिन्न असतील तथापि उपासनेची आवश्यकता मात्र सर्वाना आहे. एखादा गरीब मनुष्य कीर्तिशिखरावर चढतो तो तरी विशिष्ट उपासनेमुळेच ना? याचा सरळ अर्थ हा की, आकुंचित स्थिती किंवा लहान गोष्ट विकसित करण्याचा जो मार्ग त्यालाच आपण ‘उन्नतिपथ’ म्हणतो व जुने लोक ‘उपासना’ म्हणतात. त्यात सूक्ष्म फरक एवढाच की, उन्नती याचा अर्थ हल्ली भौतिक सुधारणा, नैतिक व्यवहार किंवा मानव्याचा विकास असा केला जातो आणि संतजन तो वेगळा करीत, इहलौकिक सुखाबरोबर परमार्थमार्ग साधून आत्मशक्तीस ओळखणे यासच ते उन्नती मानीत व ती शक्ती ज्या मार्गाने, ज्यांच्या संगतीने, ज्या आचरणाने व व्यवहाराने प्राप्त करून घेता येईल त्यास ऋषिमहर्षि ‘धर्ममार्ग’ किंवा ‘उपासना’ म्हणत असे मला विश्वासपूर्वक वाटते. याखेरीज उपासना म्हणजे जर व्यवहारशून्य होऊन वेडय़ासारखे गलिच्छ व आळशी बनणे असेल तर त्या उपासना मार्गाचा मी खास नाही. वास्तविक उपासना असे भलतेच शिकवीत नाही असे मी निश्चयाने सांगतो. लोभी लोकांनी उगीच त्याचा विपर्यास करून तत्त्वाची राखरांगोळी केलेली आहे असे मला बहुजन समाजाची उपासनापद्धती पाहून खेदाने म्हणावे लागते.

आपल्या सर्व कृतीत जर मनुष्याचा सद्हेतू ओतप्रोत असेल तर फुले वाहणे, चंदन लावणे, घंटा वाजविणे, मूर्तिपूजा करणे, सद्ग्रंथ वाचणे, साधुसंतांचा बोध घेणे व त्या मार्गाने चालणे इत्यादी सर्व गोष्टीसुद्धा उपासनेतच येऊ शकतात. कारण तोसुद्धा मनाच्या चंचलतेला नष्ट करण्याचा व वृत्तीला रंगवून श्रद्धाशक्ती वाढवण्याचा एक चिमुकला मार्गच आहे. थोर मनुष्याविषयीचा आदर किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक असाच मार्ग असतो हे आपणास ठाऊक आहेच. कोणी श्रेष्ठ पुरुष घरी आल्यास उठून उभे राहणे, त्यांना ‘यावे’ म्हणणे, त्यांना बसवणे, त्यांच्याशी नम्रतेने बोलून थोडे फराळास देणे, इत्यादी. एकूण ते जेणेकरून प्रसन्न राहतील असेच आपण त्यांच्याशी वागत नाही का?

समजा, कोणी यातून असेच तत्त्व(?) काढले की, ‘काय हो! माणसाने माणसाचा आदर काय म्हणून करावयाचा? ही मनुष्य व आपणही मनुष्यच!’ परंतु असे जर आपण वागू लागलो (सन्मानदर्शक उत्थापन, अभिवादनादी सर्व रीतिरिवाजास अजिबात फाटा दिला) तर व्यवहारात योग्य ठरेल काय? व आपले आपल्यास तरी आवडेल काय? मला नाही वाटत तुम्ही असे कबूल कराल म्हणून! याप्रमाणेच विचार केल्यास, जगच्चालक अदृश्य शक्तीच्या स्मरणार्थ मूर्तीचा आदर-सत्कार करण्याचे जे नियम थोर महात्म्यांनी ठरवले आहेत त्यांनी मानसिक शांती प्राप्त होऊन आत्मोन्नती जर होत असेल तर त्यास कोणी हरकत तरी का घ्यावी? लोक उगीचच मोठी महत्त्वाकांक्षा धरून काहीच कर्तव्य न करता केवळ पूजा करतात व ‘देवच सर्व करील’ असे म्हणत बसतात ते मला मुळीच आवडत नाही,’’ असे महाराज म्हणतात.

राजेश बोबडे
rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 00:34 IST