‘पाक’ इन्साफ…’ हा अग्रलेख (१२ फेब्रुवारी) वाचला. पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेम्ब्ली’च्या निवडणुकीत इम्रान खान यांना मतदारांनी जवळ केले म्हणजे इम्रान खान यांची कारकीर्द चांगली होती असे नाही, पण इम्रान खान यांना ज्या प्रकारे वागविण्यात आले ते तेथील मतदारांना आवडलेले दिसत नाही. आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, महागाईने सर्वच उच्चांक पार केले आहेत, जीवनावश्यक वस्तूंची, इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तेथील जनता आसुसली होती, मात्र काळजीवाहू शरीफ-भुत्तो सरकारने लोकांना निराशच केले. सरकार हे जाणून होते, म्हणूनच इम्रान यांच्या पक्षाची मान्यता रद्द केली गेली आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, पण सरकार लोकांचा रोष काही कमी करू शकले नाही. याचा अर्थ पक्षचिन्ह, पक्षाची राजकीय मान्यता रद्द केली तरीही जनतेचा रोष काही शमविता येत नाही.

अनिरुद्ध गणेश बर्वे, कल्याण

दिशाभूल यशस्वी होत नाही, हाच धडा

‘पाक’ इन्साफ…’ हा अग्रलेख वाचला. पाकिस्तानमध्ये लष्करशहांना नको असलेल्या इम्रान खान यांना तुरुंगात डांबले गेले. त्यांचा पक्ष आणि पक्षाचे चिन्हही रद्द केले गेले. तरीही त्यांच्या पक्षाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सर्वाधिक जागा मिळवल्या. याचा अर्थ त्यांच्याकडे पक्षचिन्ह असते, तर ते नक्कीच बहुमत मिळवू शकले असते. भारतातही सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांची शकले करून, विरोधात उभ्या ठाकलेल्या नेत्यांना तुरुंगात टाकत आहे, पक्ष आणि पक्षांची चिन्हे त्यांना साहाय्य करणाऱ्या फुटीर गटांना बहाल करत आहे. असे कितीही प्रयत्न केले गेले, तरीही मतदार सुज्ञ असतात. जनतेची दिशाभूल यशस्वी होत नाही. हुकूमशाही राजकीय मानसिकतेविरुद्धचे जनमत मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. पाकिस्तानमधील निवडणूक निकालांतून हाच धडा घ्यायला हवा.

– किशोर बाजीराव थोरात

हेही वाचा >>> लोकमानस : सत्तेचा राजदंड कुणावरही चालवणार?

या गर्दीत सर्वांना संधी मिळेल?

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसचेही नेते भाजपच्या गळाला लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. तरीही या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद नाही. त्यांच्या नेत्याला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आहे. त्याविषयीची खंत भाजपच्या नेत्यांनी बोलूनही दाखविली आहे. आता तीन मुख्य पक्षांचे नेते एकतर भाजपमध्ये आले आहेत किंवा भाजपच्या मित्रपक्षांमध्ये समाविष्ट झाले आहेत. एवढ्या गर्दीत जेव्हा तिकीटवाटप होईल तेव्हा एकाच जागेसाठी दोन दावेदार असण्याची परिस्थिती उद्भवू शकते, अशावेळी एकाला आपल्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागेल, त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते. बाहेरून आलेल्यांना आपल्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागू शकतात. दुय्यम पद स्वीकारावे लागू शकते. मूळ पक्षात असताना मिळत होत्या त्या संधी त्यांना आता मिळतील का? अन्य मित्रपक्षांप्रमाणेच भाजपमध्येही असंतोष वाढू शकतो. अशा स्थितीत ज्यांनी सन्मानाचे दिवस दाखविले त्यांच्या पडत्या काळात त्यांना सोडून जाणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहेच शिवाय स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. तत्त्व आणि विचारांशी तडजोड कधीच करू नये.

अजय भुजबळ, सातारा

गृहमंत्र्यांचे अभय तर नाही ना?

‘निर्भय बनो’ चे भय कुणाला?’ हा अन्वयार्थ (१२ फेब्रुवारी) वाचला. संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘निर्भय बनो’ सभेला उपस्थित राहणाऱ्या पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वांभर चौधरी, वकील असीम सरोदे यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. शांततेच्या व संविधानाच्या मार्गाने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेला हा हल्ला निंदनीय आहे. सत्ता अबाधित राहावी यासाठी झुंडशाहीचा खुलेआम वापर केला जात आहे. निःशस्त्र कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना गृहमंत्र्यांचे अभय तर नाही ना, अशी शंका सामान्य जनतेच्या मनात आल्यावाचून राहत नाही. काँग्रेसच्या नावाने रोज बोटे मोडणारे आज कोणत्या मार्गाने जात आहेत? लोकसभेच्या ४०० जागा जिंकणाऱ्यानी ‘निर्भय बनो’ च्या कार्यकर्त्यांना भिण्याचे कारण काय? सनदशीर मार्गाने जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या राजकीय गुंडांकडून का लक्ष्य केले जात आहे? हत्या, गोळीबार, गाड्या फोडणे, निःशस्त्र सामाजिक कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करणे अशा गोष्टी रोज घडताना दिसत आहेत. यासाठी जनतेने निवडून दिले आहे का? राज्यात कायद्याचे राज्य न राहता गुंडाराज आले आहे, ही चिंतेची बाब आहे.

प्रा. जयवंत पाटील, भांडुप (मुंबई)

हे जातीयवाद्यांचे राजकारण!

‘शिवरायांना रामदास स्वामींनी घडवले : योगी आदित्यनाथ’ ही बातमी (लोकसत्ता, १२ फेब्रुवारी) वाचली. पुण्यातील काही वर्तमानपत्रांनी रामदास स्वामींचा उल्लेख हेतुपुरस्सर टाळला आहे तर काही वर्तमानपत्रांनी त्रोटक उल्लेख केला आहे. मात्र केवळ ‘लोकसत्ता’नेच या मथळ्यासह बातमी प्रसिद्ध केली आहे. या कार्यक्रमासाठी मी स्वतः दोन दिवस हजर होतो. त्यात जवळपास सर्वच वक्त्यांनी, संतमहंतांनी, खुद्द कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांनीही समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या, गुरु-शिष्य संबंधांवरून, ‘भक्ती आणि शक्ती’ एकत्र आल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यस्थापनेमध्ये यश मिळवू शकले, याचा उल्लेख केला होता. मात्र जातीयवादी विष पेरून राजकारणाचा व्यवसाय करत असलेल्या काही नेत्यांनी आता छत्रपतींचा इतिहासच बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपले आयुष्य खर्च केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी, अभ्यासपूर्वक, सबळ पुरावे वाचून-तपासून-त्याची शहानिशा करून, लिहिलेल्या शिवछत्रपतींच्या इतिहासात सोयीस्कर बदल करण्याचा चंग काही जातीयवादी राजकारण करणाऱ्या नेत्यांनी बांधला आहे. मात्र इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहास बदलून टाकतो, हे ऐतिहासिक सत्य आहे.

शिवराम वैद्य, निगडी (पुणे)

संवेदनशीलता केवळ मोदींपुरतीच?

‘शिवरायांना रामदास स्वामींनी घडवले : योगी आदित्यनाथ’ ही बातमी वाचली. जर तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर जाहीर वक्तव्य करण्याआधी माहीत करून घ्या. एका वंदनीय राष्ट्रपुरुषाबद्दल असे कोणतेही विधान करू नये ज्यामुळे वाद निर्माण होईल. यापूर्वी कोश्यारी यांनीही अशीच मुक्ताफळे उधळली आहेत. शिवरायांच्या जीवनातील घटना प्रसंग इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहेत, तो तुम्ही नव्याने मोडून तोडून सांगू नका. शिवरायांच्या जडणघडणीत जिजाऊंचा वाटा हा मोठा आहे. तुम्हाला एका कर्तबगार स्त्रीचे मोठेपण नाकारायचे आहे की लपवून ठेवायचा आहे? तुमच्या सोबत महाराष्ट्रातील जी नेतेमंडळी होती त्यांनी तरी ही बाब लक्षात आणून द्यायची होती. आता निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा असले वाद टाळले तर उत्तम. आज महाराष्ट्रात सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे त्यात या बाहेरच्या वाचाळवीरांची विधाने नाहक भर घालतात. मोदींबाबत संवेदनशील असलेले शिवरायांबद्दल असले वक्तव्य कसे खपवून घेतात?

किरण दारूवाले, बोरीवली (मुंबई)

साहित्य संमेलनात, गरज आहे नव्या कल्पनांची

मी नाशिकच्या संमेलनाचा अध्यक्ष होतो… पण अध्यक्ष म्हणून मला प्रत्यक्ष हजर राहता आले नाही. कारण एक तर कोविडमुळे लोकांच्या हिंडण्या-फिरण्यावर निर्बंध होते आणि दुसरे, माझी प्रकृती पार्किन्सनमुळे बरीच ढासळली होती. शक्य तो प्रवास करू नका हा वैद्यकीय सल्ला पाळून मी घरीच बसून राहिलो. त्यावेळी शक्य झाले नाही पण सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या संदर्भात मला काही विचार व्यक्त करावेसे वाटतात!

अशा सभेत संचार करताना पंडित मैत्री व्हावी. याकरिता साहित्याशी जोडलेल्या विविध विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रे प्रामुख्याने असावीत, असतात ही. पण त्यासाठी नियोजित अध्यक्षांचे मार्गदर्शन घ्यावे. कधीतरी चाकोरीबाहेरचे विषय पुढे येतात. माझा विचार होता की विज्ञान कथा म्हणजे केवळ परग्रहाचे आक्रमण नसून त्यात आणखी पुष्कळ विषय येऊ शकतात हे दाखवण्यासाठी माझ्या एका कथेचे वाचन करावे. ही कथा मी बटाट्याच्या चाळीच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. तिचे वाचन सुनीताबाईंनी पुलंच्या उपस्थितीत केले होते. जेव्हा योग्य ठिकाणी त्यानी हसून दाद दिली तेव्हा जीव भांड्यात पडला! मी यासाठी वेळ मिळेल का अशी विचारणा नाशिकच्या आयोजकांना केली होती पण वेळेअभावी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. (जाता जाता सांगतो. मी पुलंना आणि सुनीताबाईंना भेटायला जायचो तेव्हा माझी पसंद म्हणून बटाटेवड्याचा बटवडा केलेला असायचा.) थोडक्यात, गरज आहे नव्या कल्पनांची. हे लिहिताना माझा दृष्टिकोन कोणाच्या बाजूने/ विरुद्ध असा नाही. कबीराने म्हटल्याप्रमाणे-

कबिरा खडा बजारमे मागे सबकी खैर

ना काहुसे दोस्ती ना काहुसे बैर।

– जयंत नारळीकर