‘सर्वाधिक लोकप्रिय खाद्य असूनही देशभरात समोशाचा आकार एकसारखा का नाही? त्याच्या भावातही फरक का?’ या लोकसभेत उपस्थित केलेल्या दोन प्रश्नांना ‘सिंदूर’च्या चर्चेपेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळाल्याने भाजपचे खासदार रविकिशन भलतेच खुशीत होते. बरे झाले सिंदूरच्या चर्चेसाठी आपले नाव पक्षातर्फे निश्चित करण्यात आले नाही, अन्यथा देश एका महत्त्वाच्या मुद्द्याला मुकला असता असा विचार करत ते परतले तर घरासमोर फेरीवाल्यांची प्रचंड गर्दी. त्यातल्या प्रत्येकाच्या हातात टोपली. त्यात समोसे. ते गाडीतून उतरताच त्यांनी गराडा घालून आमचा समोसा कसा मोठा हे दाखवायला सुरुवात केली.
या खास पदार्थाला तुमच्या दोन प्रश्नांनी अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. गेल्या दोन तासांत आमचा खप चारपटींनी वाढला असे म्हणत साऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ते स्वीकारून ते आत गेले तर भोजपुरीचे दहा निर्माते दिवाणखान्यात दाटीवाटीने बसलेले. मग त्यातला एकेक सुरू झाला. ‘समोसा हा मूळचा पर्शियन नाही तर त्याच्या निर्मितीच्या कथा आपल्या धर्मग्रंथात कशा आढळतात व मुघलशासक महम्मद घोरीने हा पदार्थ कसा आपल्या नावावर खपवला तसेच त्यात मांस टाकून बाटवला असे कथानक तयार आहे. त्यात तुम्ही नायक’ अशी ऑफर एकाने दिली. ‘मी ‘एक्सल समोसा’ असा विनोदी चित्रपट काढू इच्छितो. मानधन तुम्ही म्हणाल तितके’ दुसऱ्याने हे म्हणताच रविकिशनजींनी चमकून बघितले. ‘आम्ही ‘एक देश-एक समोसा’ असा लघुपट तयार करू इच्छितो. चित्रपटापेक्षा जास्त मानधन देण्याची तयारी आहे’ तिसऱ्याने हे सांगताच ते हसले.
चौथा म्हणाला ‘माझ्या कथानकातला खलनायक भेसळीचे तेल वापरून समोसा तयार करतो. त्याला वठणीवर आणण्यासाठी नायक शुद्ध तुपातले समोसे विकण्यासाठी बेरोजगारांची मदत घेतो. तुम्ही नायक वठवायचा’ किशनजी काहीच बोलले नाहीत. ‘समोसा व पकोडे तळून या देशाच्या अर्थव्यवस्थेला तसेच जीएसटीला चालना देणे किती महत्त्वाचे यावर एक माहितीपट करायचा. त्यात तुम्ही हवे’ पाचव्याने असे म्हणताच त्यांनी अंगठा दाखवला. मग सहावा बोलायला उठला तसे त्यांनी त्याला थांबवले.
एकाच वेळी मी पाचच्या वर ऑफर स्वीकारू शकत नाही कारण संसदेतही मला महत्त्वाच्या विषयावर मते मांडायची असतात. अभ्यास करावा लागतो असे म्हणत ते उठले व आत गेले. या देशात राजकीय कर्तृत्व सिद्ध करायला एक समोसा पुरेसा आहे. लालूंनी याच बळावर बिहारवर राज्य केले. निवडणुका जिंकायच्या असतील तर असे लोकांच्या भावनेला हात घालणारे विषय हवेत. समोसा हा समाजातील सर्व घटकांना आपलेसे करून घेणारा पदार्थ. त्यामुळे आपण जे केले ते योग्यच. विश्वगुरूंनाही असे विषय आवडतात. त्यामुळे आता तरी ते आपल्याकडे लक्ष देतील असा विचार करत असतानाच बिकानेरचे काही व्यापारी भेटायला आले असा निरोप मिळाला. मग ते तयार होऊन पुन्हा खाली आले.
विक्रीला सोपे जावे म्हणून आम्ही आजवर लहान समोसे विकत होतो. तुम्ही आमचे डोळे उघडले. आता मोठा समोसा तयार करणार. एकदा त्याचा आकार निश्चित केला की देशही त्याचेच अनुकरण करणार. तुम्ही या समोशाचे ब्रँड अॅम्बेसिडर व्हा फक्त. हे ऐकून आनंदित झालेल्या रविकिशन यांनी लगेच करारावर स्वाक्षरी केली. तेवढ्यात त्यांना पक्ष कार्यालयातून फोन आला. बिहारचे स्टारप्रचारक म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली म्हणून!