डॉ. अजित जोशी
सामान्य माणसं साऱ्या आंतर्विरोधांतूनही एकमेकांबरोबर सलोख्याने राहतात, मात्र कधीकधी त्यांना धर्म, वंश, भाषा या विषयांवर भडकवत एकमेकांच्या कत्तली करण्यास प्रवृत्त केलं जातं, हे निदर्शनास आणून देणाऱ्या पुस्तकाविषयी…

‘गो बॅक’ म्हणून ज्याच्या विरुद्ध आंदोलन केलं त्या सायमनने २९ जानेवारी १९१९ला भारतात पाऊल ठेवलं. अर्थात याचा अर्थ तो मुंबई किंवा चेन्नईला पोहोचला असं नाही, तर त्या दिवशी तो आज येमेनमध्ये असलेल्या एडनला पोहोचला. कारण त्या वेळेला भारताच्या नकाशात एका बाजूला एडनपासून दुसऱ्या बाजूला ब्रह्मदेशपर्यंत एक अत्यंत विस्तीर्ण भूभाग होता. आणि ही काही हजार पंधराशे वर्षांपूर्वीची गोष्ट नव्हे तर शंभरहून कमी वर्षांपूर्वीच्या तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या भारताचा नकाशाच असा होता.

१९२८ पासून पुढच्या अवघ्या ४३ वर्षांत म्हणजे १९७१ पर्यंत या नकाशाची अनेकदा फाळणी होऊन त्यातून अनेक देश निर्माण झाले, त्याचा इतिहास तरुण इतिहासकार सॅम डॅलरींपल याने आपल्या ‘शॅटर्ड लँड्स’ या पुस्तकात मांडला आहे. फाळणी हा विषय काही आपल्याला नवा नाही आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर कोणत्याही पुरेशा माहितीशिवाय फाळणीवर बोलायला दिवाणखान्यातल्या विद्वानापासून ते राष्ट्रीय नेत्यापर्यंत प्रत्येक जण आतुर असतो.

या पार्श्वभूमीवर सॅमचं हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं ठरतं ते दोन-तीन कारणांसाठी… पहिलं म्हणजे वर उल्लेखलेल्या स्वयंघोषित इतिहासकारांप्रमाणे आजच्या काळाचे हिशेब सेटल करण्यासाठी ते लिहिलेलं नाही. उलट आज कल्पनाही करता येत नाही, अशा ७५ वर्षांपूर्वीच्या काळाची पार्श्वभूमी सॅम खूप अभ्यासपूर्ण मेहनतीने उभा करतो. तो अशा काळाची गोष्ट सांगतो जेव्हा अरबस्तानात गुजराती शेख होते, ब्रह्मदेशात तामिळ चेत्तीयारांनी धंद्यांबरोबर जमिनीही ताब्यात ठेवलेल्या होत्या आणि येमेनचा संस्थानिक हैदराबादेत जन्माला येऊन कौटिल्याचे संदर्भ देत होता. या काळाचे काही साक्षीदार आज हयात आहेत हे पाहिलं तर आपल्या सामूहिक जाणिवा किती झपाट्याने बदलत आहेत ते कळतं.

दुसरी गोष्ट म्हणजे हा इतिहास निव्वळ राष्ट्रप्रमुख आणि नेत्यांच्या दृष्टीने लिहिलेला नाही. एखादा ब्रह्मदेशातून निर्वासित झालेला उत्तम सिंग असेल, बांगलादेशचा साल इमाम असेल किंवा येमेनमध्ये नोकरी करणारा कोणी एक धीरूभाई आणि त्याची पत्नी असतील. या संपूर्ण राजकीय नाट्याच्या फक्त कलाकारांच्याच नाही तर साक्षीदारांच्या नजरेतून हा इतिहास उलगडत जातो. आपल्याला फारसा ज्ञात नसलेला किंवा काही वेळा जाणूनबुजून नजरेआड केलेला इतिहास यातून आपल्यासमोर येतो.

यातला सर्वात दुर्लक्षिलेला पण अतिशय महत्त्वाचा भूभाग म्हणजे म्यानमार किंवा ब्रह्मदेश! एकेकाळी शांत, समृद्ध, संपन्न असलेली ही भूमी तिशीच्या दशकापासून अस्वस्थ होण्यास सुरुवात झाली. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे तिथले परप्रांतीय भारतीय हे ब्रिटिश सरकारच्या सहयोगाने शोषण करीत आहेत, हा युक्तिवाद ही तिथल्या राजकीय खळबळीची सुरुवात होती.

पुढच्या काळात सगळीकडे ब्रिटिशांनी निवडलेला फाळणीचा रक्तलांछित पर्याय बहुधा म्यानमारमध्ये त्यांनी सर्वांत आधी निवडला असावा. भारतापासून म्यानमार हे एक वेगळं राष्ट्र म्हणून पाहिलं जावं ही ब्रिटिशांची कल्पना त्याकाळी म्यानमारमध्येही सर्वांना मान्य नव्हती. १८५७ धाटणीच्या उठावाचा नेता असलेला साया सान असो, ब्रह्मदेशचा गांधी म्हणून ओळखला जाणारा महात्मा ओथामा असो, आपली भूमी दोन देशांत विभागली जाणार म्हणून नाराज असलेल्या नागा किंवा शान जाती असोत किंवा यू सो सारखे लोकशाहीवादी नेते या सर्वांनीच एका टप्प्यावर म्यानमारच्या फाळणीचा विरोध केला होता.

दुर्दैवाने विसाव्या शतकात इतर भाषांचे/ वंशाचे/ धर्माचे लोक आपल्या सर्व दुरवस्थेच्या मुळाशी आहेत, अशी भावना बाळगणारे स्थानिक आणि आपण दुसऱ्या प्रांतात उद्याोगधंदे केले म्हणून त्या प्रांताचा उत्कर्ष झाला असा अहंकार असणारे परप्रांतीय, हाच संघर्ष ठिकठिकाणी समूहांच्या मानसिकतेला अपील करणारा ठरला. त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटिशांनी केलेली फाळणी नुसती मान्य झाली असे नाही तर त्यानंतर भीषण संहाराचा सिलसिला सुरू झाला, जो आजही संपलेला नाही. यात सर्वांत पहिला बळी गेला तो म्यानमारमधल्या हिंदू, मुस्लीम, शीख, तमिळ… भारतीयांचा! पुढच्या २० वर्षांच्या काळात जगाच्या इतिहासातील एक भीषण विस्थापन म्यानमारमधून झालं.

एका टप्प्यावर जिना आणि काँग्रेस दोघेही म्यानमारमधील वांशिक हिंसाचाराविरुद्ध हिरिरीने बोलत होते. पुढे दुसरं महायुद्ध आणि जपानने ब्रह्मदेशावर केलेल्या आक्रमणामुळे हा प्रश्न अधिकच चिघळला. यातली सर्व राजकीय समीकरणं जरी बाजूला ठेवली तरी तिथल्या सामान्य भारतीयांना विस्थापनाच्या ज्या भयंकर यातना भोगाव्या लागल्या त्या दु:खद आहेत. त्यातही विस्थापित होणाऱ्या भारतीयांचा डोंगरदऱ्यांतून, रोगराई/ उपासमार सोसत जाणारा एक वेगळा अधिक खडतर मार्ग आणि पळून चाललेल्या ब्रिटिशांसाठी तुलनेत खूप कमी त्रासाचा वाईट मार्ग हा भेदभावही लक्षणीय आहे (आणि हे आपल्यासमोर आणणारा सॅमसुद्धा ब्रिटिशच!)

त्या तुलनेत खूपच कमी रक्ताळलेली फाळणी म्हणजे भारतापासून झालेली दक्षिण अरेबियाची… एकेकाळी येमेन, ओमान, यूएई वगैरे आजचे देश इंडियन एम्पायर अर्थात ब्रिटिश साम्राज्यातल्या भारताचाच भाग होते. आपल्या वासुदेव बळवंतांना येमेनच्या एडनमध्ये ठेवलं होतं हे कदाचित आठवत असेल. पण तीसच्या दशकाच्या सुरुवातीला म्यानमारप्रमाणेच ब्रिटिशांनी हाही भाग आपल्या भारतीय साम्राज्यातून वेगळा काढला.

तोपर्यंत तिथे मोठ्या प्रमाणावर शीख, ज्यू आणि भारतीय स्थायिक झालेले होते. (तेलाच्या समृद्धीनंतर तिथे गेलेल्या आजच्या भारतीयांशी त्यांचा संबंध नाही.) त्यामुळे या तांत्रिक फाळणीनंतरही १९५० नंतरच्या दशकातसुद्धा दक्षिण अरेबियातील हे भूभाग म्हणजे जणू ब्रिटिश राजचा काळच थांबलेला आहे, असे वाटत असत. खास करून दक्षिणी येमेनमधला भारतीय वावर खूप मोठा होता. तिथले काही संस्थानिक स्वत:ला थेट हैदराबादच्या निजामाचे मांडलिक मानत असत. कैतीचा संस्थानिक निजामाचा जावई होता आणि त्याच्या लिखाणात चक्क चाणक्याचे उल्लेख येतात. ओमानचा सुलतान भारतात शिकलेला होता.

आणि कोणी परप्रांतीय म्हणू नये म्हणून त्याने तिथल्या बनियांना एक टोळी किंवा ट्राइब म्हणून ओळख दिली. या टोळीचा नेता म्हणून खिमजी या भारतीय व्यापाऱ्याला शेख ही पदवीसुद्धा मिळाली. पण एकीकडे तेलाचा शोध, दुसऱ्या महायुद्धानंतर खिळखिळी झालेली ब्रिटिश अर्थव्यवस्था आणि इजिप्तच्या नासरच्या प्रेरणेने पेटत चाललेली अरब अस्मिता यातून दक्षिण अरेबियाचे सांस्कृतिक, व्यापारी आणि राजकीय बंध तुटत गेले. येमेनमध्ये उभ्या राहिलेल्या चळवळींनी हळूहळू तिथला भारतीय वावर संपुष्टात आणला. कैतीच्या लोकप्रिय संस्थानिकाला हाकलून दिले. मुघल- अरब- दक्षिणी मिलापाच्या स्थापत्यशास्त्राचे तिथले नमुने उद्ध्वस्त झाले. सुदैवाने ओमानमध्ये सत्तेत आलेल्या सुलतान खबूसने सामोपचाराचा मार्ग निवडला आणि आजही तेथे ‘शेख’ खिमजी महत्त्वाचे उद्याोगपती आहेत! मात्र भारतीयांची अरबस्थानाशी नाळ तुटली ती कायमची!

एकेकाळी युरोपीय राष्ट्रांच्या तोडीचं संस्थान असणारं काश्मीर, हैदराबाद आता निष्प्रभ झालं होतं आणि एकेकाळी रानटी टोळीवाले मानले गेलेले ओमान, कतार वगैरेचे शेख आंतरराष्ट्रीय संबंधांत महत्त्वाची भूमिका बजावत होते हा इतिहासाचा काव्यगत न्याय सॅमने भेदकपणे अधोरेखित केला आहे… पण या सगळ्यांमध्ये भारतीयांना जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भारत आणि पाकिस्तानची १९४७ सालची फाळणी… सॅमच्या पुस्तकात अर्थात त्याचीही सविस्तर चर्चा आहे.

मुळात या फाळणीवर इतकं प्रचंड प्रमाणात लिखाण उपलब्ध आहे की या पुस्तकामुळे त्यात खूप मोठी भर पडते असं म्हणता येत नाही. किंबहुना या फाळणीचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावण्याचा फार प्रयत्न या पुस्तकात झाला आहे असंही म्हणता येत नाही. त्याऐवजी फाळणी आणि त्या आजूबाजूच्या घटनाक्रमातील वास्तव समोर आणण्याचा हा प्रयोग आहे. पण लक्ष वेधून घेण्यासारखी बाब म्हणजे त्यानिमित्ताने भारतच नव्हे तर इतरही संस्थानिकांचं वर्तन सॅमने ठिकठिकाणी दाखवलेलं आहे. जोधपूर, जैसलमेरचे संस्थानिक पाकिस्तानात विलीन होण्याच्या गंभीर चर्चा त्या सरकारशी करत होते.

काश्मीर पाकिस्तानात येणारच असं गृहीत धरून जिना काहीच न करता बसून राहिले, पण नेहरूंनी आणि भारत सरकारने त्याकरिता सुरुवातीपासून जोर लावला आणि त्यात अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सची मोठी मदत झाली. जुनागड किंवा दुजानाचे संस्थानिक पाकिस्तानात जाण्यासाठी धडपडत होते. तर राम- कृष्णाची भक्ती करणाऱ्या ‘मियो’ मुसलमानांना अलवारच्या संस्थानिकांनी जबरदस्तीने हाकलून काढलं. विलीनीकरणासाठी उत्सुक असलेल्या अनेक संस्थानिकांकडे प्रदीर्घकाळ पाकिस्तानी सरकारने दुर्लक्ष केलं. त्रावणकोरच्या संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्याला जीना आणि सावरकर दोघांचाही पाठिंबा होता. संस्थानांच्या विलीनीकरणानंतर मेहंदी हसन किंवा रविशंकर यांच्यासारख्या कलाकारांची कारकीर्द बदलून गेली. असे अनेक रंजक तपशील यात मिळतात.

पण फाळणीच्या या घटनाक्रमामधील सॅमने महत्त्व दिलेला एक मोठा भाग म्हणजे ईशान्य भारतातील नागा आणि मिझो जमातींच्या कहाण्या. ब्रह्मदेशाच्या फाळणीपासून नागा जमात दोन देशांत वाटली गेली. या जमातीला स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचं होतं. पण जागतिक राजकारणे आणि बलाढ्य सत्तांनी ते होऊ दिलं नाही. नागा नेता फिझो म्हणत की, राजेशाही असलेले नेपाळ, भूतान स्वतंत्र राहिले पण लोकशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या नागा टोळ्यांना मात्र जबरदस्तीने कोणत्या न कोणत्या देशात ढकललं गेलं. याचे परिणामी तीसच्या दशकातल्या म्यानमार फाळणीपासूनच दूरगामी असणार होते.

खरं तर १९५० नंतरचं दशक भारत पाकिस्तान सौहार्दाचं होतं. प्रसंगी या दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी अमेरिकेबरोबर एकत्र कामही केलं होतं. पण सॅमच्या मांडणीनुसार नागा नेता फिझो याला पाकिस्तानने दिलेल्या पाठिंब्यानंतर हे चित्र बदलायला लागलं. आणि भारतीयांनी पूर्व पाकिस्तानातल्या बंगाली अस्मितेबाबत रस दाखवण्यास सुरुवात केली. ७१ च्या युद्धापूर्वी सुमारे १५ वर्षांपासून मुजीबूर रहमानची चाललेली धडपड, नेहरूंनी त्याला दिलेला सावध पाठिंबा, आगरताळा कॉन्स्पिरसी केसमधून पाकिस्तानी नेत्यांच्या आत्मघातकीपणामुळे मुजीबरला मिळालेलं वलय, मार्च १९७१ मध्ये हा प्रश्न शांततेने सुटेल असं वाटत असताना पाकिस्तानी लष्कराने सुरू केलेला ‘ऑपरेशन सर्च लाइट’चा क्रूर आणि रक्तरंजित प्रयोग आणि त्यातून सामान्य बांगलादेशी नागरिकाचा स्वातंत्र्याकडे निर्माण झालेला कल हा सर्व घटनाक्रम या पुस्तकात तपशीलवार येतो. पूर्वेतली पार्श्वभूमी त्याने सविस्तर अधोरेखित केली आहे.

सॅम तरुण लेखक आहे. एवढ्या व्यापक कॅनव्हास वर लिहिलं गेलेलं त्याचं हे पहिलंच पुस्तक आहे. त्यामुळे काहीसा विस्कळीतपणा या पुस्तकात जाणवतो. काही ठिकाणी त्याचे व्यक्तिगत पूर्वग्रह समोर येतात किंवा काही ठिकाणी तो थोडा वाहवतही जातो. काहीसा आक्षेपार्ह भाग म्हणजे त्याच्या पुस्तकात मोठ्या नेत्यांच्या खासगी आयुष्याची चवीने केलेली चर्चा. अनेकदा ती अनाठायी आणि असंबद्ध वाटते. आणि तरीही हे पुस्तक वाचनीय आहे. कारण इतिहास आपल्याला मोलाचे धडे शिकवतो. या धड्यांचं प्रवचन (प्रीचिंग) करणं ही इतिहासकाराची सर्वांत मोठी निसरडी जागा असते.

सॅमने जाणीवपूर्वक ती टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याच वेळेला ‘हे असं घडलं’ असं सांगता सांगता मिळणारे धडे आपण आपल्याला वाटल्यास समजून घेऊ शकतो. कोणत्याही भूभागात आर्थिक, सांस्कृतिक, सामंजस्यातून भिन्नभिन्न जाती, धर्म, भाषा, वंश बाळगणारे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असतात. यामध्ये अन्याय, शोषण होतंच नाही असं अजिबात नाही, पण शोषक आणि शोषित ही काही विशिष्ट जात, धर्म, भाषा किंवा वंश यांनी विभागलेले असतात असं इतिहासात अजिबात दिसत नाही.

एखाद्या चकमा प्रदेशातील बौद्ध १९७१च्या युद्धात भारताविरुद्ध पाकिस्तानची मदत करतात. कोणी पख्तुन धर्म डावलून पाकिस्तानऐवजी भारतात येऊ पाहतात. म्यानमारचा गांधी म्हटला गेलेला बौद्ध नेता हिंदू महासभेचा अध्यक्ष होतो. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश, तीनही देशांचे लष्करी नेते ब्रिटिशांच्या अकादमीत एकत्र शिकलेले आणि त्यांच्यासाठी एकत्र लढलेले (ईशान्य भारतात तर सुभाषबाबूंविरुद्ध!) असतात. आणि अवघ्या २५ वर्षांत ते एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सेनांचं नेतृत्व करतात.

सामान्य माणसं या सगळ्या आंतर्विरोधांतूनही एकमेकांशी सलोख्याने राहतात. मात्र कधी राजकारणी, कधी सैन्य, कधी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, तर कधी उद्याोगधंद्यांचे स्वार्थ या सामान्य माणसाला धर्म, वंश, भाषा या विषयावर भडकवतात आणि एकमेकांच्या कत्तली करण्यास प्रवृत्त करतात. हा खरं सांगायचं तर काही नवा धडा नाही, पण भरपूर अभ्यास करून आणि शक्य तेवढी तटस्थ भूमिका घेत सॅम डॅलरींपलने आपल्या पुस्तकात हा धडा प्रभावीपणे समोर ठेवलेला आहे आणि म्हणूनच ते वाचायला हवं!

शॅटर्ड ल्रॅंड्स

लेखक: सॅम डॅलरींपल

प्रकाशक: हार्पर कॉलिन्सप 

षृठे – ५३६,

मूल्य- ७९९रुपये