‘टायटॅनिक’ या आलिशान जहाजाचे बुडणेही जणू आलिशान.. त्या एका दुर्घटनेवर चार-सहा इंग्रजी चित्रपट निघाले. त्यापैकी अखेरच्या- केट विन्स्लेट आणि लिओनार्दो डि कॅप्रिओ यांची भूमिका असलेल्या- चित्रपटाचा प्रभाव केवळ त्या वर्षीच्या तिकिटबारीवर आणि ऑस्कर पुरस्कारांवरच नव्हे तर पुढल्या पाच-सहा वर्षांतील सेल्फीमग्न मोबाइलधाऱ्यांवरही पडला. २१ व्या शतकात तर १२,५०० फुटांपर्यंत खोल समुद्रतळाशी नेऊन मोजक्या बडय़ा पर्यटकांना टायटॅनिकचे अवशेष-दर्शन प्रत्यक्ष घडवणाऱ्या सहली सुरू झाल्या. या अवघ्या आठ तासांच्या सहलीसाठी अडीच लाख डॉलर्स मोजावे लागतात आणि तुलनेने या सहलीत सुरक्षितेची काळजी मात्र कमी घेतली जाते, हे कटू सत्य अखेर ‘टायटन’ या सूरबुडीच्या – अर्थात ‘सबमर्सिबल’च्या अपघाताने चव्हाटय़ावर आणले. ही सूरबुडी गेल्या शनिवारी बेपत्ता झाली, तेव्हापासून युरोपीय आणि अमेरिकी प्रसारमाध्यमांनी नानापरींच्या माहितीचा भडिमार प्रेक्षकांवर चालवला होता. पाणबुडी स्वत:हून पाण्याखाली जाऊन पुन्हा वर येऊ शकते, तर सूरबुडी समुद्रतळापर्यंत जाण्यासाठी मात्र निराळी नौका- मदरशिप- आवश्यक असते, या मदरशिपशी संपर्क तुटणे म्हणजे संकट- या प्रकारचा तपशील अशा भडिमारातूनच जगभर माहीत झाला. शिवाय, त्या सूरबुडीत ४० ते ५० तास पुरेल इतकाच ऑक्सिजन आहे, हेही जगाला समजले. शेवटी ती अप्रिय बातमी आलीच- ती सूरबुडी आणि तिच्यातील सर्व पाच प्रवासी जिवंत बाहेर येण्याच्या आशेने तीन देशांकडून सुरू झालेले मदतकार्य यापुढे निष्फळच ठरणार, हे उघड झाले. पण प्रश्न सुरू झाले ते यानंतर!
मुळात टायटॅनिकचे कलेवर पाहण्याचा शौक महागडा आणि जीवघेणा. त्यास प्रोत्साहन दिले कोणी? बुडालेली सूरबुडी पुरेशी मजबूत नव्हती, तिच्यावरील आवरणात टिटॅनियम धातू पुरेशा प्रमाणात नव्हता, हे तज्ज्ञांचे म्हणणेही वरातीमागच्या घोडय़ासारखे दुर्घटनेनंतरच जगापर्यंत पोहोचले. गुजरातमधील भुज- कच्छच्या २००२ सालच्या भूकंपाने अहमदाबाद परिसरातील दोन उंच इमारतींना भूकंपरोधक प्रमाणपत्रे असूनही त्या कोसळल्या, कारण त्यांच्या दहाव्या मजल्यावर बेकायदा तरण-तलाव बांधले होते हे जसे नंतर उघड झाले, तसेच हेही. यावर कुणी म्हणेल- अपघातानंतरच तर त्याचे विश्लेषण होणार! पण अपघातपूर्व काळजी घेतली जाण्याची अपेक्षा पाळली गेली की नाही, याचेही विश्लेषण होण्यासाठी अपघाताची आणि मनुष्यहानीचीच वाट पाहावी लागते काय? बरे, अहमदाबादच्या उंच इमारती कोसळण्याचीच दृश्ये त्या वेळी जशी ठसली होती आणि खेडोपाडी राहणाऱ्या मुलामाणसांचे हाल नजरेआड झाले होते, तसे टायटॅनिकचा सांगाडा दाखवणाऱ्या ‘टायटन’मुळेसुद्धा झालेले आहेच.. ‘टायटन’मधल्या अतिहौशी, अतिश्रीमंत आणि बुडाल्यामुळे अतिप्रसिद्ध अशा त्या पाच पर्यटकांपेक्षा किमान शंभरपटीने अधिक माणसे युरोपच्या जवळच बुडाली.. ती का बुडाली, ही मोठी आणि इतक्या प्रचंड मनुष्यहानीची दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय करता येईल, याविषयी काहीही चर्चा नाही.
मृतांचा आकडा ७५० की नेमका किती हेसुद्धा अद्याप निश्चित नाही, पण ही सारी माणसे युरोपात निर्वासित म्हणून येण्यास लिबियाहून निघाली होती, एवढे माहीत आहे. अॅड्रियाना बोट १० जून रोजी लिबियातील टोब्रूक बंदरातून निघाली आणि १४ जून रोजी ग्रीसच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील पायलोस शहरापासून ८७ कि.मी. अंतरावर बुडाली. क्षमतेपेक्षा किती तरी अधिक प्रवासी या नौकेवर होतेच आणि बहुधा या एकाच कारणाने तिच्यात बिघाड होऊन तिला जलसमाधी मिळाली. ग्रीक तटरक्षकांचे म्हणणे असे की, आम्ही या बुडत्या प्रवाशांना वाचवण्यासाठी इशारे देण्याचा प्रयत्न केला, पण तेच आमच्यापासून लांब गेले.. का, तर आम्ही त्यांना कैद करू असे या स्थलांतर-इच्छुकांना वाटले असावे. यातील खरे-खोटे नंतर ठरेल, पण या नौकेवर २९० पाकिस्तानी तरुण होते. त्यांना युरोपात ‘जगायला’ पाठवण्यासाठी एकेका तरुणामागे दहा-अकरा लाख पाकिस्तानी रुपये त्यांच्या कुटुंबीयांनी कुणा दलालांना दिले असतील. देश जितके गरीब, जितके अनुत्पादक तितका तिथल्या माणसांचा जीव स्वस्त, हे दाहक वास्तव आहेच. २०१४ पासून आजवर २१ हजार बेकायदा स्थलांतरितांना जलसमाधी मिळालेली आहे. सर्वात मोठी नौकाबुडी १८ एप्रिल २०१५ मध्ये झाली होती, तेव्हा ११०० पैकी अवघ्या २८ जणांना वाचवण्यात यश आले होते असा ताजा इतिहास- पण तो आपला मानण्यास जग तयार नाही.
त्यामुळेच आजघडीला चर्चा आहे ती आपल्या १९ वर्षांच्या पुत्रासह टायटॅनिक-दर्शनाची हौस भागवताना प्राण गमावलेल्या ब्रिटनमधल्या धनिक उद्योजक शहजादा दाऊदची.. २०१५ मध्ये लाटांबरोबर वाहात किनाऱ्यावर आलेल्या ऐलान कुर्दी या बालकाचे छायाचित्र त्या वेळी गाजले होते, आता ते कुणाला आठवतही नाही.. तसेच कदाचित शहजादा दाऊदचेही विस्मरण होईल, दोघांनाही भिन्न कारणांनी बुडवणारी विषमता मात्र खदखदा हसत राहील.
