सध्याचे युग तंत्रज्ञानाचे. त्यामुळे पूर्वेकडच्या बोधप्रद गोष्टी पश्चिमेकडे जायला असा कितीसा वेळ लागणार? आता या अकबर बिरबलाच्या गोष्टीचेच बघा ना! महालातल्या एकेक महागड्या वस्तू गायब व्हायला लागल्याने अकबर चिंतेत पडला. ते बघून बिरबलाने जनतेला आवाहन केले, महालातील उंची पेले, नक्षीदार ताटे यांची काही भावंडे गहाळ झालीत. ती परत आणून देणाऱ्याला बक्षीस मिळेल. अनेकांनी चोरलेल्या वस्तू आणून दिल्या. मग त्यांना यथायोग्य (चाबकाची) शिक्षा दिली गेली. आता ही गोष्ट व्हाइट हाऊसच्या मागावरील कोणाच्या वाचनात आली ते ठाऊक नाही. पण मामला चोरी करणाऱ्या पत्रकारांचा असल्याने त्यांनीही हाऊसच्या पत्रकार संघटनेला हाताशी धरून असेच आवाहन केले. तेव्हापासून अमेरिकेत मोठा गदारोळ माजलाय. एअरफोर्स वन या राष्ट्राध्यक्षाच्या विमानातून प्रवास करणारे हे भुरटे बोरूबहाद्दर पेले, काटे, चमचे, उशीच्या खोळी, चादरी, सोन्याचा वर्ख असलेली ताटे चोरत होते म्हणे! ही चोरी इतकी वाढली की विमानाची देखभाल करणाऱ्या विभागाला आर्थिक फटका बसू लागला. आता ही चोरी चव्हाट्यावर आल्यामुळे जो तो पत्रकारांची पिसे उतरवू लागला.

हेही वाचा >>> लोकमानस : विरोधकांची अशी कोंडी प्रथमच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाऊबंदकीच्या नात्याने यामागचा कार्यकारणभाव समजून घेणे गरजेचे. मुळात चोरण्याचा गुण पत्रकारांमध्ये उपजतच! मग ती चोरी चांगल्या शब्दांची असो, मथळ्याची वा मजकुराची. ढापणे व स्वत:च्या नावावर खपवणे ही कला असतेच बहुतेकांत. आता या कलेचा परीघ काहींनी वाढवला व विमानात बसण्याची संधी मिळाल्यावर वयोवृद्ध राष्ट्राध्यक्षांच्या गाफीलपणाचा फायदा घेत काही वस्तू टाकल्या स्वत:च्या बॅगेत तर इतका गहजब कशाला? भलेही या वस्तू हाऊसमध्ये विकत मिळत असतील पण त्या घेणे पत्रकारांना परवडेल का यावर प्रशासन कधी विचार करणार की नाही? बिचारे पत्रकार. पगार अत्यल्प तरीही त्यांना कायम थोरामोठ्यांच्या संगतीत राहावे लागते. अशांचे उंची राहणीमान उघड्या डोळ्यांनी बघावे लागते. यातून मनात लालसा उत्पन्न होणे स्वाभाविक. अशा वेळी विमानात हात साफ करायची संधी मिळालीच तर ती त्या गरीब पत्रकाराने का म्हणून सोडावी? याच चोरलेल्या वस्तूंच्या भरवशावर त्याला त्याच्या जगात मिरवता येते. हाऊसने हा बोभाटा करण्याआधी यावर विचार करायला काय हरकत होती? पत्रकार साऱ्यांची बिंगे फोडतात म्हणून त्यांचेही फोडायचे हा कुठला न्याय? हे करण्यापेक्षा हाऊसने पत्रकारांना या वस्तू मोफत मिळतील असे जाहीर केले असते तरी प्रश्न मिटला असता. या हाऊसने आधुनिक काळाला जागत चोरलेले सामान परत आणून द्यावे, नाव गुप्त ठेवू असे आवाहन केले व त्याला एका पत्रकाराने प्रतिसादसुद्धा दिला. किमान आता तरी बदनामी थांबवून या पत्रकाराचा गौरव करायला हवा. व्हाइट हाऊसने जरा भारताकडून बोध घ्यावा. येथील विश्वगुरूंनी चोरी उघड व्हायच्या आधीच प्रवास बंद करून टाकला व अनेकांना विरोधात लिहिणेसुद्धा विसरायला लावले!