महेश सरलष्कर

हिंदूत्व, राममंदिर या भाजपच्या मुद्दय़ांवर भाजपने कधी बोलायचे हे काँग्रेसमुळे ठरू लागल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या त्रिपुरातील वक्तव्यातून दिसले. मात्र यात्रेनंतर काम केल्याखेरीज ‘भारत जोडो’चा प्रभाव वाढणार नाही..

उत्तर प्रदेश देशातील केवळ मोठे राज्य नाही, खरे तर राजकीयदृष्टय़ा इतके स्फोटक राज्य दुसरे नाही. इथे घडणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा घटनांचा देशस्तरावर परिणाम होतो, या घटनांची राजकीय पक्षांना-नेत्यांना तातडीने दखल घ्यावी लागते. काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशच्या जाटबहुल पट्टय़ातून फक्त तीन दिवस प्रवास करून गेली. पण, तेवढय़ात या यात्रेने खळबळ माजवली हे भाजपला मान्य करावे लागेल. कन्याकुमारीपासून निघालेल्या या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असला, तरी भाजपने तिला राजकारणाच्या दृष्टीने गांभीर्याने घतलेले नव्हते. भाजपच्या समाजमाध्यम विभागाने टिंगल उडवली असली तरी, मोदी-शहा आदी वरिष्ठ नेत्यांनी वा संघाच्या नेत्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेकडे धोक्याची घंटा म्हणून पाहिले नाही. पण, उत्तर प्रदेशमधील ७२ तासांमध्ये यात्रेने भाजपला पहिला खरा दणका दिला!

हिंदूत्व भाजपला आंदण दिलेले नाही; पण राम मंदिर बांधण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून भाजपला तसे वाटू लागले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण काँग्रेसने मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना दिले इथपर्यंत ठीक होते. काँग्रेसने कोणाला निमंत्रण द्यावे हा त्या पक्षाचा प्रश्न. पण आचार्यानी काँग्रेसला प्रतिसाद देत राहुल गांधींना आशीर्वाद दिले. भारत जोडो यात्रा यशस्वी व्हावी, अशी मनोकामनाही केली. आचार्यानी भाजपला वा संघ परिवारातील कोणालाही न विचारता, त्यांचा सल्ला न घेता राहुल गांधींना आशीर्वाद देणारे पत्र पाठवले. असे करून आचार्यानी भाजपची एकप्रकारे कोंडी केली आहे. आचार्याच्या पत्रावर उघडपणे भाजपला प्रतिक्रिया देता येईना. काँग्रेसवर टीकाही करता येईना. काँग्रेसने निमंत्रण दिले, त्याची पोचपावती आचार्यानी दिली असेल तर आक्षेप कसा घेणार? या पत्रप्रपंचामध्ये राजकारणही नव्हते. मग, टिंगल तरी कशी उडवणार? काँग्रेसने आचार्याना पत्र लिहिल्याचा बोलबाला केला नव्हता. आचार्यानी जी पोच दिली त्यावरही काँग्रेस काही बोलला नाही. आचार्याची पोचपावती ‘व्हायरल’ झाल्यामुळे राहुल गांधींना दिलेले आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचले. ही पोचपावती कदाचित काँग्रेसनेच व्हायरल केली असेल. आता काँग्रेसचा समाजमाध्यम विभाग पूर्वीइतका सुस्त राहिलेला नाही. भाजपला उत्तर देण्याचे धाडस हा विभाग करू लागला आहे.

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ‘भारत जोडो’ यात्रेला पाठिंबा दिला असेल तर, हिंदूत्ववाद्यांना नाराज होण्याजोगे काही नव्हते. पण आपले हिंदूत्व काँग्रेस ओढून नेऊ शकतो, ही भीती अचानक वर आली असावी. अन्यथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट त्रिपुरामध्ये जाऊन राम मंदिर कधी पूर्ण होणार याची घोषणा केली नसती. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने राम मंदिराच्या पुजाऱ्यांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले आणि तो मिळालादेखील. संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) आचार्याच्या पोचपावतीवर तातडीने प्रतिक्रिया दिली नाही, पण हळूहळू विहिंपची आचार्यावरील नाराजी स्पष्ट होत गेली. आपण कोणाला पाठिंबा देतो याचा विचार करायला हवा होता, असे ‘विहिंप’चे म्हणणे होते. पण, ‘विहिंप’चे नेते आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनीही काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे अप्रत्यक्ष स्वागत केले. एक तरुण भारतभ्रमण करून आपला देश समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे कौतुक केले पाहिजे. राहुल गांधींच्या यात्रेला कशासाठी विरोध करायचा, आम्ही विरोध केलेला नाही, संघाने विरोध केलेला नाही. पंतप्रधान मोदींनी विरोध केलेला नाही, असे चंपत राय म्हणाले. हिंदूत्ववाद्यांकडून काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यामुळे भाजपला सावध व्हावे लागले. कोणताही मुद्दा प्रभावी होण्याआधी तो बोथट केला पाहिजे हे जाणूनच शहांनी राम मंदिर जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केली आणि आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचे संकेत दिले. या निमित्ताने निवडणुकीच्या राजकारणात राम मंदिराने पुन्हा प्रवेश केलेला आहे.

हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर भाजपला मते देणाऱ्या प्रामुख्याने ब्राह्मण मतदारांना आश्वस्त करण्याचाही भाजपचा प्रयत्न असावा. मोदी-योगींच्या सत्तेत ब्राह्मणांना बाजूला केले जाते हा संदेश उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीआधीपासून ब्राह्मणांपर्यंत पोहोचला आहे. मोदी केंद्रीय स्तरावर नेतृत्व करत असल्यामुळे त्यांच्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांच्यावर उत्तर प्रदेशमधील ब्राह्मणांचा अधिक राग आहे. गुजरातमध्येही मोदींच्या कारभारावर नाराज असलेले ब्राह्मण नेता जय नारायण व्यास यांनी ३२ वर्षांच्या भाजपमधील राजकीय कारकीर्दीनंतर पक्षाला रामराम केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये डावलले गेल्यामुळे त्यांची नाराजी वाढत गेली होती. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याची खेळी कोणी केली, हे त्यांच्या पाठीराख्यांना माहिती आहे. अर्थात देशभरच्या वेगवेगळय़ा राज्यांतील ब्राह्मण मतदार अजूनही भाजपसोबत असले तरी, राम मंदिराच्या पुजाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राच्या निमित्ताने हिंदूत्वामध्ये अनेक वाटेकरी असल्याचे समोर आले आहे. ते कायमस्वरूपी भाजपसोबत राहतील असे गृहीत धरणे कदाचित राजकीयदृष्टय़ा महागात पडू शकते.

काँग्रेसने ओबीसी मतदारांना कधीही आपले मानले नाही, त्यांना नेतृत्व दिले नाही. भाजपने मात्र ओबीसींना जाणीवपूर्वक नेतृत्व दिले, मंत्रिमंडळात स्थान दिले, मुख्यमंत्री केले. जातनिहाय जनगणनेला पाठिंबा दिला नसला तरी, राज्या-राज्यांत ओबीसींच्या आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले. ‘उत्तर प्रदेशमध्ये ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत,’ अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली. त्यामुळे ओबीसी मतदार भाजपकडे कायम राहील. काँग्रेसला ओबीसी मतदारांसाठी घोषणाबाजीच्या पलीकडे जाऊन जातगणनेसाठी आंदोलन करावे लागेल; तरच ओबीसी समाज काँग्रेसला प्रतिसाद देईल. ओबीसींची मते मिळवण्यासाठी काँग्रेसला दीर्घकालीन प्रयत्न करावे लागतील. पण येथील ब्राह्मण आणि दलित हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार मानले जात. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही समाज काँग्रेसकडे वळले नाहीत कारण पक्षाची कमकुवत स्थिती. आत्ताही समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुखांनी भारत जोडो यात्रेपासून दूर राहण्याचे ठरवले त्यामागे हेच कारण आहे. काँग्रेस कमकुवत असल्यामुळे या पक्षाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आघाडी नुकसानदायी ठरेल अशी भीती या प्रादेशिक पक्षांना वाटते. ब्राह्मण आणि दलित काँग्रेसला मते देत नसल्यामुळे या पक्षाच्या उमेदवाराला मते देऊनही फायदा नाही, हा विचार करून मुस्लीम मतदार समाजवादी पक्षाशी बांधील राहिलेले आहेत. हे दोन्ही समाज काँग्रेसकडे वळले तर मुस्लीम मतदारही काँग्रेसचा विचार करू शकेल. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येकी १०-१२ टक्के ब्राह्मण मतदार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने पक्ष संघटनेकडे थोडे जरी लक्ष दिले तरी, दोन्ही समाजांतील मतदारांना आकर्षित करता येऊ शकते.

‘भारत जोडो’ यात्रेने उत्तर प्रदेश पालथा घातला नाही; पण तिथल्या छोटय़ा टप्प्यामध्ये या यमत्रेने राजकीय क्षमतेची चुणूक दाखवून दिली. या यात्रेमुळे काँग्रेस संघटना मजबूत होणार नाही की, मतदार लगोलग काँग्रेसवर विश्वास ठेवून मतदान करणार नाहीत. ‘भारत जोडो’ यात्रा संपल्यानंतर, काँग्रेसकडून इतर यात्रा काढल्या जातील. पण पक्ष संघटनेमध्ये बदल करून त्याद्वारे पक्षाचा उमेदवार जिंकण्याची उमेद मतदारांमध्ये निर्माण केली तर, उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत काही जागा मिळू शकतील. इतर राज्यांमध्येही भाजपविरोधातील थेट लढतीत काँग्रेसला अधिक जागा जिंकता आल्या तर, २०२४ च्या निवडणुकीत लोकसभेत सक्षम विरोधी पक्ष पाहायला मिळू शकेल. मग, काँग्रेसकेंद्रित विरोधकांचे राजकारण सुरू होऊ शकेल. विरोधकांच्या महाआघाडीची ताकद तेव्हा पाहायला मिळू शकेल.

mahesh.sarlashkar@expressindia.com