जागतिकीकरणाचा रेटा वाढू लागला तशी सांस्कृतिक सपाटीकरणाची भीती मांडली जाऊ लागली होती. देशभरच नाही तर जगभर एकाच वेळी कोटय़वधी लोकांकडून पाहिल्या जाणाऱ्या दूरचित्रवाणी मालिका हे त्याचेच एक दृश्य रूप. त्यापलीकडे असे सांस्कृतिक सपाटीकरण खरेच झाले का, किती झाले, कसे झाले हा खरे तर अभ्यासाचा विषय आहे. पद्मश्री एच. आर. केशव मूर्ती यांच्यासारख्या कलाकाराच्या मृत्यूनंतर तर ती अधिक प्रकर्षांने जाणवते. कारण दर दहा कोसांवर बदलणारी भाषा आणि प्रत्येक राज्य म्हणजे जणू काही वेगळा देश असावा इतके सांस्कृतिक वैविध्य असलेल्या आपल्या देशात वेगवेगळे कलाप्रकार, त्यांचे सादरीकरण यांची समृद्धी अवाक् व्हायला लावणारी आहे. केशव मूर्ती हे कर्नाटकातील गमक या कलाप्रकाराचे पाईक. गमक हे काव्याच्या माध्यमातून केले जाणारे एक प्रकारचे कथाकथन. काही जण मिळून ते सादर करतात. त्यात एक जण एखादी काव्यपंक्ती त्यातील भावभावनांनुसार तालासुरात गातो. त्यातील संगीताला मुख्यत: लोकसंगीताचा आधार असतो. तर दुसरा त्या काव्यपंक्तींचा अर्थ सांगतो आणि त्याच्याशी संबंधित प्रसंग, किस्से सांगून श्रोत्यांना खिळवून ठेवायचा प्रयत्न करतो. या प्रकाराला गमक म्हणतात आणि ते गाणाऱ्याला गमकी. सादरकर्ता काव्यपंक्ती गात असला तरी त्यात गाणे, संगीत यापेक्षाही साहित्य, कथानक यावर जास्त भर असतो. प्राचीन कन्नड साहित्य हे गमक या कलाप्रकाराचा आधार आहे. सादर होणारी रचना अधिकाधिक सोपी, रसाळ करून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम गमकी करत असतो. गमक म्हणजेच एक प्रकारचे कीर्तन, गमक म्हणजे संगीतकला असे गैरसमज प्रचलित आहेत. पण गमक ही रचना त्यापेक्षा वेगळी आहे, हे आधुनिक समाजासमोर ठसवण्याचे काम केशव मूर्ती यांनी केले. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९३४ रोजी गमक सादर करण्याची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. कलाप्रतिभा हे निसर्गाचे देणे. आनुवंशिकतेतून प्रत्येकाला ते मिळतेच असे नाही. पण एच. आर. केशव मूर्ती यांना ते मिळाले आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी ते पुढेही नेले. त्यांना या कलेचे प्राथमिक शिक्षण दिले ते त्यांच्या वडिलांनी- रामस्वामी शास्त्री यांनी. केशव मूर्ती यांनी पुढील अभ्यास व्यंकटेशय्या यांच्या मार्गदर्शनाखाली केला. त्यांनी गमकचे शेकडो कार्यक्रम केले आणि अनेक विद्यार्थ्यांना या कलेचे प्रशिक्षण दिले. आपल्या कार्यक्रमांतून त्यांनी कन्नड महाकाव्ये सादर केली. कुमारव्यास भरत या कन्नड महाकाव्याच्या प्रसाराचे कार्य केले. त्यांची शैली पुढे केशव मूर्ती घराणे म्हणून ओळखली जाऊ लागली. या क्षेत्रातील योगदानाबद्दल कर्नाटक सरकारने त्यांना कर्नाटक रत्न या पुरस्कारासह वेगवेगळे पुरस्कार दिले. गमक या पारंपरिक कलेचे जतन केल्याबद्दल २०२२ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. कथाकथन, सादरीकरण या कलांना आजच्या काळात अनेक नवनवे आयाम प्राप्त झाले आहेत. त्यांची सादरीकरणाची, लोकांपर्यंत पोहोचविण्याची माध्यमे बदलत आहेत. पण काहीतरी सांगण्याची आच आणि ते ऐकण्याची आस हा माणसाचा अगदी मूलभूत गुणधर्म जोपर्यंत टिकून राहणार आहे, तोपर्यंत सांस्कृतिक सपाटीकरणाची भीती बाळगण्याची गरज नाही, हेच एच. आर. केशव मूर्ती यांच्यासारखे कलाकार आपल्या जगण्यातून सांगून जातात. भारताच्या कानाकोपऱ्यातील गमकसारखे आणखी कितीतरी कलाप्रकार अशाच एखाद्या एच. आर. केशव मूर्तींच्या प्रतीक्षेत आहेत, ते याचसाठी !
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2022 रोजी प्रकाशित
व्यक्तिवेध : एच. आर. केशव मूर्ती
जागतिकीकरणाचा रेटा वाढू लागला तशी सांस्कृतिक सपाटीकरणाची भीती मांडली जाऊ लागली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-12-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh globalization cultural television series padmashri h r keshavmurthy of the artist death ysh