अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला भारत सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही, परंतु पुढील आठवड्यात तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिरखान मुत्ताकी भारतात येत आहेत, तेव्हा तो दिवस फार दूर नाही. जगातील सध्याचा राजनैतिक, सामरिक आणि व्यापारी पट दिवसागणिक झपाट्याने बदलत असल्यामुळे काल ज्यांना शत्रू मानले, त्यांच्याशी आज मित्रत्वाच्या भावनेतून बोलावे लागत आहे. वर्षानुवर्षे ज्यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती, ते शत्रूचे मित्र झाल्यामुळे अशा मैत्रीबाबत फेरविचार करावा लागत आहे. तालिबानने दुसऱ्यांदा अफगाणिस्तानचा ताबा घेतला चार वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२१मध्ये. तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानातील सरकार उलथून लावले, तेव्हा आणि दुसऱ्यांदाही पदच्युत सरकारशी भारताचे दृढ स्नेहबंध होते. तशात तालिबानची निर्मितीच पाकिस्तानच्या सक्रिय पाठबळावर झाली आणि या जिहादी संघटनेने काश्मीरमध्येही दहशतवाद्यांप्रति जाहीर बंधुभाव प्रकट केल्यामुळे या संघटनेशी, तिच्या राजवटीशी आपण सुरुवातीपासूनच फटकून वागत आलो आहोत. मात्र टोळ्यांच्या अराजकतेपेक्षा काबूलमध्ये स्थिर राजवट असण्याला अफगाण जनतेची वाढती पसंती मिळत आहे. तशात पाकिस्तानला अफगाणिस्तानमध्ये पख्तून आणि इतर संस्कृती मिटवून स्वत:चे अनिर्बंध राज्य प्रस्थापित करायचे आहे हेही तालिबानला उमगले आहे. त्यामुळे पहिल्या खेपेस होते तितके आणि तसे, दुसऱ्यांदा सत्ताधीश झालेले तालिबान राज्यकर्ते पाकिस्तानला अनुकूल अजिबात नाहीत. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, गेली अनेक वर्षे भारताची अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधा उभारणी, औषधपुरवठा, धान्यपुरवठा आदी अनेक क्षेत्रांत सहभाग व गुंतवणूक आहे. योग, बॉलीवूड, क्रिकेट अशा अनेकपरींनी आलेली मोलाची अशी ही सुप्तशक्ती किंवा सॉफ्ट पॉवर. तिचे कालातीत महत्त्व जितके कोविडकाळात दिसून आले, तितकेच ते गेल्या सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानात झालेल्या विध्वंसक भूकंपापश्चातही अधोरेखित झाले. अशा अडचणीच्या क्षणी सर्वांत जवळचा आणि विश्वासू पुरवठादार देश भारतच आहे हे उमगायला तालिबान्यांना वेळ मात्र लागला. तरीदेखील या वर्षी दोन्ही देशांमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेच्या फेऱ्या वरचेवर होत होत्या. याच चर्चेची परिणती म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेली तालिबान परराष्ट्रमंत्र्यांची भेट.
पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंधांमध्ये मिठाचा खडा पडण्याचे तात्कालिक कारण या वर्षाच्या सुरुवातीस घडले. पाकिस्तानातील ८० हजार अफगाण निर्वासितांना देश सोडून अफगाणिस्तानमध्ये जाण्यास सांगण्यात आले. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध ताणलेले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान जवळ आले, ते यानंतर. जानेवारी महिन्यातच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी आणि अफगाण परराष्ट्रमंत्री मुत्ताकी यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. हे दोघेही दुबईत भेटत होते. चर्चेचा केंद्रबिंदू मानवतावादी मदतीभोवतीच असे. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तालिबान राजवटीने नि:संदिग्ध शब्दांत निषेध केला होता. त्याबद्दल १५ मे रोजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांचे आभार मानले. दोन्ही देशांदरम्यान ऑगस्ट २०२१नंतर झालेला तो पहिला मंत्रिस्तरीय संपर्क ठरला. दोन्ही देशांतील संबंधांना तेथून निराळे वळण आणि गती मिळाली. तालिबानकडून भारताकडे आता नित्याने औषध, खाद्यान्न, नैसर्गिक हानी पुनर्वसन सामग्रीविषयी विचारणा होत असते.
हे संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत, कारण चाबहार बंदर प्रकल्प यशस्वी आणि सुसंबद्ध ठरायचा असेल, अफगाणिस्तानचे सहकार्य कळीचे ठरणार आहे. एके काळी अफगाणिस्तानातील दूरसंचार, वीजपुरवठा आदि अनेक पायाभूत प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग आणि सहकार्य होते. ती जागा आता चीनने घेतली आहे. चीनच्या मदतीने तेथे अनेक प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या आणि विशेषत: पाश्चिमात्य देशांच्या निवडक व सोयीस्कर अफगाण बहिष्काराला चीनने कधीही जुमानले नाही. त्यामुळे तालिबान राजवटीला मान्यता देण्याच्या घोळात आपण महत्त्वाची वर्षे व्यतीत केली नि त्याचा फायदा चीनने उठवला. आज अन्न-औषधादि मदतीसाठी तालिबान भारताला पुकारतात, पण मोठे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी ते चीनकडेच साकडे घालतात. या वास्तवाकडे डोळेझाक करणे आपल्याला परवडणारे नाही. अफगाणिस्तानशी संबंध प्रस्थापित करत असताना तेथील सहभाग आणि गुंतवणूक हळूहळू वाढवावी लागेल, याचे भान आपल्या सरकारने ठेवले पाहिजे. भारत-अफगाणिस्तान वाढती जवळीक पाकिस्तानला अस्वस्थ करू शकते. गेल्या काही महिन्यांत भारतापेक्षा पाकिस्तानने अधिक मित्र जुळवले हे नाकारून उपयोग नाही. त्यामुळे त्या दृष्टीनेही अफगाणिस्तानशी संपर्क, सहकार्य वाढवत राहावे लागेल. हा एक प्रकारे जुगार आहे, पण प्रत्येक देश सध्या वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात तो खेळतच आहे. या अपरिहार्यतेमुळे तूर्त अफगाणिस्तानच्या मंत्र्याचे स्वागत करणेच योग्य.