काही गोष्टी आपण सहजच गृहीत धरून चालतो. उदाहरणार्थ, सेफ्टीपिन किंवा चमचा. त्या असतात, दिसतात साध्याच. त्यामुळे यापूर्वी कधी काळी त्या अस्तित्वात नसू शकतील, कोणी तरी त्यांचा शोध लावला असेल, असे आपल्या ध्यानी-मनी-स्वप्नीही नसते. आपल्या लेखी त्या जणू अनादीच असतात. संगणकाचा मूषक ही त्यातलीच एक गोष्ट. अगदी साधीसुधी. तिला कोणी माताश्री-पिताश्रीअसेल, असा विचार क्वचितच कोणास शिवला असेल. पण साधा असला, अतिपरिचयाने अवज्ञेची गत पावला असला, तरी माऊसलाही कोणी जनक होता. त्याचे नाव डग्लस एंजलबर्ट. मंगळवारी वयाच्या ८८व्या वर्षी कॅलिफोर्नियात त्यांचे निधन झाले. मानवी इतिहासात चाकाने माणसाला गती दिली. एंजलबर्ट यांनी चाकाचा उपयोग माऊसमध्ये करून मानवी बुद्धिमत्तेच्या वापराला ‘गती’ दिली. किंबहुना त्यांच्या सर्व संशोधनाचा हाच हेतू होता. त्यांनी तयार केलेला तो पहिला, लाकडी आवरणातला दुचाकी माऊस हे केवळ तंत्रसाधन नव्हते. तो एक विचार होता. सामूहिक बुद्धिमत्तेवर एंजलबर्ट यांचा विश्वास होता. माणसे एकत्र येऊन विचाराचे आदानप्रदान करू लागली की त्यातून त्यांच्या बुद्धिमत्तेच्या कक्षा रुंदावतात, असे त्यांचे मत होते. आणि त्याचे माध्यम म्हणून ते संगणकाकडे पाहत होते. अलीकडच्या काळात आपल्या डो एंजलबर्ट इन्स्टिटय़ूटमधून ते याच विचारांचा प्रचार करीत असत. माऊस हे त्यांच्या त्या दृष्टिकोनाचेच एक फलित होते. ८ डिसेंबर १९६८ रोजी सॅनफ्रान्सिस्को येथे झालेल्या संगणकशास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये एंजलबर्ट यांनी आपल्या काही शोधांचे सादरीकरण केले. संगणक क्षेत्रात अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्या सादरीकरणाला तोड नसे. पण आजही एंजलबर्ट यांनी १९६८ मध्ये केलेले सादरीकरण हे ‘सर्व सादरीकरणांचा बाप’ मानले जाते. त्यात त्यांनी प्रथमच माऊसबरोबर िवडो आधारित युजर इंटरफेस, इंटरअॅक्टिव्ह डॉक्युमेंट एडिटिंग, व्हिडीओ कॉन्फरन्स, संगणकजाल आदी शोध सादर केले. तेव्हा अजूनही एकेका खोलीएवढे मेनफ्रेम संगणक होते. त्यांना पंचकार्डच्या साह्य़ाने डेटा भरवला जात असे. आणि एका वेळी एकच जण त्यांचा वापर करू शकत होता. त्या काळात एंजलबर्ट यांचे हे काम किती प्रचंड महत्त्वाचे असेल, याची आज आपण कल्पनाच करू शकतो. संगणक अजूनही बाल्यावस्थेत होते, त्या काळात संगणक घराघरात वापरले जातील, लोक त्या माध्यमातून आपल्या कल्पनांची देवाण-घेवाण करतील, समस्यांची सोडवणूक करतील असे स्वप्न एंजलबर्ट पाहत होते. पुढे सुमारे १५ वर्षांनी, १९८४ मध्ये अॅपलने मॅकिन्तोशच्या माध्यमातून त्यांच्या काही संकल्पना घराघरांत, कार्यालयांत नेल्या. आणि त्यातूनच पुढे वैयक्तिक संगणकाचे पर्व सुरू झाले. आज संगणक वापर कमालीचा सोपा झालेला आहे. विचारांचे, संकल्पनांचे आदानप्रदान करण्यासाठी, विभिन्न समस्या सोडविण्यासाठीच नव्हे, तर अगदी क्रांतीचे वहन करण्यासाठीही संगणकाचा वापर केला जात आहे. या माहितीयुगाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्यांत पोर्टलँडमधील एका शेतावर ३० जानेवारी १९२५ रोजी जन्मलेल्या डग्लस कार्ल एंजलबर्ट या ‘मूषक’राजसंगणकपतीचे नाव मोठय़ा आदराने घ्यावे लागेल.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र