गेल्या काही दशकांपासून आपल्याकडे मानवी हक्कांबाबतच्या जागृतीच्या चळवळींनी मोठय़ा प्रमाणावर जोर धरला, तेव्हा अमेरिकेतील बॉब बार्कर नावाच्या एका चित्रवाणी कार्यक्रम संयोजकाने सुरू केलेल्या प्राणी हक्क चळवळीच्या बातम्यांनी वृत्तपत्रांच्या रकान्यांची मोक्याची जागा मिळविली होती. टेलिव्हिजनवरील ५० वर्षांची कारकीर्द संपवून निवृत्त झालेल्या बार्करने प्राणिहक्कांची चळवळ रुजविली आणि मानवी हक्कांइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक हक्क प्राण्यांना मिळालेच पाहिजेत, याची जाणीव अमेरिकी जनतेत मूळ धरू लागली.. हे या वेळी नमूद करण्यामागे एक कारण आहे, ते आपल्या अगदी आसपास घडणाऱ्या काही घटनांतून उमटणाऱ्या मूक वेदनांचे! आपल्या मालकाचे पोट भरण्यासाठी रस्तोरस्ती लोकांसमोर याचना करत फिरण्यात आयुष्य वेचलेल्या बिजली नावाच्या हत्तिणीचा ५८ व्या वर्षी वेदनामय अंत झाला.  प्राण्यांबाबतच्या अनास्थेचा हत्ती हा नेहमीच पहिला बळी ठरत आला आहे. खडतर कामांसाठी हत्तींचा वापर करण्याची अमानवी प्रथा आपण वर्षांनुवर्षे जपली आणि गजबजलेल्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळही आपणच ऐश्वर्याच्या या प्रतीकावर आणली. प्रचंड शक्ती, असामान्य समज आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या या गुणी प्राण्याला दारी झुलविणाऱ्या कंगालांनी भीक मागण्याचे साधन बनविले आणि पौराणिक दंतकथांमुळे भाविकांचे भक्तिस्थान बनलेल्या या प्राण्याच्या जिवावर आपले संसार चालविले. बिजलीच्या मृत्यूकडे, केवळ एका हत्तिणीचा वृद्धापकाळाने ओढवलेला मृत्यू एवढय़ा संकुचित नजरेने पाहणे योग्य ठरणार नाही. मृत्यूशी केविलवाणी झुंज देणाऱ्या या हत्तिणीने जे अनेक प्रश्न मागे ठेवले आहेत, त्यामध्ये प्राणिहक्कांचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. प्राणिहक्कांची जाण आपल्याला येणार कधी, हा प्रश्न बिजलीच्या निस्तेज डोळ्यांत कदाचित मरणाची अखेरची घटका मोजताना उमटलादेखील असेल. पण प्राण्यांना केवळ गुलामीची वागणूक देण्याच्या स्वार्थीपणाला प्राण्यांच्या डोळ्यांत उमटणाऱ्या भावना आणि त्यांच्या मूक वेदनांतून फुटणाऱ्या भाषेचा अर्थ कळेनासाच झाला आहे. ही वेदना डोळ्यांत घेऊनच बिजलीने प्राण सोडले असतील. बिजलीवर तिच्या मालकाने अतोनात प्रेम केलेही असेल. कदाचित, बिजलीचेही तिच्या मालकांवर जिवापाड प्रेम असेल, पण बिजली हे मालकाच्या कुटुंबाचे पोट भरण्याचेच साधन होते, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. असे किती तरी हत्ती अजूनही मालकाला पाठीवर घेऊन दारोदारी याचना करत फिरताना भर शहरांत दिसतात. बकाल शहरीकरणामुळे श्वापदांची हक्काची जागा असलेल्या जंगलांचा ऱ्हास होत आहे आणि असंख्य जंगली प्राणी केवळ माणसांनी उभारलेल्या प्राणिसंग्रहालयांच्या पिंजऱ्याआड कसेबसे जगत आहेत. त्यामुळे प्राणिहक्क ही संकल्पनादेखील संकुचित होऊ लागली आहे. या प्राण्यांच्या मुक्त जगण्याचा हक्क तर हिरावला गेलाच आहे, पण त्यांच्या गुलामीच्या जगण्याकडे तरी दयादृष्टीने पाहिले पाहिजे, एवढी या प्राण्यांची माणसाकडून किमान अपेक्षा असेल. त्यांची भाषा समजत नसेल, पण त्यांची वेदना जाणणाऱ्यांनी तरी अशा प्राण्यांसाठी काही तरी केले पाहिजे. मुळात निवासाचा हक्कच गमावून बसलेल्या प्राण्यांचे गुलामीचे जिणे तरी सुखाचे असलेच पाहिजे..