त्या (१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत बलात्कार करणाऱ्या) व्यक्तीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याचे काय करायचे ते पाहून घेऊ.. हे उद्गार जया बच्चन यांचे होते, तेही भर राज्यसभेतले. असे बोलणाऱ्या त्या एकटय़ाच नव्हत्या. आणखी एका संसद-सदस्यानेही याच शब्दांत संताप व्यक्त केला होता. बलात्काराच्या घृणास्पद गुन्ह्य़ानंतर एरवीही लोकांकडून अशी मागणी होत असते. अशा गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्या, त्याला भरचौकात फाशी द्या, असे लोक म्हणत असतात. नागालँडमधील एका जमावाने नेमके तेच केले. बलात्काराचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला न्यायालयीन कोठडीत घुसून बाहेर काढले आणि तुडवून तुडवून ठार मारले. नंतर चौकात फरफटत नेऊन त्याच्या मृतदेहाला फासावर लटकावले. ही घटना त्या जमावाला एवढी संस्मरणीय वाटली की त्याचे छायाचित्र काढण्यासाठी शेकडो मोबाइल कॅमेरे तेथे सरसावले होते. यात काही गर घडले असे तेथील कोणालाच वाटले नव्हते. देशभरातील अनेक नागरिकांनाही वाटत नाही. यातून आपणही तालिबानी मानसिकतेत चाललो आहोत याचीही पर्वा कोणाला असल्याचे दिसत नाही. आम्हीच पोलीस, आम्हीच न्यायाधीश आणि आम्हीच जल्लादही अशी ही मनोवृत्ती असल्याने ती अनतिक आहेच, परंतु कायद्याच्या राज्यालाच त्यातून आव्हान दिले जात आहे, हे कोणीही लक्षात घेत नाही. शिवसेनेने झुंडीच्या त्या िहसाचाराला जनतेचा उद्रेक म्हणत नागा जमावाची पाठ थोपटली आहे. शिवसेनेच्या द्वेषमूलक राजकारणाला साजेसा असाच तो विचार आहे. परंतु तीच मुख्य धारा बनण्याचे मोठे संकट देशासमोर उभे ठाकले आहे. शिवसेनेने या घटनेत त्या झुंडीची बाजू घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तो कथित बलात्कारी कथितरीत्या बांगलादेशी होता. आसामातून येणारे बांगलादेशी घुसखोर आपली संस्कृती, नोकऱ्या यांवर टाच आणतील अशी भीती नागालँडमधील काही संघटना पसरवीत आहेत. या प्रकरणात त्या भयगंडाचा फायदा घेण्यात आला. दिमापूरमधील आसामी व्यावसायिक सय्यद फरीद हा बंगाली बोलणारा आणि मुसलमान म्हणून त्याला बांगलादेशी ठरविण्यात आले. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तो भारतीयच असल्याचे म्हटले आहे आणि त्याचा एक भाऊ लष्करात असून, दुसरा एक भाऊ कारगिल युद्धात शहीद झाल्याचेही समोर आले आहे. ज्या सूमी जमातीच्या मुलीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे ती त्याची पत्नीकडून नातेवाईक आहे. पण या प्रकरणात मुळात बलात्कार हा दुय्यम मुद्दा असल्याचे दिसते. खरा मुद्दा बांगलादेशींचा आहे. गेल्या दोन दशकांपासून त्याला आणखी एक रंग मिळाला आहे. तो ‘सुमियां’ना आदिवासी दर्जा देण्याच्या मागणीचा. सूमी नागा (किंवा सेमा नागा) जमातीच्या महिला आणि मुस्लीम मियाँ यांच्या विवाहातून जन्मास आलेला हा गट. त्याला आदिवासींमध्ये घेण्यास तेथील मूळ नागांचा विरोध आहे. नागालँडमधील अर्थव्यवस्थेवर बिगरनागांचा प्रभाव गडद होत चालला असून, त्यातून आपल्या भूमीत आपणच परके होऊ असे त्यांना वाटू लागले आहे. शिवसेनेला ‘त्या’ झुंडीबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण यात दडले आहे. मात्र भयगंडित झुंडींनी राज्य बनत नसते. ती नेहमीच कायद्याच्या राज्याच्या विरोधात असते. पण या ना त्या कारणांनी अशा झुंडींना प्रोत्साहन देण्याचेच काम देशात सध्या सुरू असल्याचे दिसते. कायदा करणाऱ्या महानुभावांची विधानेही झुंडीच्या त्या आरोळ्यांना साह्य़कारी ठरावीत, हे तर त्याहून भयंकर.