मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेने भाजपला मागे टाकले आहे. सत्तेच्या आनंदापेक्षा मुख्यमंत्र्यांचे नाक कापले गेले याचा अधिक आनंद शिवसेनेला झाला असणार. कल्याण-डोंबिवलीचा विजय शिवसेनेसाठी अधिक महत्त्वाचा आहे. दीड वर्षांने होणाऱ्या मुंबई आणि ठाणेसह १० महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचा आत्मविश्वास या विजयाने नक्कीच वाढणार आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेचे फाटले. उभय पक्ष स्वबळावर लढले आणि मोदी लाटेत भाजपने शिवसेनेला मागे टाकीत सत्ता पटकविली. याचे शल्य शिवसेनेला अजूनही सलत आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सारेच स्वबळावर लढल्याने प्रत्येकाला आपल्या ताकदीचा अंदाज आला. स्वबळावर लढल्याने ‘शत प्रतिशत’चे लक्ष्याच्या जवळ जाणे भाजपला शक्य झाले. वेगळे लढल्याने फायदा होतो याचा भाजपला अंदाज आला. कल्याण-डोंबिवलीमध्येही भाजपने हीच खेळी केली. स्वबळावर ताकद आजमवल्याने भाजपला चाळीशी पार करता आली. वेगळे लढल्याने पक्ष सर्व प्रभागांमध्ये पोहचला. शिवसेना-भाजपप्रमाणेच काँग्रेस व राष्ट्रवादी वेगळे लढल्याने त्यांनाही आपल्या ताकदीचा अंदाज आला. एकूणच गेल्या वर्षी झालेल्या घटस्फोटाचा भाजप व शिवसेना यांना फायदाच झाला आहे.
दोनच दिवसांपूर्वी सत्तेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षांंत गोंधळ झाला, पण वर्षभरात राज्याला दिशा दिली, असा दावा त्यांनी केला. असे असले तरीही गेल्या वर्षभरात झालेल्या कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई-विरार या महानगरपालिका, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या मोठय़ा नगरपालिका किंवा भंडारा वा गोंदिया या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सरकारच्या निर्णयप्रक्रियेत मुख्यमंत्र्यांना ठसा उमटविता आला असला तरी राजकीय आघाडीवर मात्र हे त्यांचे अपयशच मानावे लागेल.
पुढील वर्षांच्या अखेरीस नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. नंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांना समारे जाताना मुख्यमंत्र्यांची खरी कसोटी लागणार आहे. बेरजेच्या राजकारणावर त्यांना भर द्यावा लागणार आहे. कारण आजच्या घडीला पक्षातील सर्वच बुजूर्गांनादू मुख्यमंत्र्यांनी काहीसे रच ठेवले आहे. मध्यावधी म्हणून समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फटका बसल्यास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह पक्षातून उभे केले जाईल. कुठे गेले ‘अच्छे दिन’ असा प्रचार शिवसेना व अन्य विरोधकांनी सुरू केला होता. भाजपसाठी कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये फार अच्छे दिन आले आहेत असे काही म्हणता येणार नाही.