..देशाच्या विकासासाठी मोदी यांस या असल्या मंडळींची मदत लागणार असेल, तर ते खरे तर खुद्द मोदी यांच्यासाठीही कमीपणाचे ठरेल..
घरच्यांच्या विरोधास डावलून दुसरा पाट लावायचा आणि नव्या खाष्ट बायकोशी कसे जुळवून घ्यायचे हा प्रश्न पडल्यावर आईच्या आठवणीने टिपे गाळायची, असे राष्ट्रवादीतून फुटून निघालेल्या अजित पवार आणि मंडळींचे झालेले दिसते. आपले दैवत, विठ्ठल वगैरे असलेल्या शरद पवारांना सोडून भाजपशी घरोबा केल्यानंतर लागोपाठ अजितदादा आणि मंडळी थोरल्या पवारांचे ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी दोन दिवसांत दोन वेळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात येऊन गेली. पहिल्या दिवशी नव्यानव्या मंत्रीपदाच्या शालूतले फक्त मंत्री होते आणि दुसऱ्या दिवशी मंत्री आणि हाताला मेंदी लावून कोणी हात हातात घेईल अशी वाट पाहणारे अन्य आमदार. म्हणजे जे मंत्री झाले त्यांनाही शरद पवार यांचा आशीर्वाद हवा आणि जे मंत्री होऊ इच्छितात त्यांनाही हवा. त्याच वेळी पवार यांच्यासमवेत असलेलेही हजर होते. त्यांना तर त्यांचा आशीर्वाद हवाच हवा. अशा सर्वाना एकाच वेळी आशीर्वाद देण्याची पवार यांची क्षमता भारीच म्हणायची. तिची तुलना केळे या अद्भुत फळाशीच करता येईल. बद्धकोष्ठ असो वा अतिसार. दोनही विकारांवर केळे हे फळ उपचार म्हणून चालते म्हणतात. तद्वत पक्षातून फुटून गेलेले असोत वा न फुटता मागे राहिलेले असोत. पवारांच्या आशीर्वादाचे सर्वच भोक्ते. यातील मागे राहिलेल्यांचे सोडून देऊ. कारण त्यांची या आशीर्वादाची गरज तशी नैसर्गिक म्हणता येईल. पण पवार यांना सोडून गेलेल्यांचे काय? नवा घरोबा करायचा आणि जुन्या नातेसंबंधाचे माधुर्यही चाखत राहायचे; हे कसे?
हाच प्रश्न अजितदादा आणि अन्यांच्या कृतीवरून पडतो. कसला आशीर्वाद त्यांना हवा? आणि कशासाठी? मुळात त्याची गरजच काय? खरे तर खऱ्या कर्तृत्ववानाप्रमाणे या मंडळींनी आता मागे पाहायचे कारण नाही. तशीही छगन भुजबळ वगैरे मंडळी सरावलेलीच आहेत. अशा नवनव्या घरोब्यांची त्यांना सवय नाही, असे अजिबात नाही. खरे तर या कर्तृत्ववानांनी स्वत:चा एखादा पक्ष आधी स्थापून आणि चालवून दाखवत स्वत:ची क्षमता सिद्ध करायला हवी. तसे काही करण्याची कुवत यातील एकाकडेही नाही. छगन भुजबळ यांनी त्या वेळी, बाळासाहेब ठाकरे हयात असताना, शिवसेना सोडण्याची हिंमत दाखवली हे खरे. पण तरी तसे करून ते तितक्याच तगडय़ा पवारांच्या काँग्रेसी पदराखाली गेले. आपण स्वत:चा पक्ष काढावा असे काही त्यांना वाटले नाही. या सर्वात त्यातल्या त्यात जनतेत स्थान असलेले भुजबळच. त्यांना असे काही जमले नाही, ते इतरांस जमेल असे मानण्याचे कारणच नाही. पण त्यांच्यापेक्षा त्या गटात श्रेष्ठ अजितदादा. पण त्यांचे श्रेष्ठत्व काका शरद पवारांमुळेच आले, हे तेही नाकारणार नाहीत. शरद पवार हे काका नसते तर त्यांचे जे काही आज स्थान राज्याच्या राजकारणात आहे ते असते काय? अजितदादांपेक्षा मग राज ठाकरे अधिक धडाकेबाज ठरतात. त्यांनी निदान स्वत:च्या पायावर उभे राहून दाखवण्याची हिंमत तरी केली. मोठे पवार नाहीत तर धाकटे तर धाकटे याच विचारातून भाजपही अजितदादांना जाळय़ात ओढू पाहतो, हेही उघड आहे. बाकी दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे वगैरेंविषयी न बोलणेच बरे. पवारांच्या प्रभावळीतील नसते तर वळसे-पाटील आदींना ग्रामपंचायतही जिंकता आली नसती हे सत्य. तथापि आयुष्यभर थोरल्या पवारांच्या उपकारांखाली राहणे त्यांना प्रशस्त न वाटणे अगदी साहजिक. त्यामुळे त्यांनी अधिक विकासासाठी आणि त्याहीपेक्षा ‘केलेला विकास’ सुरक्षित राहावा यासाठी थोरल्या पवारांना सोडले हेही साहजिक. पण साहजिक नाही ते आशीर्वादाचे नाटक. आता एकदा गेला आहात ना दुसऱ्या घरी? तर मग राहावे आनंदाने आणि आत्मविश्वासाने. या असल्या आशीर्वाद वगैरे थोतांडांची गरजच काय?
त्याच वेळी तो देण्याची थोरल्या पवारांना गरज काय; हाही प्रश्नच. खरे तर आशीर्वाद देणे म्हणजे या सर्वाना त्यांनी ‘गेल्या घरी तुम्ही सुखी राहा’ असे आणि इतकेच सांगणे. त्यात अधिक शहाणपण. पण तरीही एकदा नाही तर पाठोपाठ दोन दिवस दोन वेळा ते या ‘गेलेल्यांना’ भेटणार असतील तर या ‘गेलेल्यांविषयी’ त्यावर जितका संशय घेतला जाईल त्यापेक्षा अधिक त्यांना ‘जाऊ देणाऱ्यावर’ घेतला जाईल. म्हणजेच यामुळे थोरल्या पवारांचे हेतू संशयास्पद ठरतील. भाजपशी नाही ना तुम्हास हातमिळवणी करायची? मग त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्यांचे एकांतात कसले आदरातिथ्य करता? त्यामुळे त्यांच्यासमवेत जे कोणी मागे राहिले त्यांनाही असेच पुढे गेलेल्यांसारखे करणेच योग्य असे वाटेल. सतत संशय निर्माण करणे हा राजकारणात गुण खराच. पण त्यास कोठे आवर घालावा हे लक्षात आले नाही तर स्वत:विषयीच संशय निर्माण होण्याचा धोका असतो. तो पवार यांच्याबाबत संभवतो. तेव्हा राज्याच्या विकासासाठी विरोधी गटातल्या राष्ट्रवादीतून सत्ताधारी भाजपच्या कळपात स्वत:हून गेलेल्यांस थोरल्या पवारांनी – तेही दोन-दोनदा – भेटण्याचे काही कारणच नाही. हे असेच सुरू ठेवायचे असेल तर उद्या या मंडळींच्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात प्रचारार्थ गेल्यावर त्यांचा पाहुणचारही थोरल्या पवारांनी जरूर स्वीकारावा. उगाच त्यांचे तरी मन का मोडा? खरे तर या प्रसंगी आशीर्वादाची सर्वाधिक गरज कोणास असेल तर ती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जिवाचा कोट करून शिवसेना सोडणाऱ्या आमदारमंडळींस आहे. त्यातले काही मोजके मंत्री झालेले सोडले तर बाकीच्यांची अवस्था ‘ना खुदा मिला ना वस्ल-ए-सनम’ अशी झालेली आहे. म्हणजे परमेश्वरही भेटला नाही आणि जिवलगाची गळाभेटही घेता आली नाही, असे. आशीर्वाद द्यायचा इतकाच मोह असेल तर थोरल्या पवारांनी खरे तर या मंडळींच्या जखमांवर फुंकर घालावी. त्याची अधिक गरज आहे.
आम्ही सर्व राष्ट्रवादीतून भाजपत गेलो ते राज्याच्या विकासासाठी अथवा देशविकासार्थ मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी असे अजितदादादी मान्यवर सांगतात. त्यावर मतिमंदही विश्वास ठेवणार नाहीत. देशाच्या विकासासाठी मोदी यांस या असल्या मंडळींची मदत लागणार असेल तर ते खरे तर खुद्द मोदी यांच्यासाठीही कमीपणाचे ठरेल. वास्तविक आपल्या जगन्मान्य नेत्यास देशविकासार्थ अजितदादा, प्रफुल्ल पटेल, भुजबळ अशा इतरांची मदत लागते याचा खरे तर या नेत्यांच्या भक्तगणांस संताप वाटावयास हवा. पण त्यांच्याकडून अशी काही वैचारिक अपेक्षा करणे व्यर्थ. अर्थात भ्रष्टाचार शिरोमणी सुखराम, आणीबाणी-अत्याचारकार विद्याचरण शुक्ल, विविध भ्रष्टाचार आरोपांतील काही तृणमूल नेते अशा शेकडोंस पचवून भाजपने दिलेला विकासाचा ढेकर देशाने अनुभवलेला आहेच. त्या भाजपस ‘ईडी’ग्रस्त अजितदादा, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे आदीं मान्यवर काही पचवणे जड नाही. त्याच वेळी या अशा विकासाभिमुख नेत्यांमुळे ‘ईडी’स तरी हायसे वाटेल. तेवढेच काम कमी!
अशा तऱ्हेने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष यांतील बंडाने सगळय़ांचे सगळे भले होत असताना या असल्या आशीर्वाद वगैरे नाटकाची गरजच काय? असे झाल्यावर बाकी कोणी नाही तरी या सर्वास पोटाशी कवटाळणाऱ्या भाजपने तरी त्यांना खडसावून विचारायला हवे : आशीर्वाद कसले मागता? कारण या मंडळींची ही अशी आशीर्वादाची इच्छा ही एक प्रकारे भाजपसाठी धोक्याचा इशारा ठरते.