मर्यादित स्वातंत्र्याची लबाडी गोर्बाचेव्ह यांनी कधी केली नाही. त्यामुळे सुटलेल्या वाऱ्यांत त्यांचीच लोकप्रियता उडून जाऊ लागली, तरीही..

ते त्यांच्या राजकीय निर्णयांसाठी अभ्यासनीय ठरतात आणि पराभवातही तत्त्व राखले यासाठी आदरणीय!

नेते दोन प्रकारचे असतात. जनतेच्या मनातील भावभावनांच्या वाऱ्याचा अंदाज घेत, लोकानुनयाच्या मार्गे आपल्या नेतृत्वाच्या जहाजाचे शीड त्याप्रमाणे अनुकूल करीत लाटांवर स्वार होणारे एक. आणि कोणत्याही जनभावनेच्या रेटय़ाचा आधार न घेता, प्रसंगी या जनभावनेच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवत बुद्धिनिष्ठ निर्णयांद्वारे विशाल कालपटावर स्वत:चे स्थान कोरून काढणारे दुसरे. यश प्रसंगी दोघांनाही मिळते. पण पहिल्या गटातील नेत्यांचे यश तात्कालिक असते आणि एक-दोन निवडणुकांतील पराभवांनी ते सहज पुसले जाते. अशा नेत्यांची संख्याही भरपूर. याउलट दुसऱ्या गटातील नेते मोजकेच असतात आणि पराभूत झाले तरी त्यांच्या कर्तृत्वाचे यश काळावर पुरून उरते. मिखाइल सर्गेविच गोर्बाचेव्ह हे अर्थातच दुसऱ्या गटातील. आणि म्हणून आदरणीय तसेच अभ्यासनीयदेखील. अत्यंत परिपूर्ण आयुष्य जगलेले गोर्बाचेव्ह वयाच्या ९१ व्या वर्षी निवर्तले. ते आदरणीय तसेच अभ्यासनीय का याचा यानिमित्ताने घेतलेला हा शोध. मिखाइल हे विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात लेनिनच्या क्रांतीनंतर जन्माला आलेल्या पिढीतील. म्हणजे आपल्याकडे ज्याप्रमाणे राजीव गांधी हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मून पंतप्रधानपदापर्यंत गेलेले पहिले नेते होते, त्याप्रमाणे गोर्बाचेव्ह हे क्रांतीपश्चात जन्मून सर्वोच्च पदी पोहोचलेले पहिले रशियन. आई-वडील सामुदायिक शेतीच्या साम्यवादी रोमँटिसिझममध्ये पिचलेले. पण बोलायची सोय नाही. या साम्यवादी वृक्षाची कटू फळे खावी लागलेल्यांत त्यांचे दोन्हीही आजोबा होते. आईच्या वडिलांना तर स्टालिनच्या सैनिकांनी सायबेरियात काळय़ा पाण्याची शिक्षाही दिलेली. त्यांचा गुन्हा काय? तर साम्यवादाविरोधात जनमत संघटित करीत असल्याचा केवळ संशय. वास्तविक ते तसे काहीही करीत नव्हते. पण तरी त्यांच्यावर तसा ठपका ठेवून स्टालिनच्या फौजांनी त्यांना शासन केले. याचा नाही म्हटले तरी काही परिणाम लहानग्या मिखाइलच्या मनावर झाला असणार. १९५३ साली स्टालिनचा गूढ मृत्यू झाला तेव्हा गोर्बाचेव्ह महाविद्यालयात होते. हे वय राजकीय जाणिवा निर्माण होण्याचे आणि आहेत त्या भावना प्रखर होण्याचे. याच काळात गोर्बाचेव्ह साम्यवादी तरुणांच्या संघटनेतही सक्रिय होते. आदर्शवादी साम्यवादी विचारधारा प्रत्यक्षात भांडवलशाहीपेक्षाही किती क्रूर होती हे याच काळात त्यांनी अनुभवले असणार. त्यात स्टालिन यांच्या निधनानंतर ख्रुश्चेव्ह यांच्याकडून उघड होत गेलेला स्टालिनकालीन क्रौर्याचा तपशील. आपण क्रांती वगैरे करू शकतो असा समज तयार होणाऱ्या आणि त्याबरहुकूम जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण वयात या कथित क्रांतीची दुसरी भळभळती बाजूही मिखाइल यांच्यासमोर ढळढळीतपणे आली. त्यांच्या पुढच्या राजकीय विचारधारेची दिशा निश्चित होण्यात या काळाचा वाटा निश्चितच मोठा असणार. गोर्बाचेव्ह ज्या परिसरातून येतात तो रशियातील समृद्ध कृषी उत्पादक भाग. साम्यवादी पक्षाच्या तरुण गटात येथे काम करताना त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या दोन व्यक्ती आल्या. युरी आंद्रोपोव्ह आणि दुसरे फ्योदोर कुलाकोव्ह. आंद्रोपोव्ह पुढे सर्वोच्च सत्तापदी गेले आणि त्यांच्यापाठोपाठ कुलाकोव्ह हेदेखील त्याच मार्गाने जाणार होते. पण अकाली निधनामुळे त्यांची संधी हुकली. यातील कुलाकोव्ह कृषीतज्ज्ञ आणि गोर्बाचेव्ह यांचीही पदवी त्या क्षेत्रातील. या दोघांच्या नजरेस गोर्बाचेव्ह पडले आणि तेथून त्यांचा राजकीय उत्कर्ष सुरू झाला. पक्षाच्या सर्वोच्च समितीत त्यांची वर्णी लागली. एव्हाना सोव्हिएत रशियावर मद्यपी ब्रेझनेव्ह यांचा अंमल सुरू झालेला. राजकीयदृष्टय़ा चतुर ब्रेझनेव्ह हे वैचारिकदृष्टय़ा ढ वर्गात मोडत होते. चटपटीत ब्रेझनेव्ह यांस गंभीर चर्चेचे वावडे. त्यांच्या काळात सोव्हिएत रशिया आर्थिकदृष्टय़ा मागे पडत गेला. त्या देशातील उत्पादने दर्जाशून्य गणली जाऊ लागली. पण ब्रेझनेव्ह ढिम्म. स्तुतिपठण हा त्यांचा एकमेव कार्यक्रम. त्या वेळी रशियात सर्वत्र फक्त ब्रेझनेव्ह यांचीच छायाचित्रे असत. प्रत्येक लहानमोठी सभा ब्रेझनेव्ह गुणगौरवाने सुरू होत असे. या गुणगौरवास नकार देणाऱ्यांस पदावरून दूर केले जाई. हे सारे गोर्बाचेव्ह यांस ‘आतून’ पाहायला मिळाले. अति मद्यपानाने मृत्यू पावलेल्या ब्रेझनेव्ह यांच्यानंतर आंद्रोपोव्ह यांच्याकडे सत्ता आली खरी. ते अभ्यासू. पण अति व्होडकाप्राशन हा त्यांचा दुर्गुण. समस्त रशियनांनीही अशीच व्होडका प्यावी म्हणून त्यांनी ‘आंद्रेपॉव्हका’ हा स्वस्त व्होडका ब्रँड  बाजारात आणला. यामुळेही असेल पण सर्वोच्च पदी पोहोचल्यानंतर अवघ्या १५ महिन्यांत ते गेले. वास्तविक त्याच वेळी गोर्बाचेव्ह यांच्या सत्तारोहणाची चर्चा होती. पण ती चुकली. त्यांच्याऐवजी जुनेजाणते कॉन्स्टॅन्टिन चेर्नेन्को सत्तेवर आले. त्यांना मद्याचे व्यसन नव्हते. पण सिगारेटचे होते. वयाच्या नवव्या वर्षांपासून धूम्रपान करणारे चेर्नेन्को झोपत तेवढय़ा काळात धूम्रकांडी त्यांच्या तोंडी नसे. आंद्रोपॉव्ह १५ महिने टिकले तर चेर्नेन्को अवघे १३. त्यानंतर मात्र गोर्बाचेव्ह यांच्या हाती सोव्हिएत रशियाची सूत्रे आली. तेव्हा त्यांचे वय होते अवघे ५७. ही घटना १९८५ सालची.

या असल्या दिव्य नेत्यांच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर आलेल्या गोर्बाचेव्ह यांच्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट होती. अर्थव्यवस्था सुधारणे. राजकीय यश कितीही बलाढय़ असले तरी प्रांत/देश यांची अर्थव्यवस्था तशी नसेल तर हे यश कवडीमोल हे जाणणारा आणि त्याप्रमाणे वर्तन करणारा हा नेता. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर पारदर्शीपणा हवा, त्याखेरीज गुंतवणूक येत नाही हे जाणून सत्ता हाती घेतल्यानंतर एका वर्षांत पक्षाच्या महाअधिवेशनात त्यांनी आपल्या सरकारची चार तत्त्वे मांडली. ‘पेरेस्त्रोयका’ (फेररचना), ‘ग्लासनोस्त’ (मोकळेपणा), ‘उस्कारेनिया’ (अर्थविकास) आणि ‘डेमॉक्रतीत्झातिया’ (लोकशाहीकरण). सत्ता मिळाल्यावर चुरचुरीत घोषणा सगळेच करतात. पण गोर्बाचेव्ह यांचा मोठेपणा हा की ही चार तत्त्वे त्यांनी राजकीयच काय, पण आयुष्याच्या अखेरीपर्यंत पाळली. सत्ता हाती आल्या आल्या सर्व राजकीय बंदिवानांची त्यांनी सुटका केली आणि आंद्रे साखारॉव्ह यांच्यासारख्या आदरणीय भौतिकशास्त्रज्ञाची मानाने मॉस्कोत प्रतिष्ठापना केली. ब्रेझनेव्ह यांच्या काळात पूर्व युरोपातील साम्यवादी राजवटींची जबाबदारी सोव्हिएत रशियाने स्वत:च्या डोक्यावर घेतली होती. गोर्बाचेव्ह यांनी ही झटकून टाकली. त्या सर्व देशांस तुम्ही तुमचे मुखत्यार आहात असा संदेश त्यांनी दिला. ही फार मोठी घटना. कारण या देशांतील साम्यवादी राजवटी वाचवण्याचे झेंगट रशियाने स्वत:च्या हाताने दूर ढकलले. रशियाचा मोठा आर्थिक भार त्यामुळे कमी झाला. त्याच मालिकेतील दुसरा निर्णय म्हणजे अफगाणिस्तानातून रशियान फौजा माघारी घेण्याचा. दहा वर्षांपूर्वी १९७९ साली ब्रेझेनेव्ह यांनी अमेरिकेस रोखण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून अफगाणिस्तानात रशियान फौजा पाठवल्या होत्या. त्यातून काहीही हाती लागले नाही. रशियाचे ढोपर तेवढे फुटले. पण हे मान्य करण्याची हिंमत कोणातही नव्हती. ती गोर्बाचेव्ह यांनी दाखवली. सत्ता हाती घेतल्या घेतल्या एका वर्षांत त्यांनी हा मानस व्यक्त केला आणि १९८९ साली रशियन फौजा माघारी बोलावल्या. आधुनिक जगाच्या इतिहासात हा काळ मोठा रम्य म्हणायला हवा. ग्रेट ब्रिटनमध्ये सुधारणावादी मार्गारेट थॅचर होत्या आणि अमेरिकेत साहसवादी रिपब्लिकन रोनाल्ड रेगन अध्यक्षपदी होते. रेगन आणि गोर्बाचेव्ह यांस प्रसंगी खडे बोल सुनावून रास्त आर्थिक मार्गावर ठेवण्याचे महत्कार्य थॅचर यांचे. हे तिघेही सतत संपर्कात असत आणि अनेक व्यासपीठांवर भेटत. अशाच एका परिषदेत रेगन हे गोर्बाचेव्ह यांच्याकडे पाहून उद्गारले : ब्रेक द वॉल. त्याच वर्षांत ९ नोव्हेंबर या दिवशी बर्लिन येथील पूर्व आणि पश्चिम जर्मनी अशी विभागणी करणारी भिंत खरोखरच कोसळली. साम्यवादी राजवटींचाही तो अंत ठरला! शीतयुद्ध थंड झाले.

 एकाच आयुष्यात जगाचा इतिहास बदलणाऱ्या इतक्या साऱ्या घटनांचे श्रेय एकाच व्यक्तीच्या पदरात क्वचितच देता येते. ही गोर्बाचेव्ह यांची पुण्याई. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांच्या अधिकारपदाचा अस्त झाला. त्यांच्याच मुक्त विचारधारावादी राजकारणातून आकारास आलेल्या बोरिस येल्त्सिन यांनी गोर्बाचेव्ह यांच्याविरोधात उठाव घडवून आणला आणि त्यांना स्थानबद्ध केले. एव्हाना गोर्बाचेव्ह यांच्या याच मुक्ततावादी राजकारणामुळे सोव्हिएत साम्राज्य अस्तास जाऊन अनेक देशांनी आपापल्या स्वतंत्र चुली मांडल्या. गुलामांवरील आपला अधिकार अबाधित राहील इतपतच स्वातंत्र्य सर्वास रुचते. गोर्बाचेव्ह यांनी मर्यादित स्वातंत्र्याची लबाडी केली नाही. त्यामुळे सुटलेल्या वाऱ्यांत त्यांचीच लोकप्रियता उडून जाऊ लागली. पण तरीही गोर्बाचेव्ह यांनी कधीही आपल्या तत्त्वांशी प्रतारणा केली नाही. नंतरच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यात वयाच्या २२ व्या वर्षांपासूनची त्यांची सहचरी रईसा यांचे निधन झाले. त्यानंतर मग तर गोर्बाचेव्ह यांनी राजकारणच सोडले. पर्यावरणादी मुद्दय़ांवर ते काम करत राहिले. गोर्बाचेव्ह यांच्या विचारसरणीमुळे उगवू शकलेल्या येल्त्सिन यांनी त्यांचा राजकीय अंत घडवून आणला आणि येल्त्सिन यांच्या लाडक्या व्लादिमीर पुतिन यांनी दोघांनाही दूर ठेवले. ‘‘अलीकडे खोटय़ा दागिन्यांप्रमाणे खोटी लोकशाहीही लोकप्रिय होऊ लागली आहे’’, हे त्यांचे पुतिन यांच्या शासनशैलीविषयीचे मत. मतपेटीद्वारेही हुकूमशाही येऊ शकते हे ते यानिमित्ताने सांगत. ते त्यांच्या राजकीय निर्णयांसाठी अभ्यासनीय ठरतात आणि पराभवातही तत्त्व राखले यासाठी आदरणीय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 अलीकडे रुग्णालयात गोर्बाचेव्ह यांची विचारपूस करायला गेलेले उदारमतवादी रशियन अर्थतज्ज्ञ रस्लन ग्रीनबर्ग बाहेर आल्यावर म्हणाले : ‘‘त्यांनी आम्हास स्वातंत्र्य दिले; पण त्याचे करायचे काय हे आम्हास उमगलेच नाही’’. केवळ रशियन नागरिकच नव्हे तर अन्य अनेकांस हे विधान लागू होते. वैचारिक स्वातंत्र्याचा अधिकाधिक संकोच होत असताना कडवे स्वातंत्र्यवादी गोर्बाचेव्ह यांचे जाणे एका अर्थी कालसुसंगत. जगाचा इतिहास बदलवून नवा भूगोल घडवणाऱ्या या वैश्विक नेत्याच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवाराची आदरांजली.